राजर्षी छत्रपती शाहू महाराज

    जन्म दिवस – २६जून १८७४, जन्म ठिकाण – कोल्हापूर , मृत्यू – ६मे १९२२ (मुंबई) . शाहू महाराजांचा जन्म २६जून१८७४ रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांच्या पित्याचे नाव जयसिंगराव उअर्फ आबासाहेब घाटगे, तर मातेचे नाव राधाबाईसाहेब होते. शाहू महाराजांचा विवाह १एप्रिल १८९१ रोजी बडोदा येथील गुणाजी खानविलकर यांची कन्या लक्ष्मीबाई बरोबर झाला. २ एप्रिल १८९४ रोजी महाराजांचा राज्याभिषेक होऊन त्यांनी राज्याची सूत्रे स्वीकारली.

शाहू महाराजाच्या एकूण कार्यात त्यांचे शैक्षणिक कार्य अतिशय महत्त्वाचे आहे. त्यांनी प्राथमिक शिक्षणाला महत्त्व दिले. २५ जुलै १९१७ च्या आदेशानुसार महाराजांनी प्राथमिक शाळेत फी माफीची घोषणा केली. २१ नोव्हेंबर १९१७ च्या जाहिरनाम्यानुसार महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यात आले. या योजनेचा खर्च चालविण्यासाठी १९१८ मध्ये शिक्षण विषयक कराचा कायदा केला. आपल्या महसुलीपैकी ६% शिक्षणावर खर्च करण्याचे ठरविले. शाहू महाराजांनी राजाराम महाविद्यालयात शिक्षण घेणा-या स्त्रियांना फी माफीची सवलत दिली.

१८५१ मध्ये कोल्हापूर येथे सुरु झालेल्या इंग्रजी शाळेचे १८८१ मध्ये राजाराम महाविद्यालयात रुपातंर झाले. पुढे हे महाविद्यालय आर्य समाजाकडे सोपविले. १९०३ ला टेक्निकल स्कूलची स्थापना केली. गावाचा कारभार व्यवस्थित चालविण्यासाठी १९१९ ला पाटील स्कूल व तलाठी स्कूल सुरु केले. तांत्रिक शिक्षणासाठी जयसिंगराव घाटगे टेक्निकल इन्स्टिटयूटची स्थापना केली. यात विद्यार्थ्याना लोहारकाम गवंडीकाम, सुतारकाम इ. शिक्षण दिले जाई. विद्यार्थ्यामध्ये लष्करी जीवनाची आवड निर्माण व्हावी इन्फ्रंट्री स्कूल सुरु केले.

भारतीय वसतिगृहाचे आद्य जनक म्हणून त्यांची ओळख आहे. सर्व जातीजमातीच्या विद्यार्थ्यासाठी १८९६ मध्ये राजाराम वसतिगृह सुरु केले. यात फक्त बाह्मण विद्यार्थ्यानाच समाविष्ट केले गेले. त्यामुळे शाहू महाराजांनी निरनिराळ्या जातीसाठी वसतिगृहे सुरु केले. १९०१ मध्ये व्हिक्टोरिया मराठा बोर्डिग स्थापन केले. १८ एप्रिल १९०१ रोजी जैन वसतिगृहाची स्थापना स्थापना केली. १९०६ मध्ये वीरशैव लिंगायत विद्यार्थी वसतिगृह स्थापन केले तसेच मुस्लिम बोर्डिग हाउसची स्थापना केली. अस्पृश्यांसाठी १९०८ मध्ये मिस क्लर्क होस्टेलची स्थापना केली. १९११ मध्ये शिंप्प्यांसाठी नामदेव वसतिगृहाची स्थापना केली. १९२० मध्ये गरीब मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून क्ष्री. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिग हाउसची स्थापना केली. १९२१ मध्ये नाभिकांसाठी शिवकंठी शेष समाज बोर्डिगची स्थापना केली. १५ एप्रिल १९२० रोजी नाशिक येथे उदाजीराव मराठा विद्यार्थी वसतीगृहाच्या इमारतीची कोनशिला बसविली. महाराजांनी आपल्या कारकिर्दीत २०पेक्षा जास्त वसतिगृहे कोल्हापूरमध्ये स्थापन केली. म्हणून कोल्हापूरला वसतिगृहाची जननी असे शाहू महारांजानीच गौरविले.

नोव्हेंबर १८९९ मध्ये महाराज पंचगंगा नदीकाठी स्नानासाठी गेले असता पुरोहित नारायण भटजी वेदोक्त मंत्रा ऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणत होते. याचा खुलासा केला असता भटजींनी महाराज क्षत्रिय नसल्याचे सांगितले. यातून ब्राह्मन-ब्राह्मणेतार संघर्षाचे वेदोक्त प्रकरण सुरु झाले. आप्पासाहेब राजोपाध्यांचे वतन काढले (१९०१). १९०१ मध्ये महाराजांनी नारायण भट्ट सेवेकरी यांचेकडून वेदोक्त पध्दतीने क्ष्रवणी केली. महाराजांनी क्षात्रजगतगुरुचे नवे पीठ निर्माण करुन त्यावर मराठा जातीच्या सदाशिव बेनाडीकर यांची नेमणूक केली. निरनिराळ्या जातीचे पुरोहीत निर्माण करण्यासाठी पुरोहितांची शाळा काढली.

आरक्षणाचे आद्य जनक त्यांना म्हटले जाते . २६ जुलै १९०२ रोजी मागासलेल्या वर्गाकरिता सरकारी नोकरीत ५०% जागा राखीव ठेवण्याचा जाहिरनामा काढला. म. फुलेंनी सुरु केलेल्या ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्त्व शाहू महाराजांनी स्वीकारले. बहुजन समाजात शिक्षण प्रसार करणे, यासाठी त्यांनी १९१६ ला निपानी येथे डेक्कन रयत संस्थेची स्थापना केली. महाराजांवर सत्यशोधक समाजाचा प्रभाव होता. म्हणून ११जाने १९११ मध्ये कोल्हापूर येथे शाहू सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. सत्यशोधक समाजाच्या गुरुकुलाची पहाणी केली व १९१८ मध्ये कोल्हापुरात आर्यसमाजाची शाखा स्थापन केली.

शाहू महाराजांनी अस्पृश्यासाठी मिस क्लर्क वसतिगृह सुरु केले. तसेच मराठा विद्यार्थ्यासाठीच्या व्हिक्टोरिया वसतिगृहातही अस्पृश्य व मुस्लिमांना प्रवेश दिला. १९०६ ला रात्रशाळा तर मुलींसाठी १९०७ मध्ये रात्रशाळा सुरु केली. १९११ च्या हुकुमानुसार अस्पृश्यांना मोफत शिक्षण सुरु केले. १९१९ मध्ये अस्पृश्यता बंदी कायदा करुन अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा बंद केल्या. जून १९१८ मध्ये महार वतने बंद केली. ९ ऑगस्ट १९१८ रोजी अस्पृश्यांना लाचारीने वागविणारी बलुतेदारी व वेठबिगारीची प्रथा बंद केली.  त्यांनी अस्पृश्यांना व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले. गंगाधर कांबळे यास शहराच्या मध्यवस्तीत चहाचे दुकान उघडून दिले. महाराज स्वतः तेथे जाऊन चहा पित. १९१८ च्या हुकुमानुसार गुन्हेगार जमातीच्या लोकांना पोलिस चौकीवरची हजेरी बंद केली. २० मार्च १९२० मध्ये कोल्हापूर संस्थानातील माणगाव येथे भरलेल्या अस्पृश्यता परिषदेस हजर होते.

स्त्रियांसाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. १९१७ मध्ये विधवा पुनर्विवाहाचा कायदा व विवाह नोंदणीचा कायदा यांची अंमलबजावणी सुरु केली. १२जुलै १९१९ रोजी आंतरजातीय विवाह कायदा केला. आपल्या मुलीचा धनगर राजपुत्राशी विवाह करुन उक्तीव कृतीतील एकवाक्यता दाखवून दिली. २ऑगस्ट १९१९ रोजी स्रियांवरील अत्याचाराचा प्रतिबंध करणारा तसेच घटस्फोटास मान्यता देणारा कायदा पास केला. १७ जानेवारी १९२० रोजी अनौरस संतती व जोगतिणी –देवदासी निर्मूलन विषयक कायदा केला. १९२० मध्ये महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलची स्थापना केली.

१८९७ च्या दुष्काळात शेतक-यांना कर्जे, शेतसा-यात सूट दिली. जनावरांसाठी चा-याची सोय केली. शेतीस निश्चित पाणीपुरवठा व्हावा यासाठी १९०७ मध्ये कोल्हापूर पश्चिमेस ५५ किमी अंतरावर दाजीपूर नजीक भोगावती नदीवर महाराणी लक्ष्मीबाई तलाव नावाचे धरण बांधले. त्याच वर्षी आक्कासाहेबांचा विवाह देवासच्या महाराजांसोबत झाला. म्हणून धरणाशेजारीच राधानगरी हे गाव वसविले. अधिकारांचा दुरुपयोग करणा-या कुलकर्ण्याची वतने २८ फेब्रुवारी १९१८ मध्ये रद्द केली व पगारदार तलाठी नेमले . १९१२-१३ मध्ये किंग एडवर्ड ऍग्रिकल्चरल इन्स्टिट्यूटची स्थापना केली. १८९५ मध्ये गुळाच्या व्यापारासाठी प्रसिध्द असलेली शाहूपुरी बाजारपेठ रेल्वे स्टेशनजवळ वसविली. १९०६ मध्ये महारांजानी छत्रपती शाहू स्पिनिंग ऍन्ड विव्हिंग मिलचा पाया घातला. १९०७ मध्ये सहकारी तत्त्वावर एका कापड गिरणीची तंबाखूच्या व्यापारास उत्तेजन देण्यासाठी जयसिंगपूर वसाहत स्थापन केली.

बलोपासनेसाठी जुना राजवाड्यात आखाडा बांधला. कुस्त्यांसाठी खासबाग मैदान तयार केले. २०व्या शतकाच्या प्रारंभी देशातील पहिले रेसकोर्स कोल्हापूरला स्थापन झाले. महारोग्यांसाठी व्हिक्टोरिया लेप्रसी असायलमची १८९७ मध्ये स्थापना केली. शाहू महाराजांनी १९१२ मध्ये सहकारी कायदा केला.

१९१९ मध्ये कानपूर येथील कुर्मी क्षत्रिय समाजाच्या १३व्या परिषदेचे अध्यक्ष होते. भावनगर (गुजरात) येथे झालेल्या १९२० च्या आर्य समाज परिषदेचे अध्यक्षस्थान भूषविले.

२४ मे १९०० रोजी व्हिक्टोरियाराणीच्या वाढदिवसानिमित्त ब्रिटीश सरकारने त्यांच्या प्रजाहिताची कर्तव्य निष्ठा पाहून महाराजा ही पदवी दिली. १४ मे १९०२ ला सातव्या एडवर्डच्या राज्यरोहणास हजर होते त्या वेळी त्यांना केंब्रिज विद्यापिठाने एल.एल.डी. पदवी दिली. कानपूर येथे १९ एप्रिल १९१९ रो जी झालेल्या कुर्मी क्षत्रिय समाजाच्या परिषदेचे अध्यक्षपद भूषविले यातच २१ एप्रिल रोजी त्यांना राजर्षी ही बहुमानाची पदवी देण्यात आली.

शेतक-यांचा खरा राजा अशा शब्दांत शाहू महाराजांचा गौरव करतात. महर्षी वि.रा.शिंदेंनी महाराजाचा गौरव सर्वागंपूर्ण राष्ट्र पुरुष असा केला. यशवंतराव मोहिले यांनी महाराष्ट्राचे गौतमबुध्द या शब्दांत महाराजांचा गौरव केला. त्यांच्या लोकाभिमुख कार्यामुळे त्यांचा उल्लेख रयतेचा राजा असा केला जातो. ब्राह्मण त्यांना क्ष्रुद्र राजा म्हणून हिणवित तर, त्यांच्या राजकीय स्वातंत्र्याच्या विरोधामुळे त्यांना स्वराज्याचे शत्रू म्हणून विरोधक हिणवत. त्यांना २९ व्या शतकातील आदर्श राजा म्हणून ओळखतात.

६ मे १९२२ रोजी शाहू महाराजाचे वयाच्या ४८ व्या वर्षी २८ वर्षाच्या कारकिर्दीनंतर मुंबई येथील खेतवाडीतील पन्हाळा लॉज बंगल्यात अचानक निधन झाले. शाहू महाराजांचा २६ जून हा जन्मदिन महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिन म्हणून पाळला जातो.

No comments

Hindi vyakaran Mock Test

Scholarship Exam 2024 PAPER 1/2 : Hindi अनेकार्थी शब्द Start The Quiz Time's Up score: Next question See Your Result Total Quest...

Powered by Blogger.