डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (जन्म : महू (मध्य प्रदेश), १४ एप्रिल, इ.स. १८९१; मृत्यू : दिल्ली, डिसेंबर ६, इ.स. १९५६) हे जागतिक दर्जाचे भारतीय कायदेपंडित, अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, लेखक, प्राध्यापक, समाज सुधारक, वक्ते, पत्रकार, संपादक, स्वातंत्र्य सेनानी, संसदपटू, मानवी हक्कांचे कैवारी आणि बौद्ध धर्म पुनरुत्थानक होते. शिवाय ते भारत देशातील कोट्यवधी शोषित पददलितांचे उद्धारक आणि स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते. ते बाबासाहेब या नावाने प्रसिद्ध आहेत. कुशाग्र बुद्धी, प्रकांड विद्वता, तल्लख स्मरणशक्ती असलेले बहुआयामी आंबेडकर यांचे ज्ञानक्षेत्रातील सुमारे ६४ विषयांवर प्रभुत्व होते, एवढ्या सार्या विषयांवर प्रभुत्व असणारे जगाच्या इतिहासात ते एकमेव व्यक्ती आहेत, असे केंब्रिज विद्यापिठाचे संशोधन असून त्यांना जगाच्या इतिहासातील पहिली सर्वात बुद्धिमान व्यक्ती म्हणून सन्मानित केले आहे. त्यांच्या देशसेवेसाठी इ.स. १९९० साली भारत सरकारने त्यांना भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले.
सामाजिक आणि आर्थिक अडचणींवर मात करून महाविद्यालयीन पदवी मिळवणार्या दलितांच्या पहिल्या पिढीमधील ते एक होते. नंतर कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांतील अभ्यास व संशोधन यांसाठी त्यांना कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सयेथून विविध पदव्या मिळाल्या.
सुरुवातीचे जीवन
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म एप्रिल १४ इ.स. १८९१ साली महू या मध्यप्रदेशातील लष्करी छावणी असलेल्या गावात त्याकाळी अस्पृश्य गणल्या गेलेल्या महार कुटुंबात झाला. सुभेदार रामजी सकपाळ आणि भीमाबाई मुरबाडकर यांचे ते १४ वे अपत्य होते. हे कुटुंब मूळचे महाराष्ट्रातील रत्नागिरीजिल्ह्यातील आंबवडे या गावचे. त्यांचे पूर्वज ब्रिटिश सैन्यात नोकरी करत होते. त्यांच्या वडिलांना मराठी व इंग्रजी भाषांमध्ये थोडे शिक्षण मिळाले होते व त्यांनी आपल्या मुलांना शिकण्याची प्रेरणा दिली. इ.स. १८९६ मध्ये भीमरावांच्या आईचे-भीमाबाईंचे मस्तकशूळ या आजाराने निधन झाले. त्यानंतर भीमरावांचे संगोपन त्यांच्या आत्या मीराबाईंनी केले. त्या वयाने भाऊ रामजीपेक्षा मोठ्या आणि स्वभावाने प्रेमळ व समजूतदार होत्या, म्हणून रामजींसह सर्वजण त्यांचा आदर करीत असत.
रामजींनी इ.स. १८९८ साली दुसरे लग्न केले आणि कुटुंब मुंबईला नेले. तेथे भीमराव हे एलफिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेतील पहिले अस्पृश्य विद्यार्थी बनले. इ.स. १९०७ साली त्यांनी मॅट्रिक परीक्षा यशस्वीरीत्या पार केली व इ.स. १९०८ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या एलफिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. हा प्रसंग त्यांच्या समाजातील लोकांनी अभिमानाने साजरा केला. शाळेत असतानाच इ.स. १९०६ मध्ये त्यांचे लग्न दापोलीच्या रमाबाई (वय ९ वर्षे) यांच्याबरोबर ठरले. यानंतर अमेरिकेतील शिक्षणासाठी त्यांना बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांनी २५ रुपये प्रति महिना शिष्यवृत्ती दिली. इ.स. १९१२ साली त्यांनी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांमध्ये पदवी मिळवली व बडोदा संस्थानाच्या सरकारात नोकरीची तयारी केली. याच वर्षी त्यांचा मुलगा यशवंत याचा जन्म झाला.
२ फेब्रुवारी, इ.स. १९१३ मध्ये भीमरावांचे आजारी वडील रामजी यांचा मुंबईमध्ये मृत्यू झाला.
कबीर पंथीय असलेल्या रामजींनी मुलांना हिंदू धर्मातील साहित्याची ओळख करून दिली. इतर जातींतील लोकांच्या विरोधामुळे मुलांना सरकारी शाळेत शिकण्यासाठी त्यांना आपल्या लष्करातील पदाचा वापर करावा लागला. जरी शाळेत प्रवेश मिळाला तरी आंबेडकरांना इतर अस्पृश्य मुलांबरोबर वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे साहाय्य मिळत नसे.
प्राथमिक शिक्षण
भीमराव वयाने लहान असल्यामुळे ’कॅम्प दापोली’ येथील शाळेत त्यास प्रवेश देता आला नाही. यामुळे घरीच लहानग्या भीमरावास अक्षरओळख करावी लागली. इ.स. १८९६ मध्ये सुभेदार रामजींनी आपल्या परिवारासह दापोली सोडली. ते सातारा येथे सुरुवातीला एका साधारण घरात राहिले आणि थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात आपल्या परिवारासह राहू लागले. त्यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. हे वय त्यास शाळेत प्रवेश देण्यास योग्य होते. सुभेदार रामजींनी इ.स. १८९६ च्या नोव्हेंबर महिन्यात आपल्या दृष्टीने सुयोग्य अशा तारखेला सातारा येथील ’कॅम्प स्कूल’ मध्ये आपल्या लाडक्या भीमरावाचे नाव दाखल केले. अशा प्रकारे भीमरावांच्या शिक्षणाचा आरंभ झाला.
उच्च शिक्षण
· बी.ए. (बॅचरल ऑफ आर्ट्स) :
डॉ. बाबासाहेब तथा बी. आर. आंबेडकर यांनी मुंबई येथील एलफिन्स्टन कॉलेजमध्ये शिकून नोव्हेंबर १९१२ मध्ये मुंबई विद्यापीठाची बी.ए. ची परीक्षा दिली. जानेवारी १९१३ मध्ये ते बी.ए. च्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. तत्पूर्वी जानेवारी १९०८ पासून गुरुवर्य केळुसकर आणि निर्णय सागर छापखान्याचे मालक दामोदर सावळाराम यंदे यांच्या प्रयत्नांनी कॉलेजच्या शिक्षणासाठी बडोदा संस्थानचे महाराजसयाजीराव गायकवाड यांचेकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना रु. २५/- दरमहा शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली होती. मुंबई विद्यापीठाची बी.ए.ची पदवी संपादन करणारा अस्पृश्य वर्गातील पहिला विद्यार्थी होण्याचा मान आंबेडकरांना मिळाला.
· एम.ए. (मास्टर ऑफ आर्ट्स) :
महाराज बडोदा संस्थानच्या वतीने काही विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला पाठवण्याच्या विचारात होते. महाराज भीमरावांच्या इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वावर अत्यंत प्रसन्न होते. महाराजांनी, भीमरावांना होकार दिल्यामुळे दि. ४ एप्रिल १९१३ रोजी बडोदा संस्थानच्या विद्याधिकार्यांनी परदेशात अभ्यास करण्यासाठी चार विद्यार्थी निवडले, यात भीमराव आंबेडकर एक होते. या प्रत्येकास दरमहा साडे अकरा पाऊंड शिष्यवृत्ती मंजूर केली. त्यासाठी त्यांना एक करारपत्र लिहून द्यावे लागले. या करारपत्रावर साक्षीदार म्हणून त्रिभुवन जे. व्यास आणि अंताजी गोपाळ जोशी यांनी दिनांक १८ एप्रिल १९१३ रोजी सह्या केल्या. या करारानुसार शिष्यवृत्तीची मुदत दि. १५ जून १९१३ ते १४ जून १९१६ पर्यंत एकूण तीन वर्षांची होती. त्यानंतर बोटीने प्रवास करून डॉ. आंबेडकर दिनांक २० जुलै १९१३रोजी दुपारी १२ वाजता न्यूयॉर्क येथे पोहचले. बडोदा संस्थानचे स्कॉलर असलेले बाबासाहेब परदेशी उच्चशिक्षणासाठी प्रथमतः अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील कोलंबिया युनिव्हर्सिटीत गेले. राज्यशास्त्रशाखेमध्ये त्यांनी १९१३ ते १९१६ या तीन वर्षांसाठी प्रवेश मिळवला. त्यांनी या विद्याभ्यासाकरता प्रमुख विषय म्हणून समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे निवडले. न्यूयॉर्कमध्ये सुरुवातीस ते कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या हाईले हॉलमध्ये राहिले आणि नंतर रस्ता नं. ११४ वरील कॉस्मोपॉलिटन क्लब, न्यूयॉर्क पश्चिम ५६४ इथे राहिले, कारण इथे काही भारतीय विद्यार्थी रहात होते. तसेच सातारा हायस्कूलमधील त्यांचा एक वर्गमित्रसुद्धा तिथेच होता.
अर्थशास्त्र, राजकारण, मानववंशशास्त्र, नीतिशास्त्र, व्यापार, समाजशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास करून त्यांनी कोलंबिया विद्यापीठाला दि. १५ मे १९१५ रोजी अॅडमिनिस्ट्रेशन अॅन्ड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी हा प्रबंध सादर केला. दि. २ जून १९१५ रोजी या प्रबंधाच्या आधारावर त्यांना एम.ए. पदवी मिळाली. दरम्यानच्या काळात कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या ग्रंथालयात पुढे पंजाब केसरी म्हणून प्रसिद्ध झालेले लाला लजपतराय यांच्याशी ओळख झाली. बाबासाहेब ग्रंथालयात सर्वांच्या अगोदर हजर असत आणि सर्वात शेवटी बाहेर पडत असत. असा विद्यार्थी कोण याची उत्सुकतालाला लजपतराय यांना होती. त्या अनुषंगानेही त्यांची ओळख झाली. लाला लजपतराय हे लंडनहून न्यूयॉर्कला आलेले होते. असेच एकदा या दोन भारतीय विद्यार्थ्यांचा संवाद सुरू असताना प्राध्यापक सेलिग्मन तिथे आले. प्रा. सेलिग्मन यांचे संपूर्ण नाव एडविन रॉबर्ट अॅन्डरसन सेलिग्मन होय. त्यांनीसुद्धा या दोघांच्या संवादात भाग घेतला. प्राध्यापक एडविन सेलिग्मन हे विद्यार्थी भीमराव आंबेडकरांच्या राज्यशास्त्र आणि समाजशास्त्राचं सखोल ज्ञान ऐकून होते. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल गौरवपर उद्गार काढले, ते म्हणाले, "भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर अमेरिकन विद्यार्थ्यांमध्येसुद्धा सर्वाधिक बुद्धिमान विद्यार्थी आहेत."
प्रा. सेलिग्मन ज्यूधर्मीय होते. ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे पी.एच्.डी. पदवीसाठीचे मार्गदर्शक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याबाबत म्हणतात, ‘अमेरिकेत जाईपर्यंत माझे अनेक गुण सुप्तावस्थेमध्ये होते. अमेरिकेत गेल्यानंतर त्यांचा विकास करण्याचे काम प्रा. सेलिग्मन आणि इतर विद्वानांकडून झाले. अमेरिकेतील १९१३ ते १९१६ च्या वास्तव्यात बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात काही चांगले मित्र आणि विद्यापीठातील प्राध्यापक, मार्गदर्शक आले. कोलंबिया विद्यापीठातील वास्तव्यानंतरही अनेक वर्षं प्रा. सेलिग्मन यांच्याशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घनिष्ठ संबंध जोपासला होता. सिडनेहॅम कॉलेजमध्ये शिकवत असताना आंबेडकरांना अनेक विद्यार्थ्यांना कोलंबिया विद्यापीठात प्रा. एडविन सेलिग्मन यांच्याकडे पाठवले होते.
डॉक्टर ऑफ फिलॉसफी
‘भारताचा राष्ट्रीय लाभांश : इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन’ The National Divident of India : A Historical And Analytical Study हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पी.एच.डी. साठीचा विषय होता. त्यांनी १९१४ ते १९१६ या कालावधीत विद्याभ्यासाच्या परिश्रमाने लिहिलेला हा प्रबंध लिहिला. कोलंबिया विद्यापिठात १९१६ मध्ये डॉ. बाबासाहेबांनी पी.एच.डी. म्हणजेच डॉक्टर ऑफ फिलॉसफी ही उच्च पदवी अर्थशास्त्रामध्ये संपादन केली. संपूर्ण दक्षिण आशियातून अर्थशास्त्रामध्ये 'डॉक्टरेट' मिळवणारे बाबासाहेब हे पहिले व्यक्ती होत. कोलंबिया विद्यापिठामध्ये एम.ए. आणि पी.एच.डी. ह्या दोन उच्च पदव्या बाबासाहेबांनी केवळ अडिच वर्षात मिळवून विद्यापिठामध्ये विश्वविक्रम करून ठेवलेला आहे. कारण ह्या दोन पदव्या संपादन करण्यासाठी साधारणपणे ८ वर्ष कालावधी लागतो. अवघ्या २५ वर्षांच्या भीमराव आंबेडकरांनी एवढ्या गहन विषयावर प्रबंध लिहून ब्रिटिश साम्राज्यशाहीचे भारत सरकार हजारो मैल दूर असलेल्या ब्रिटिश पार्लमेंटमधील सेक्रेटरी ऑफ स्टेट (भारतमंत्री) यांच्यामार्फत कसा कारभार करत होते आणि त्यामुळे चाललेली सरकारी उधळपट्टी आणि बेजबाबदारपणा भारतीय जनतेस कसा पिळून काढत होता यावर प्रकाश टाकून, अंदाजपत्रक प्रथम कधी आले, प्रांतिक अर्थव्यवस्था केव्हापासून सुरू झाली, अर्थव्यवस्थेचा विस्तार कसा झाला याचे अभ्यासपूर्ण विवेचन करून जगातील सर्व देशांचे लक्ष या प्रबंधाकडे वेधून घेतले. जगात निरनिराळ्या देशातील नागरिकांना ज्या अनेक प्रकारच्या करांचे ओझे वहावे लागते त्याचा उल्लेख करून ब्रिटिश साम्राज्यशाही केंद्र सरकारचे कर, स्थानिक स्वराज्यसंस्थांचे कर तसेच प्रांतिक सरकारचे कर याची छाननी त्यावेळच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून केली. जगभरातील देशांना उपयोगी ठरणारा हा प्रबंध लिहिला. प्रा. सेलिग्मनसारख्या जगप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञाने या प्रबंधाचा गौरव केला. हा प्रबंध आठ वर्षांनी म्हणजे १९२५ मध्ये ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाला. आला. ग्रंथाचे नाव ‘ब्रिटिश भारतातील प्रांतिक अर्थव्यवस्थेची उत्क्रांती’ (Evolution of Provincial Finance in British India). हा ग्रंथ त्यांनी उच्चशिक्षणासाठी मदत केल्याबद्दल बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांना आदरपूर्वक अर्पण केला. हा ग्रंथ लंडनच्या प्रकाशकाने प्रसिद्ध केला. या ग्रंथात ब्रिटिशांवर प्रखर टीका करून आपण खरे राष्ट्रभक्त असल्याचे २६ व्या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्ध केले.
दिनांक ९ मे १९१६रोजी कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये समाजशास्त्राचे प्राध्यापक डॉ. ए. ए. गोल्डनवायझर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित झालेल्या मानववंशशास्त्र या विषयावर चर्चासत्रात आपला शोधलेख वाचण्याची संधी त्यांना मिळाली. त्यानुसार भारतातील जाती, त्यांची रचना, उत्पत्ती आणि वृद्धी Caste in India. Their Mechanism, Genesis And Development हा शोधनिबंध वाचून समाजशास्त्राच्या सार्याच विद्वानांचे लक्ष वेधले. The American Journal of Sociology या समाजशास्त्राच्या नियतकालिकामध्ये डॉ. आंबेडकरांच्या जातीवरील प्रबंधाचा निवडक भाग ‘या महिन्यातले जगातील उत्कृष्ट वाङ्मय’ World’s Best Literature Of The Month या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आला. या सन्मानार्थ कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसरांनी आणि विद्यार्थ्यांनी एक मेजवानीही डॉ. आंबेडकरांना दिली. कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये सनातनी समाजरचना विरुद्ध आधुनिक समाजरचना या विषयावर मोठा खल होत असे. या परिसंवादांमध्ये डॉ. आंबेडकर भाग घेत असत. मानववंशशास्त्रांच्या (Anthropolopy) शाखांमार्फत चालणार्या या चर्चांमध्ये विद्वत्ताप्रचुर संशोधनात्मक प्रबंध वाचले जात होते. त्यामुळे या विषयावर खोलवर अभ्यास करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांतील सूक्ष्म ज्ञानामुळे त्यांनी जातीवरील प्रबंध लिहिताना सर्वस्वी नवीन असा सिद्धान्त उभा केला.
अमेरिकेत प्रवेश केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतातले चित्र आणि अमेरिकेतील चित्र वेगवेगळे दिसून आले. इथे शिवाशिवीचा/ अस्पृश्यतेचा प्रश्नच नाही, कोणत्याही प्रकारची मानहानी नाही. अमुक विषय घ्यायचा तमुक विषय घ्यायचा नाही असे कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. कारण अमुकच जातीत जन्म घेतला आहे. अमुक जातीतील जन्मामुळे केस कापणे, कपडे लाँड्रीला देणे, वाहनात बसू न देणे, पिण्याचे पाणी न देणे, शाळांमध्ये शिक्षक दुरून छड्या मारतात असे चित्र अमेरिकेत पहायला मिळत नव्हते. प्रोफेसर कितीतरी आत्मीयतेने शिकवत होते. कोलंबिया युनिव्हर्सिटीतील विद्वान प्रोफेसर सेलिग्मन आणि प्रो. सिगर हे विद्यार्थी भीमरावांशी समतेच्या भूमिकेवर चर्चा करत असत आणि शिकवत असत. या घटनांतूनच डॉ. आंबेडकरांना नवचैतन्य प्राप्त झाले. समतेची मिळालेली अमेरिकेतील वागणूक डॉ. आंबेडकरांच्या मनावर खोलवर बिंबली होती. त्यामुळेच पुढे भारतात आल्यावर त्यांनी समतेवर आधारित समाजरचना घडवण्यासाठी सारे सामाजिक लढे केलेले दिसून येतात.
अस्पृश्यतेविरुद्ध संघर्ष
बाबासाहेबांनी एक आघाडीचे भारतीय विद्वान या नात्याने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट १९१९बाबत साऊथबरो कमिटीसमोर आपले विचार मांडले. यावेळी आंबेडकरांनी दलित व इतर मागासलेल्या समाजांसाठी वेगळे मतदान विभाग व आरक्षण यांची मागणी केली. इ.स. १९२० साली त्यांनी मुंबईत मूकनायक नावाचे वृत्तपत्र सुरू केले. या वृत्तपत्राच्या प्रसिद्धीचा फायदा घेऊन त्यांनी सनातनी हिंदू नेत्यांवर आणि जातिभेदाविरुद्ध काहीही करत नसलेल्या भारतीय राजकारण्यांवर टीका केली. कोल्हापुरातील मागासवर्गीयांच्या सभेमध्ये त्यांनी केलेल्या भाषणामुळे छत्रपती शाहू महाराज खूश झाले व त्यांनी आंबेडकरांबरोबर जेवण करून हिंदू समाजाला धक्का दिला. आंबेडकरांनी यानंतर वकिलीचा व्यवसाय सुरू केला आणि मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी बहिष्कृत हितकारिणी सभा सुरू केली.
महाडचा चवदार तळे सत्याग्रह
संपूर्ण देशात बहुसंख्य दलितांवर सवर्ण लोकांनी गुलामगिरी लादलेली होती. देशातील दलितांना उच्चवर्णीयींकडून खूप अपमानास्पद वागणूक मिळत होती. अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्याचा किंवा पिण्याचा साधा अधिकार देखिल नव्हता. ४ ऑगस्ट १९२३ रोजी ब्राह्मणेतर पक्षाचे नेते सी. के. बोले यांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळात एक ठराव पास करून घेतला. त्यानुसार सार्वजनिक पाणवठे, धर्मशाळा, विद्यालये, बगिचे इत्यादी ठिकाणी अस्पृश्यता पाळू नये. या ठरावानूसार महाडच्या नगरपालिकेने आपल्या ताब्यातील चवदार तळे अस्पृश्यांना खुले केल्याचे जाहिर केले. परंतु स्पृश्यांनी अस्पृश्यांना तळ्याचे पाणी भरू दिले नाही. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांमध्ये धाडस आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आणि त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी महाड येथे चवदार तळ्यातील पाण्यासाठी सत्याग्रह करण्याचे ठरवले. बाबासाहेबांनी १९ मार्च व २० मार्च २०२७ रोजी महाड येथे कुलबा परिषद आयोजित केली. या परिषदेतेचे अध्यक्ष स्वत: बाबासाहेब होते. या परिषदेस सुरेंद्र चिटणीस, संभाजी गायकवाड, अनंत चित्रे, रामचंद्र मोरे, गंगाधर पंत सहस्त्रबुद्धे आणि बापूराव जोशी हे दलितेत्तर सवर्ण व ब्राह्मण नेते होते. या परिषदेत अस्पृश्यतेचा धिक्कार करून पुढील ठराव पास केले. १) स्पृश्य (सवर्ण) लोकांनी अस्पृश्यांना आपल्या नोकरीत ठेवावे. २) स्पृश्य लोकांनी अस्पृश्यांना त्यांचे नागरिकत्वाचे अधिकार बजाविण्याच्या कामात मदत करावी. ३) मृत जनावरे ज्याची त्यांनी ओढावी. ४) स्पृश्यांनी अस्पृश्य विद्याथ्यांना वार लावून जेवण द्यावे.
परिषदेच्या या सभेमध्ये असे ठरले की, सर्व प्रतिनिधींनी तेथे जाऊन पाणी पियायचे त्यानुसार दुस-या दिवशी म्हणजेच २० मार्च १९२७ रोजी परिषदेतील सर्वांनी आपला मोर्चा चवदार तळ्याकडे वळवला. डॉ. बाबासाहेबांनी सर्वप्रथम तळ्यातील पाणी ओंजळीने पिले त्यानंतर सत्याग्रहातील त्यांच्या सर्व अनुयायांनी त्यांचे अनुसरण करत तळ्याचे पाणी पिले. हि मानवतावादी घटना रूढीवादी स्पृश्य हिंदूंना सहन झाली नाही. त्यांनी हजारों दलितांसाठींच्या भोजनामध्ये माती मिसळली त्यानंतर दलितांवर लाठ्यां-काठ्यांनी हल्ले केले आणि दलितांनी तळे बाटवले म्हणून त्यात गोमूत्र टाकून तळ्याचे ब्राह्मणांकडून शुद्धिकरण केले गेले. पुढे महाडच्या नगरपालिकेने अस्पृश्यांना चवदार तळे खुले केल्याचा ठरावही रद्द केला. त्यामुळे बाबासाहेबांनी २५ व २६ डिसेंबर रोजी महाड येथे सत्याग्रह परिषद घेण्याचे ठरवले. या परिषदेचा उद्देश स्पष्ट करताना युगपुरूष डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की, "आतापर्यंत आम्ही या तलावाचे पाणी पिऊ नाही. किंबहूना आम्हाला पिऊ दिले नाही. आता आम्ही पाणी पिले म्हणजे आमचे दु:ख दूर होईल, आमची परिस्थिती सुधारेल, आमच्यावरील अन्याय कमी होईल असा अर्थ नसून हा केवळ एका मानवाने दुस-या मानवाला समानतेने वागवाने व सर्व मानवाला समानतेचा अधिकार आहेत. हिच समतेची मुहूर्तवेढ रोवण्यासाठी जगाच्या पाठीवरील केवळ पिण्याच्या पाण्यासाठी केलेला हा बाबासाहेबांचा महान सत्याग्रह इतिहासातील पहिला आणि एकमेव सत्याग्रह म्हणून ओळखला जातो.
मनुस्मृतीचे दहन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते दलितांच्या सर्व समस्या या मनुस्मृतीमुळे निर्माण झालेल्या आहेत. हिंदूंच्या दृष्टीने मनुस्मृती हा ग्रंथ अत्यंत आदरणीय असून अस्पृश्यांच्या दृष्टीने मात्र तो प्रचंड तिरस्कारणीय आहे. हा ग्रंथ सुमारे २००० वर्षापूर्वी मनुने लिहिला असला तरी तो रूढीवादी हिंदूंच्या जीवनाचे आजही नियंत्रण करतो. कुप्रसिद्ध मनुस्मृतीने कनिष्ठ जातींवर अनेक अपात्रता लादल्या तर उच्च जातींना अनेक विशेषाधिकार दिले. मनुस्मृती हा ग्रंथ अस्पृश्यांवर होणा-या अन्यायाचे, क्रुरतेचे व विषमतेचे प्रतीक आहे. म्हणून सर्व प्रकारची विषमता व शोषण नष्ट करण्यासाठी समतेचे थोर पुरस्कर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विषमतेचा पुरस्कर्ता असलेल्या मनुस्मृतीचे २५ डिसेंबर १९२७ रोजी समारंभपूर्वक जाहिरपणे दहन केले आहे. या मनुस्मृतीने हिंदू समाजाचे दीड-दोन हजार वर्षे वियमन केलेले होते. आणि त्यामुळे ती, परिषदेच्या ठरावातील भाषेनूसार, शूद्रजातीचा उपमर्द करणारी, त्यांची प्रगती खंटवणारी, त्यांचे आत्मबल नष्ट करून सामाजिक, राजकिय व आर्थिक गुलामगिरी कायम करणारी होती. ही घटना म्हणजे इतिहासातील एक महान मूर्तीभंजक कृती होती होती आणि हजाराहून अधिक वर्षाच्या कालावधीत बसला नसेल असा सनातनी हिंदू धर्मलाबसलेला तो जबरदस्त धक्का होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या मनुस्मृती दहनाचे परिणाम इतके दूरगामी होते की, त्या घटनेची तुलना त्यांच्या काही अनुयायांनी ल्युथरने केलेल्या पोपच्या (ख्रिश्चन धर्मगुरू) धर्मबहिष्कृततेच्या आज्ञेच्या दहनाशी केले.
१९३८ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत स्वत: बाबासाहेबांनी मनुस्मृती दहनाच्या प्रतिकात्मक स्वरूपावर जोर देऊन म्हटले होते, ' ते एक दक्षतेचे उचललेले आक्रमक पाऊल होते. परंतु ते सवर्ण हिंदूंचे लक्ष वेधून घेण्यासाठी उचलेले होते. अधूनमधून अशा प्रकारचे तीव्र उपाय योजावे लागतात. तुम्ही दार ठोठावलेच नाही, तर ते कोणी उघडणार नाही. मनुस्मृतीचे सर्व भाग टाकाऊ आहेत आणि त्यात चांगली तत्त्वे मुळीच नाहीत किंवा मनु स्वत: समाजशास्त्रज्ञ नव्हता, तर केवळ मुर्ख माणूस होता, असा त्याचा अर्थ नाही. आम्ही मनुस्मृतीचे दहन केले ते शतकानुशतके आम्ही ज्या अन्यायाखाली चिरडले गेलो त्याचे प्रतिक म्हणून..!'
दरवर्षी २५ डिसेंबर हा दिवस मनुस्मृती दहन दिन म्हणून आंबेडकरी समाज हा देशभर नव्हे तर जगभर साजरा करतो.
अंबादेवी मंदिर सत्याग्रह
हिंदू धर्म हा प्राणी मात्रावर दया करावी, सर्व मानव हे ईश्वरांची लेकरे अशी शिकवण देतो. परंतु याच हिंदू धर्मात त्या ईश्वरांची पूजा करणासाठी देखील बहुसंख्य दलितांचा अधिकार नाकारला जातो. कारण अस्पृश्यांनी मंदिरात प्रवेश केल्यानंतर मंदिरे बाटतील, सामाजिक अनर्थ घडेल अशी तत्कालीन परिस्थीतीमध्ये समजूत होती. ही गोष्ट बाबासाहेबांना मान्य नव्हती. मानवी समानतेसाठी ज्याप्रमाणे सत्याग्रह करावा लागला. त्याचप्रमाणे हिंदू मंदिरातही प्रवेश करावा लागेल याची जाणीव बाबासाहेबांना झाली.
म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला. देवाच्या दर्शनासाठी हा मंदिर सत्याग्रह नव्हता तर हिंदू असूनही हिंदूच्या मंदिरात प्रवेश मिळत नसल्यामुळे तो समानतेचा अधिकार मिळवण्यासाठी हा मंदिर प्रवेशाचा संघर्ष होता. हिंदू दलितांच्या मंदिर प्रवेशामुळे मंदिर व मंदिरातील मुर्ती अपवित्र वा अशुद्ध होत नाही, हे ही सिद्ध करण्याचा हेतू या चळवळीमागे होता.अमरावती येथील प्राचीन 'अंबादेवी मंदिरात' प्रवेशासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा सत्याग्रह डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली २६ जून १९२७ रोजी सुरू झाला. या मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देण्यात यावा यासाठी अस्पृश्यांनी देवस्थान कमिटीकडे दोन वेळा अर्ज केला. सुरूवातीला अर्ज फेटाळले गेले नंतर मात्र देवस्थानचे एक विश्वस्त दादासाहेब खापर्डे यांनी अस्पृश्यांना हे मंदिर खुले करून देण्याचे आश्वासन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दिले.
पर्वती मंदिर सत्याग्रह
अमरावती नंतर पुण्यातील 'पर्वती टेकडीवरील मंदिर' अस्पृश्यांना खुले नव्हते. हा बाबासाहेबांचा दुसरा मंदिर सत्याग्रह आहे. हे मंदिर दलितांसाठी खुले करावे म्हणून पुण्यातील एम एम जोशी, ना ग गोरे, रा के खाडीलकर व शिरूभाऊ लिमये यांनी मंदिराच्या ट्रस्टला त्यांचा अर्ज केला. परंतु मंदिर खाजगी मालमत्ता असल्याचे सांगून ट्रर्टने अर्ज फेटाळला. यानंतर मंदिर प्रवेशासाठी एक सत्याग्रह मंडळ स्थापन केले गेले. त्यात शिवराम काबंळे (अध्यक्ष), पां ना राजभोज (उपाध्यक्ष) व इतर सभासदांचा सहभाग होता. या सर्वांनी १३ ऑक्टोंबर १९२९ रोजी पुणे पर्वती सत्याग्रह सुरू केला. यात शिवराम कांबळे, एम एम जोशी, ना ग गोरे, रा के खाडीलकर, विनायक भुस्कुटे, पां ना राजभोज व स्वामी योगानंद यांच्यासहित हजारों स्त्री पुरूषांनी सत्याग्रहात भाग घेतला होता. सवर्ण हिंदूनी सत्याग्रहींवर शिव्या व काठ्यांचा वर्षाव केला असला तरी एक सामाजिक समतेची मुहूरितवेढ रोवण्यासाठी केलेला हा क्रांतीकारी प्रयत्न इतिहास विसरू शकणार नाही.
काळाराम मंदिर सत्याग्रह
अमरावती पुण्यांतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक मुक्कामी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाची घोषणा केली. त्यामुळे सर्वसामान्यांच्या अंगात नवचैतन्य संचारले. २ मार्च १९३० ही सत्याग्रहाची तारीख निश्चित झाली. सत्याग्रही कमिटीचे अध्यक्ष म्हणून केशव नारायण वर्धेकर ऊर्फ बुवा यांची निवड केली होती. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सचिव होते, तर नाशिकचे शंकरराव गायकवाड हे सभासद म्हणून समाविष्ट झाले होते. या कमिटीतर्फे महाराष्ट्रभर सत्याग्रहाबद्दल जनजागृती करण्यात आली. शंकरराव गायकवाड ऊर्फ बेलमास्तर हे मूळचे निफाड तालुक्यातले, पण नाशिकला ‘मोठा राजवाडा’ परिसरात स्थायिक झाले होते.
रामकुंडात उडी घेऊन सत्याग्रह यशस्वी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. गोदावरीच्या तीरावर जनता सत्याग्रहासाठी सज्ज होती. ब्रिटिश पोलिसही रामकुंडावर पहारा देत होते. शहरात तणावपूर्ण शांतता होती.
अंगरखा, धोतर, पुणेरी जोडा, पंचा, कपाळावर गंधाचे तीन आडवे पट्टे व मधोमध लाल रंगाचा गोल कुंकवासारखा टिळा अशा वेशात शंकरराव २ मार्चला रामकुंडावर आले व अंगातील वेश उतरवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय’ अशी जोरदार घोषणा देत त्यांनी पाण्यात उडी घेतली. पोलिसांनी त्यांना कुंडाबाहेर काढून बेदम मारहाण केली. आंबेडकरी चळवळीतील तरुणाने रामकुंडात उडी घेतल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. ब्रिटिश जिल्हाधिकारी गार्डन रामकुंडावर आले. सत्याग्रहींचा जोश व दृढ निश्चय पाहून त्यांनी मंदिर खुले करण्याचे आश्वासन दिले. बाबासाहेबांनी मंदिरासमोर धरणे धरले. शेवटी अनेक संघर्षातून १९३६ नंतर काळ्या रामाचे मंदिर अस्पृश्यांसाठी काही प्रमाणात खुले करण्यात आले.
सत्याग्रह यशस्वी करणार्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची त्यानंतर वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. मोठया राजवाड्याच्या परिसरातील जाहीर सभेत या धाडसाबद्दल त्यांना बेलमास्तर ही पदवी बहाल करण्यात आली.
सत्याग्रहाबद्दल गुन्हा दाखल झाल्यावर न्यायालयात त्यांना तुमचा जामीनदार कुठे आहे’, अशी विचारणा करताच त्यांनी डॉ. आंबेडकर माझे जामीनदार असून ते इंग्लंडमध्ये आहेत, असे सांगितल्याने न्यायालयाने त्यांना सात दिवस साध्या कैदेची शिक्षा ठोठावली.
डॉ. आंबेडकर यांनी भारतात परतल्यावर दादासाहेब गायकवाड, सावळीराम दाणी, सखाराम वस्ताद काळे, तुळशीराम काळे, अमृतराव रणखांबे, रंगनाथ भालेराव व भादुजी निकाळे यांच्या उपस्थितीत बेलमास्तरांचा सत्कार केला.
कर्मवीर शंकरराव गायकवाड यांचे १६ ऑक्टोबर १९५६ ला निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ नाशिक-पुणे रोडवर वडाळा नाक्यावरील चौकाचे भूतपूर्व नगराध्यक्ष डॉ. वसंतराव गुप्ते यांच्या हस्ते शंकरराव श्रावण गायकवाड ऊर्फ बेलमास्तर चौक असे नामकरण करण्यात आले. [७]
इ.स. १९२८ मध्ये बाँबे प्रेसिडेन्सी कमिटीवर आंबेडकरांची नेमणूक करण्यात आली व त्यांनी सायमन कमिशनबरोबर काम केले. निवडणुकींमधील सुधारणांसाठी त्यांनी काही नवीन मुद्दे सुचवले.
पुणे करार
इ.स. १९२० च्या दशकाच्या अखेरीस आंबेडकर दलितांचे एक नामवंत राजकीय नेते बनले होते. जातिसंस्थेविरुद्ध काहीही न करणऱ्या पक्षांना त्यांनी आपल्या टीकेचे लक्ष बनवले. महात्मा गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेस यांच्यावर दलितांना दयनीय परिस्थितीत ढकलल्याचा आरोप केला. ब्रिटिश सरकारावरही ते नाराज होते व त्यांनी दलितांसाठी एक नवीन राजकीय आघाडी काढली. ८ ऑगस्ट १९३० साली मागासवर्गीयांच्या सभेमध्ये आंबेडकरांनी आपला राजकीय दृष्टिकोन लोकांसमोर जाहीर केला, मागासवर्गीयांनी काँग्रेस व ब्रिटिश यांपासून स्वतंत्र झाल्याशिवाय ते सुरक्षित होणार नाहीत असे त्यानी सांगितले. या भाषणात त्यांनी मिठाच्या सत्याग्रहाचा समाचार घेतला. या टीकेमुळे सनातनी हिंदू संतापले.
पुणे करार (संक्षिप्त मसुदा)
१) प्रांतीय विधानसभांमध्ये साधारण निवडणूक क्षेत्रांमधील जागांपैकी दलित वर्गासाठी ज्या राखीव जागा ठेवण्यात येतील त्या येणेप्रमाणे : मद्रास-३०, मुंबई व सिंध मिळून-१५, पंजाब-७, बिहार व ओरिसा-१८, मध्यभारत-२०, आसाम-७, बंगाल-३०, मध्यप्रांत-२० अशा प्रकारे एकूण १४८ जागा अस्पृश्यांसाठी देण्यात येतील.
२)या जागांची निवडणूक संयुक्त निवडणूक संघ पद्धतीद्वारे केली जाईल. प्रत्येक राखीव जागेसाठी दलित वर्गातील ४ उमेदवारांचे पॅनल निवडले जाईल. या चार उमेदवारांतून ज्याला सर्वाधिक मते मिळतील तो विजयी उमेदवार जाहीर होईल.
३)केंद्रीय कार्यकारिणीमध्ये दलित वर्गाचे प्रतिनिधित्व वरील कलम दोननुसार होईल.
४)केंद्रीय कारिणीमध्ये दलित वर्गाच्या राखीव जागांची संख्या १८% असेल आणि त्यांची निवड वरील प्रकारे होईल
५)उमेदवारांच्या पॅनलच्या प्राथमिक निवडींची व्यवस्था ज्यांचा वर उल्लेख केला आहे अशा केंद्रीय तसेच प्रांतिक कार्यकारिणींसाठी पहिल्या १० वर्षांनंतर समाप्त होईल.
६)जोपर्यंत दोन्ही संबंधित पक्षांद्वारा आपसांत समझौता होऊन दलितांच्या प्रतिनिधीस हटविण्याचा सर्वसंमत निर्णय होत नाही, तोपर्यंत प्रांतीय व केंद्रीय कार्यकारिणीमध्ये दलितांच्या जागांचे प्रतिनिधित्व कलम १ व ४ मध्ये दिले आहे त्याप्रमाणे अंमलात असेल.
७)केंद्रीय व प्रांतिक कार्यकारिणींच्या निवडणुकीत दलितांचा मतदानाचा अधिकार लोथियन समितीच्या अहवालानुसार असेल.
८)दलिताना स्थानिक निवडणुका व सरकारी नोकरीसाठी जातीय कारणामुळे डावलल्या जाऊ नयेत. पात्रता असलेल्या प्रत्येक दलितास नोकरीत घ्यावे.
९)सर्व प्रांतांत शैक्षणिक अनुदान देऊन दलितांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करण्यात यावे.
असा होता पुणे करार :-
मसुदा तयार झाला, आता सह्या करण्याची वेळ आली तेवढ्यात मद्रासच्या अस्पृश्यानी एम.सी. राजा यानी करारावर सही केल्यास आम्ही बाबासाहेबांना सही करू देणार नाही अशी विरोधाची भूमिका घेतली. कारण या एम.सी. राजांनी मुंजेसोबत जो करार केला होता तो अस्पृश्यांचा घात करणारा होता. त्यामुळे अशा अस्पृश्यद्रोहींनी या करारावर सही करू नये अशी मद्रासच्या दलितांची मागणी होती. शेवटी यातही तडजोड करण्यात आली व सह्या करण्यात आल्या. अस्पृश्य वर्गाच्या वतीने बाबासाहेबानी मुख्य सही केली तर सवर्णांच्या वतीने पंडित मदन मोहन मालवीय यांनी सही केली.
इतर सर्व सभासदांनीही सह्या केल्या. अन तिकडे तुरुंगांतही एकच जल्लोष उडाला. गांधीनी उपोषण सोडले. त्यांनी बाबासाहेबांचे अभिनंदन केले.अस्पृश्यतानिवारणा बाबत गांधीजी आणि आंबेडकर ह्यांच्यात मतभेद होते. म्हणून साम्राज्याशाहीविरोधी पातळीवर कॉग्रेसची आणि आंबेडकरांची एकजूट होऊ शकली नाही. तथापि, गांधीजीबद्दल मनात विरोधाची एवढी भावना असताना केवळ त्यांचे प्राण वाचविण्यासाठी म्हणून अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची आपली मागणी त्यांनी मागे घेतली. आणि पुणे 'करारा' वर सही केली. नथुराम गोडसे सारख्या एका ब्राह्मणाने गांधीजींचा प्राण घ्यावा आणि आंबेडकरांसारख्या एका महाराने गांधीजींचा प्राण वाचवावा ह्याचा अर्थ हिंदूसमाजाला अगदी उमजू नये ह्यांचे अत्रे यांना दु:ख होते. 'पुणे करारा'वर आंबेडकरांनी सही करून गांधीजींचे प्राण वाचविले, पण स्वत:चे व अस्पृश्य समाजाचे फार मोठे नुकसान करून घेतले. कारण ज्या उमद्या दिलाने आणि खेळाडू भावनेने आंबडकरांनी 'पुणे करारा' वर सही केली तो उमदेपणा आणि तो खेळाडूपणा कॉग्रेसने मात्र आंबेडकरांशी दाखवला नाही. आपल्याला कनिष्ठ असलेल्या महारेतर अस्पृश्यांना हाती धरून कांग्रेसने आंबेडकरांचा आणि त्यांच्या अनुयायांचा सार्वत्रिक निवडणुकांत पराभव केला[८]
२५ सप्टे १९३२ रोजी सर्व पुढारी करार मंजूर करण्यासाठी मुंबईत आले. ब्रिटिश महाराज्यपालाना या कराराची माहिती तारेने कळविण्यात आली. मुंबई राज्यपालांच्या कार्यवाहांना दोन्ही पक्षाच्या पुढाऱ्यांनी प्रत्यक्ष माहिती दिली. २६ सप्टे १९३२ रोजी ब्रिटिश मंत्रिमंडळाने पुणे करार मंजूर करून घेतला. त्यावर मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले. तिकडे दिल्लीत हिंदु महासभेनेही आपली मंजुरी दिली. अशा प्रकारे पुणे करार घडवून गांधीनी दलितांचे अत्यंत महत्त्वाचे असे दोन अधिकार काढून घेतले. मात्र हेच अधिकार शीख, मुस्लिम व ख्रिश्चनांना खुशाल बहाल केले.[९]
इ.स. १९३२ साली राव बहाद्दूर राजा यांनी दोन उजव्या विचारसरणीच्या काँग्रेस नेते बी. एस. मुंजे[१०][११] व जाधव यांबरोबर एक करार केला. या करारानुसार मुंज्यांनी राजांना पाठिंब्याच्या बदल्यात काही आरक्षित जागा अनुसूचित जातीमधील लोकांना देण्याचे ठरविले. या घटनेमुळे आंबेडकरांनी संपूर्ण भारतात दलितांसाठी विभक्त मतदारसंघांची मागणी केली. आंबेडकरांचे महत्त्व आणि दलितांमधील जनाधार वाढला आणि त्यांना इ.स. १९३१ साली लंडन येथील दुसर्या गोलमेज परिषदेचे निमंत्रण आले. या परिषदेत त्यांचे गांधीजींबरोबर विभक्त दलित मतदारसंघावरून मतभेद झाले. गांधीजींना धार्मिक वा जातीय आधारावर विभक्त मतदारसंघ मान्य नव्हते, त्यांना यामुळे भविष्यात हिंदू समाज दुभंगण्याची भीती वाटत होती.
जेव्हा ब्रिटिशांनी आंबेडकरांची मागणी मान्य केली, तेव्हा गांधीजींनी येरवडा तुरुंगात उपोषण सुरू केले. सनातनी हिंदू समाजाला अस्पृश्यतेचे निर्मूलन करण्यास सांगून हिंदूंमध्ये राजकीय आणि सामाजिक एकी आणण्याचे आव्हान केले. गांधीजींच्या उपोषणाला लोकांकडून मोठा पाठिंबा मिळाला आणि हिंदू नेत्यांनी आंबेडकरांबरोबर येरवडा येथे बैठका घेतल्या. गांधीजींच्या मृत्यूनंतर दलित समाजाविरुद्ध दंगली होऊन विनाकारण त्रास होईल असे वाटून आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी आरक्षित मतदारसंघांसाठी मान्यता दिली. यामुळे स्वतंत्र मतदारसंघ मिळाले नसले, तरी दलितांना जास्त जागा मिळाल्या. दलितांच्या राजकीय अधिकारांना बगल देण्यासाठी गांधीजींनी खेळलेली राजकीय चाल असे आंबेडकरांनी या उपोषणाचे नंतर वर्णन केले.
शैक्षणिक विचार
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्त्व समाजात विशद केले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही, असे ते समाज बांधवांना सांगत. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे सांगत. प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की, मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाली की, तो किंवा ती पूर्णपणे सुशिक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करूनच बाहेर पडावी. शासनाने यासाठी लक्ष द्यायला हवे त्यांचे म्हणणे हाते की, समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे. शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या सशक्त होते. व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो. प्रज्ञा, शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज त्यांनी प्रतिपादन केलेली आहे. शाळेत मुलांना केवळ बाराखडी शिकवू नये तर मुलांची मने सुसंस्कृत व गुणवत्तामय बनवावी. समाजहितार्थ या ज्ञानप्राप्त मुलांनी आपली सामाजिक बांधिलकीची कर्तव्ये योग्य व समर्थपणे पार पाडावीत असे शिक्षण असावे. शाळा म्हणजे उत्तम नागरिक व कर्तव्यदक्ष नागरिक बनविणारे कारखाने आहेत. याचे भान या प्रक्रियेत भाग घेणाऱ्यांनी ध्यानी घ्यावे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापन १९४६साली करुन त्यांनी मुंबईला सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरू केले. राष्ट्रहित व समाजहिताचे भान ठेवणारेच खरे शिक्षण होय असे ते मानीत. [१२]
भारताच्या स्वातंत्र्याबद्दलचे विचार
स्वतंत्र भारतातील लोकशाहीविषयी चिंतन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, जोपर्यंत इंग्रज सरकार होते, तोपर्यंत आपल्या देशातील चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपण त्यांच्यावर टाकत होतो. पण आता आपण स्वतंत्र झाल्यामुळे चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपलीच राहणार आहे. त्यामुळे आपल्याला आता अधिक जबाबदारीने वागावे लागणार आहे. देशाच्या सुरक्षिततेच्या संदर्भात डॉ. बाबासाहेब म्हणतात... भारताचे स्वातंत्र्य आपल्याच लोकांच्या विश्वासघाताने गेले आहे. आपल्याच लोकांनी देशद्रोह केला आणि भारत देश दुसर्यांच्या हाती दिला. महंमद बीन कासीमने जेव्हा सिंधवर स्वारी केली तेव्हा राजा दाहीरच्या सेनापतीने लाच घेतली आणि तो आपल्या राजाच्या मदतीला धावला नाही. यामुळे राजा दाहीरचा पराभव झाला. महंमद घोरीला भारतावर स्वारी करण्याचे आमंत्रण राजा जयचंदने दिले. शिवाजी महाराज स्वराज्यासाठी लढत होते, तेव्हा इतर मराठे सरदार शिवाजी महाराजांविरुध्द लढत राहिले. आता पुन्हा तसेच होणार नाही ना? अशी मला चिंता वाटते. जर नेत्यांनी आपल्या पक्षाचे मत हे राष्ट्र हितापेक्षा श्रेष्ठ मानले तर भारताचे स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात येईल. असे झाले तर पुन्हा स्वातंत्र्य मिळविणे अशक्यच होऊन बसेल. यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आपण आपल्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे. मी हिंदू, मी मुसलमान, मी ख्रिश्चन, मी शिख, मी जैन-बौद्ध यांना दुय्यमत्व देवून, मी प्रथम भारतीय व अंतिमत:ही भारतीयच आहे असे आपण मानलेच पाहिजे.
डॉ. बाबासाहेबांच्या या विचारांच्या शब्दाशब्दात राष्ट्रप्रेम वास करीत आहे. त्यामुळे त्यांना कुणी केवळ दलितांचे किंवा संविधानाचे निर्माते म्हणून सीमित करण्याचे काम करू नये.
धर्मांतराची घोषणा
बाबासाहेब दलितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी दिवसरात्र झटत राहिले. सवर्णाच्या मनात कधी तरी अस्पृश्यांबद्दल सद्भावना जागृत होईल या आशेवर ते सतत प्रयत्नशील होते. हिंदू धर्मात आपल्याला आदराची वागणूक देण्यात यावी यासाठी त्यानी मोठा लढा दिला. आधीच्या पाच वर्षापासून नाशिकच्या़ काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या जिकरीने लढा चालवीत होते. पण पाषाणहृदयी हिंदूना अस्पृश्य कधीच मानवाच्या बरोबरीचे वाटत नव्हते. त्याना दलित व अस्पृश्य जनता ही नेहमी कुत्र्यामांजरापेक्षाही खालच्या दर्जाची वाटे. याचा एकंदरीत परिणाम असा झाला की बाबासाहेबानी समतेसाठी केलेला झगडा पाच वर्षात मातीला मिळाला. याच दरम्यान जेव्हा नाशिकचा लढा चालू होता तेव्हा बाबासाहेब गोलमेज परिषदेत गुंतून गेले होते, त्यामुळे त्यांनी आपल्या कार्यंकर्त्यांमार्फत हा झगडा सतत पाच वर्षे केला. तिकडे गोलमेज परिषदेच्या माध्यमातून अस्पृश्यांसाठी मिळेल ते खेचून आणण्याचे काम तर चालूच होते व त्याला चांगले यशही आले. पण नाशिकच्या लढ्यात मात्र सनातनवाद्यांनी अस्पृश्यांना मंदिर प्रवेशापासून रोखण्यासाठी मोठी ताकत लावून लढा दिला. शेवटी या सनात्यन्यांच्या अमानवी वृत्तीला कंटाळून बाबासाहेब एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतात तो म्हणजे धर्मांतराचा.
ज्या धर्मात आम्हाला कुत्र्याचीही किंमत नाही त्या धर्मात आता आपण राहायचे नाही असा निर्धार करून बाबासाहेब धर्मांतराचा विचार आपल्या कार्यकर्त्यांना बोलून दाखवू लागले, त्यांची मने चाचपून पाहू लागले. कार्यकर्त्यांकडून सकारात्म व नकारात्मक अशा दोन्ही प्रतिक्रिया येऊ लागल्या. पण धर्मत्यागाच्या बाजूने आलेला कल प्रचंड व लक्षणीय होता. आता मात्र बाबासाहेबांना बळ आले. आपल्या समाजातील मोठा जनसमुदाय या हिंदू धर्माचा त्याग करण्यास तयार आहे हे कळल्यावर, बाबासाहेबांवर दुसरी जबाबदारी येऊन पडली. ती म्हणजे पर्यायी धर्म निवडायचा कुठला? जेथे परत जातवादाची पुनरावृत्ती होईल अशा दुसऱ्या धर्मात अजिबात जायचे नव्हते. प्राथमिक पातळीवर बाबासाहेब कार्यकर्त्यांशी संवाद साधून धर्मांतर करण्याच्या निर्णयावर येतात. आता वेळ होती या धर्मांतराच्या घोषणेची. साऱ्या जगाला ओरडून सांगयची की या हिंदूच्या अमानवी वागणुकीला कंटाळून माझा अस्पृश्यवर्ग धर्मांतर करणार आहे हे सांगण्याची. आणि येत्या काही दिवसात येवल्यात भरणाऱ्या परिषदेत ही घोषणा करण्याचे ठरले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ही घोषणा येथील तत्कालीन समाजव्यवस्थेला दिलेला मोठा धक्का होता. जागतिक पातळीवर या घटनेची नोंद झाली. धर्मसंस्थाने हादरली. परिवर्तनवादी विचारवंतांनी बाबासाहेबांच्या या घोषणेचे स्वागत केले. डॉ. बाबासाहेबांच्या आचार विचारांत राष्ट्रप्रेम व राष्ट्रनिष्ठा भरलेली होती. डॉ. आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा करताच तत्कालीन राष्ट्रीय नेते मंडळी घाबरली त्यांना वाटले डॉ. आंबेडकर आता देश सोडून जाणार. परंतु डॉ. आंबेडकरांनी सांगितले, आम्ही या भारतदेशाची संतान आहोत, आम्हाला राष्ट्रीयत्वाची जाणीव आहेच, राष्ट्रावर संकट आल्यास प्राणपणाला लावून देशाचे रक्षण केले व करूसुद्धा. यात डॉ. आंबेडकरांची प्रखर राष्ट्रनिष्ठा समावलेली आहे.
धर्मांतराच्या प्रश्नावर बोलताना आंबेडकर एकदा आचार्य अत्र्यांना म्हणाले की, हिंदुधर्मावर मला सूड घ्यायचा असता तर पाच वर्षांच्या आत मी या देशाचे वाटोळे करून टाकले असते. पण या देशाच्या इतिहासात विध्वंसक म्हणून माझे नाव नोंदले जावे अशी माझी इच्छा नाही. हिंदुधर्मीय लोक त्यांच्यावर फारच संतापले. धर्मातराची घोषणा केल्यानंतर आंबेडकरांचा खून करण्याची योजना घेऊन एक हिंदू पुढारी डॉ. कुर्तकोटी यांच्याकडे गेले होते. तेव्हा डॉ. कुर्तकोटींनी त्यांना सांगितले की आंबेडकरांना तुम्ही मारलेत तर त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामधून दहा आंबेडकर बाहेर पडतील! आंबेडकरांची धर्मांतराची घोषणा ही हिंदुधर्माच्या नाशाची घोषणा नव्हती. ते हिंदुधर्माच्या सुधारणेचे आव्हान होते. चातुर्वण्याने हिंदुधर्माचा आणि हिंदुस्थानाचा नाश झाला आहे असे डॉ. आंबेडकरांचे मत होते. म्हणून चातुर्वण्याची चौकट मोडून हिंदू समाजाची रचना समतेच्या आणि लोकशाहीच्या पायावर करा असे टाहो फोडून ते सांगत होते.
· येवला परिषद
१३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे परिषद भरली. भारताच्या कानाकोपऱ्यांतून अस्पृश्य जनता येवले नगरी मोठ्या संख्येने येऊन धडकली. लोकांची अलोट गर्दी रस्त्यानी ओसंडू लागली. प्रचंड उत्साह व बाबासाहेबांच्या प्रती असलेली निष्ठा जमलेल्या लोकांच्या वर्तनातून, त्यांच्या शिस्तीतून दिसत होती. राहण्याची, खाण्यापिण्याची सोय करताना संयोजकांच्या नाकी नऊ आले. प्रचंड जनसमुदाय येवले नगरी धडकला. एकून १०,००० लोकांचा हा जनसमुदाय येवला नगरीत बाबासाहेबांच्या नावाच्या गगनभेदी आरोळ्यानी आकाश दुमदुमवून सोडत होता. बाबासाहेबांचे येवला परिषदेस आगमन होते.
येवला परिषदेचे स्वागताध्यक्ष अमृत धोंडिबा रणखांबे होते. लोकांनी भरगच्च भरलेल्या सभामंडपात बाबासाहेबांची अत्यंत प्रभावी आणि हिंदू धर्माचा समाचार घेणारे तेजस्वी भाषण सुरू झाले. बाबासाहेब म्हणतात,
मागच्या पाच वर्षापासून आपण सर्वानी मोठ्या कष्टाने काळाराम मंदिराची चळवळ चालविली. पैसा आणि वेळ खर्ची घालून चालविलेला हा पाच वर्षाचा झगडा व्यर्थ गेला. हिंदूच्या पाषाणहृदयाला पाझर येणे अशक्यप्राय आहे, हे आता पक्के झाले आहे. काळारामाच्या निमित्ताने माणूसकीचे अधिकार मिळविण्यासाठी चालविलेली ही चळवळ निष्फळ ठरली. अशा या निर्दय व अमानुष धर्मापासून फारकत घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आपण हिंदू आहोत केवळ याच कारणास्तव आपल्यावर हे अस्पृश्यत्व लादण्यात आले आहे. तेच जर आपण दुसऱ्या धर्माचे असतो तर हिंदू आपल्यावर अस्पृश्यत्व लादू शकले असते काय? हा धर्म सोडून एखाद्या दुसऱ्या धर्मात जावे असे तुम्हाला वाटत नाही काय?
बाबासाहेबांच्या या वा्क्यांनी सभेतील लोक मोठ्या उत्साहात टाळ्याच्या गडगडाटाने प्रतिसाद देतात. हा प्रतिसाद मूकपणे सांगून गेला की, ’होय, आम्हाला हा धर्म फेकून द्यावयाचा आहे, कधी व कसे ते फक्त तुम्ही सांगा. हा मूक संदेश बाबासाहेबानी ऐकला. अगदी त्यांच्या मनातला विचार अस्पृश्यांनी प्रतिध्वनित केल्यावर बाबासाहेब मोठ्या आवेशाने पुढची भीमगर्जना करतात. ती ऐकून भारतातच नाही उभ्या भूतलावर मोठे वादळ उठते. ते म्हणतात,
मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो ते माझ्या हाती नव्हते. हिंदू म्हणून मी जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही.
ही भीमगर्जना ऐकून अस्पृश्य लोकांमध्ये एक उत्साहाची लाट उसळते. नसानसांत नवचैतन्य भरणारी ही भीमगर्जना म्हणजे हजारों वर्षांची हिंदूची गुलामी झिडकारण्याच्या अभूतपूर्व क्रांतीची डरकाळी होती. आता अस्पृश्यांच्या जीवनाचे एक नवे पर्व सुरू झाले, ते या येवलाभूमीनी अनुभवले. जो अस्पृश्य काल या परिषदेस येताना हिंदूचा गुलाम होता, लादलेल्या द्रारिद्ऱ्याचा बळी होता, तो आता या घोषणेने मनोमनी या सर्व गुलामीतून मुक्त झाला होता. बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या भीमगर्जनेतून एक निर्णायक संदेश अस्पृश्यांच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहचला तो म्हणजे, एक तर आता हिंदूच्या छाताडावर बसून बाबासाहेब आपली अस्पृश्यता घालवतील (जे अशक्य होते) किंवा या हिंदू धर्माला झिडकारून धर्मांतराद्वारे मानवी मूल्ये जपणाऱ्या धर्मात मोठ्या मानाने आमचे धार्मिक पुनर्वसन करतील. त्यासाठी लागणारी मानसिक तयारी करण्याचा येथे निर्णय करुन अस्पॄश्य बांधव पुर्नजन्म झाल्याप्रमाणे स्वत:मधे एक अप्रतिम बदल झाल्याचे पाहू लागला. हा बाबासाहेबांच्या भीमगर्जनेचा प्रभाव होता, त्यांच्या मानवी मूल्याच्या झगड्याचा परिणाम होता.
भाषणाच्या शेवटी बाबासाहेब आपल्या कार्यकर्त्याना आदेश देतात की, आता हा नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह बंद करा. पाच वर्ष आपण खूप खटाटोप केली. हिंदूंच्या हृदयात आपल्यासाठी अजिबात स्थान नाही तेव्हा आता हा धर्म सोडून आपण नव्या धर्मात जाणार आहोत. एक नवे पर्व सुरू होत आहे. आम्हांला देवाच्या दर्शनासाठी वा भक्तिभावासाठी म्हणून हा प्रवेश पाहिजे होता असे नव्हे तर समानतेचा अधिकार म्हणून हा प्रवेश हवा होता. जेव्हा यांचा देव आणि हे आम्हांला प्रवेश देऊन समान मानण्यास मागच्या पाच वर्षात मोठ्या एकीने आमच्या विरोधात लढले, तेव्हा आता आम्हीही निर्णायक वळणावर आलोत. मानवी मूल्ये नाकारणार्यांना नाकारण्याच्या निर्णयावर आलोत. जातिभेद मानणारा असा हा यांचा देवही नको व त्याचा धर्मही नको. आपल्या वाटा आपणच शोधू या. अन आता नव्या धर्मात जाण्याच्या तयारीला लागू या. आणि अशा प्रकारे अस्पृश्यांच्या आयुष्यात एका नव्या पहाटेच्या भीमगर्जनेनी ही येवले परिषद संपन्न होते. कार्यकर्ते मोठ्या जल्लोषात व उत्साहात परतीला निघतात.
· भीमगर्जनेचे उमटलेले पडसाद :-
बाबासाहेबांच्या भीमगर्जनेनी उपस्थित पत्रकार लोकांच्या पायाखालची जमीन सरकते. तसेही बाबासाहेबांच्या तोफेतून निघणारे अनपेक्षित गोळे मोठे धक्कादायक असतात याचा पत्रकाराना चांगलाच अनुभव होता. पण हा धर्मांतराची बाब मात्र भारत हादरवून सोडाणारी होती. धर्मांध लोकांच्या गालावर मारलेली ही थापड इतकी प्रभावी नि तडाखेबंद होती की उभ्या भारतात मोठे वादळ येते. दुसऱ्याया दिवशीच्या सर्व वर्तमानपत्रांतील प्रथम पानावर ही बातमी छापून आली. बाबासाहेब धर्मांतर करणार ही बातमी जगभर पसरते. हिंदू धर्माच्या अमानवी छळाला कंटाळून मोठ्या शौर्याने केलेली ही गर्जना हिंदू धर्मातील विविध लोकांमध्ये मोठे वादळ उठवून जाते. हिंदू विचारवंत, पिठाधीश, मठाधीश व सामान्य नागरिक अशाप्रत्यक स्थरावर याचा मोठा परिणामकारक प्रतिसाद उमटला. वरच्या सर्व स्थरांत मोठा गहजब माजला.
हिंदू धर्मातील समाजसेवक व पुरोगामी वर्ग मात्र बाबासाहेबांच्या या भीमगर्जनेनी कमालीचा दुखावतो, अस्वस्थ होतो. कारण येथील पुरोगामी वर्ग अस्पृश्यांच्या हितासाठी मोठ्या कष्टाने राबत होता. अस्पृश्यांचा उद्धार व्हावा याची मनातून तळमळ असलेला हा पुरोगामी हिंदूवर्ग बाबासाहेबाना पत्रे पाठवून आपली नाराजी व्यक्त करू लागला. लगेच धर्मांतर न करता अजून पाच वर्षे तरी वाट पहावी अन हिंदू समाजाला सुधरण्याची संधी द्यावी असे अर्ज करणारी अनेक पत्रेर बाबासाहेबाना पाठविण्यात आली.
पण काही धर्मांध हिंदूना मात्र बाबासाहेबांचा हा निर्णय सुखावून गेला. त्यांच्या मते एकदाची अस्पृश्यांची घाण या हिंदू धर्मातून बाहेर पडेल. हिंदूंना सुगीचे दिवस येतील. अस्पृश्यांची संख्या इतकी प्रचंड होती की जर तो मुस्लिम वा ख्रिश्चन धर्मात गेल्यास त्यांच्या संख्याबळात होणारी वाढ हिंदूना नेस्तनाबूत करुन सर्व आघाड्यांवर आपले वर्चस्व गाजवेल हे या त्यांच्या लक्षातच येत नसे. बाबासाहेबानी मुस्लिम धर्म निवडल्यास या देशाचे नाव एक रात्रीत बदलून इस्लामिस्तान होईल, एवढे साधे समजण्याची अक्कल या हिंदू धर्मांध कट्टरपंथीयांत नव्हती. पण याची जाण असलेले हिंदू मोठे अस्वस्थ झाले. कुठल्याही परिस्थितीत बाबासाहेबाना या धर्मांतरापासून रोखणे गरजेचे आहे याची जाण असलेला हिंदूवर्ग बाबासाहेबाना अक्षरश: विनवण्या करू लागला.
डॉ. आंबेडकरांचा धर्मविषयक दृष्टिकोन
· अनेक धर्मगुरूंच्या प्रस्तावांचा राजगृहावर वर्षाव :-
बाबासाहेब हिंदू धर्म त्याग करून दुसऱ्या कुठल्यातरी धर्मात प्रवेश करणार याची बातमी हां हां म्हणता सातासमुद्रापार गेली. आणि नेहमीच आपल्या धर्माचा प्रचार व प्रसार करण्यास मोठ्या कष्टांनी उभे जग पालथे घालत असणाऱ्या अनेक धर्मांच्या धर्मगुरूंना मोठी संधी आयती चालून आल्याने आनंद झाला. अशा या धर्मगुरूनी बाबासाहेबांनी आपल्या धर्मात यावे यासाठी अनेक आघाड्या उघडून त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न चालू केले. अशा धर्मगुरूंकडून राजगृहावर देश विदेशांतून अक्षरश: पत्रांचा व तारांचा वर्षाव झाला होता.
· शीख धर्माची चाचपणी :-
१३ व १४ एप्रिल १९३६ रोजी अमृतसर येथे शीख मिशनरी परिषद भरली होती. देशाच्या कानाकोपऱ्यातून अस्पृश्य वर्गाचे लोक या परिषदेस हजर झाले. बाबासाहेबांनीही आपल्या अत्यंत मोजक्या कार्यकर्त्यांसकट इथे हजेरी लावली. सेवानिवृत्त न्यायाधीश सरदार बहाद्दुर हुकूमसिंग हे या परिषदेचे अध्यक्ष होते. या परिषदेत केरळचे अस्पृश्य समाजाचे नेते डॉ. कुदीर व इतरांनी मोठ्या अभिमानाने शीख धर्माचा जाहीर आणि विधिवत स्वीकार केला. या परिषदेत बाबासाहेबांचे एक तेजस्वी भाषण झाले..भाषणात ते म्हणाले
हिंदूनी जातीयवादाच्या अमानवी कृत्यानी माझ्या बांधवांच्या कित्येक पिढ्यांवर गुलामाचे, दारिद्ऱ्याचे व पराकोटीचे वेदनामय जीनव लादले, अत्यंत घृणास्पद नि खालच्या दर्जाची वागणूक दिली. या धर्मात समतेचा असलेला अभाव मानवी जीवनास हानिकारक आहे. त्या मानाने शीख धर्मातील समतेची तत्त्वे समाजाला एकसंघ ठेवण्यात व उत्कर्ष करण्यास अत्यंत अनुकूल व प्रगतिप्रवर्तक आहेत. त्यामुळे मला शीख धर्म मनातून आवडू लागला आहे. हिंदू धर्माचा त्याग करणे निश्चित झाले आहे. धर्मांतर करण्याचा निर्णय अढळ आहे, फक्त तो केव्हा करायचे हे अजून ठरायचे आहे.
शीख धर्माकडील त्यांचा विशेष झुकाव होता. पण जो कुठला धर्म स्वीकारायचा त्याचा खोलवर अभ्यास करून, मानवी मूल्यास असलेली पोषकता तपासून सर्व शंकाकुशंकांचे निराकरण झाल्यानंतरच धर्मांतर करायचे या मताचे बाबासाहेब होते. आपले चिरंजीव यशवंत आंबेडकर व पुतण्या मुकंद याना बाबासाहेबानी, अमृतसर येथील गुरुद्वारात वास्तव्यास पाठविले. या वास्तव्याच्या काळात गुरुद्वारातील शीख बांधवांनी या दोन तरुणांचे मोठे आदरातिथ्य केले. दोन महिने पाहुणचार घेऊन मोठ्या आनंदाने ही मुले परत आली.
१८ सप्टेंबर १९३६ रोजी बाबासाहेबानी शीख धर्माचा अभ्यास करण्यासाठी आपली १३ जणांची एक तुकडी अमृतसरला रवाना केली. मुलगा व पुतण्या यानी दिलेल्या वृत्तांताचा हा सकारात्मक परिपाक होता. ही तुकडी अमृतसरला पोहचून तिने शीख धर्माचा अभ्यास सुरू केला. दरम्यान काळात झालेल्या पत्रव्यवहारात शीख धर्माचे गुणगाण गाणारी अनेक पत्रेर बाबासाहेबांना मिळाली. उत्तरादाखल लिहिलेल्या पत्रांत बाबासाहेबानी या सर्व तरुणांचे अभिनंदन केले व धर्माचा अभ्यास करण्यास शुभेच्छा दिल्या. इकडे बाबासाहेब इतर कामात गढून गेले. याच दरम्यान या तेरा सदस्यानी एक घोळ घातला. शीख धर्माचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की या सर्वानी बाबासाहेबांची परवानगी न घेता शीख धर्माची दीक्षाच घेऊन टाकली. खरेतर बाबासाहेबांनी त्यांना अभ्यासासाठी पाठवले होते. धर्म स्वीकारण्याचा निर्णय अजून व्हायचा होता. बाबासाहेबांच्या आदेशाची वाट न पाहता घेतलेला हा निर्णय इतका भारी पडला की ते सर्व सदस्य थेट चळवळीतून बाहेर फेकले गेले. पुढे शीख मिशनचे नेते व बाबासाहेब यांच्यातील मतभेद पराकोटीला गेले. याचा एकंदरीत परिणाम असा झाला की बाबासाहेबांना शीख धर्म स्वीकारण्याचा विचार सोडून द्यावा लागला. आता नवीन धर्म शोधण्याची जबाबदारी अंगावर पडली.
हिंदू कोड बिल
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे 'हिंदू कोड बिल' जर मान्य झाले असते, तर हिंदु समाजातील सर्व भेद, अन्याय आणि विषमता नष्ट होऊन हिंदु समाज हा अत्यंत तेजस्वी आणि बलशाली झाला असता. आणि भारताच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात जी क्रांती आजपर्यंत कुणी घडवून आणली नाही ती घडून आली असती. पण दुदैव भारताचे! दुर्भाग्य हिंदुसमाजाचे! आंबेडकरांनी पुढे केलेला हात त्यांनी झिडकारला आणि स्वतःचा घात करून घेतला.
भारतीय घटनेचे शिल्पकार
एप्रिल १९४६ मध्ये नवीन प्रांतिक सरकारांच्या कामकाजाला सुरुवात झाली. प्रांतिक कायदेमंडळांना एक महत्त्वाचे काम करावयाचे होते. ब्रिटिश सरकारने भारताला स्वातंत्र्य देऊ केले होते आणि स्वतंत्र होणाऱ्या भारताचा राज्यकारभार राज्यघटनेनुसार होत राहावा, म्हणून निवडून आलेल्या मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळांनी काही प्रतिनिधी निवडून घटना समिती तयार करावी आणि त्या घटना समितीने राज्य घटना तयार करण्याचे काम सुरू करावे, असे त्यांनी सुचविले.
तशी भारतीय संविधानाची निर्मिती प्रक्रिया १९०९ च्या मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्यापासून सुरू झाली होती. आणि शेवट हा २६ नोव्हेंबर १९४९ ला संविधान सभेने संविधान स्वीकारापर्यंत ती चालली. या मध्यंतरीच्या काळात १९१९ चा montague – Chemsford सुधारणा कायदा महत्त्वाचा आहे. ज्या कायद्याने भारतीयांना मर्यादित राजकीय, आर्थिक, सामाजिक स्वातंत्र्य बहाल केले. हा १९१९ चा कायदा बनण्याआधी १९१८च्या साउथ बरो कमिशनसमोर डॉ. बाबासाहेबांनी निवेदन देऊन साक्ष दिली होती. त्यात ज्या मागण्या प्रामुख्याने बाबासाहेबांनी केल्या होत्या त्या १९१९ च्या montague - Chemsford सुधारणा कायदात समाविष्ट करण्यात आल्या होत्या. बाबासाहेब वगळता तेथे या देशातील कुठल्याही अन्य व्यक्ती वा संघटनांचा समावेश का झाला नाही. फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाच या देशाच्या स्वातंत्र्याची आणि या देशातल्या जनतेच्या हिताची काळजी होती हेच दिसून येते.
त्यानंतर १९२७ ला सायमन कमिशन इथल्या परिस्थितीचा अभ्यास करायला भारतात आले. त्या कमिशनला महात्मा गांधीच्या नेतृत्वातील काँग्रेसने विरोध केला. आणि सायमन परत जाचा नारा लावला. काँग्रेसने कुठलेही सहकार्य या कमिशनला केले नाही. परंतु बाबासाहेबांनी या कमिशनला सुद्धा आपल्या मागण्यांचे निवेदन सदर केले. त्या निवेदनात इथल्या अस्पृश्यांच्या कल्याणासाठी इंग्रज सरकारने काय केले पाहिजे यासोबतच भारतातील संविधान निर्मितीसाठी आणि राजकीय प्रांतिक विधिमंडळाची मांडणी व रचना कशी असावी याविषयी सुद्धा मार्गदर्शन केले होते. तेव्हा काँग्रेस काय, गांधी काय, तर या देशातले इतर अन्य महा-(पुरुष), संस्था-संघटना निष्काम कर्मयोगाच्या समाधी अवस्थेत बसल्या होत्या.
१९२७ च्या सायमन कमिशनने केलेल्या शिफारशीनुसारच इंग्रज संसदेने गोलमेज परिषद बोलावली. त्यात बाबासाहेबांना पुनश्च आमंत्रित करण्यात आले. या पहिल्या गोलमेज परिषदेला गांधीप्रणीत काँग्रेसने बहिष्कार घातला. परंतु बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेत हजेरी देत इंग्रज सरकारला या देशाला कशा प्रकारच्या कायद्याची गरज आहे. हे पटवून दिले. भारतातील प्रांतिक आणि केंद्रीय विधीमंडळांची रचना कशी असावी हेसुद्धा पटवून दिले. हे गांधी आणि काँग्रेसला माहीत झाल्याने गांधी व काँग्रेसचे महत्त्वव टिकून राहावे म्हणून गांधी दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर झाले. तिथेही गांधी आणि बाबासाहेब यांच्यात भारतीय सामाजिक परिस्थिती लक्षात घेता आवश्यक असणाऱ्या तरतुदींसंबंधाने मोठ्या प्रमाणात खडाजंगी झाली. शेवटी गोलमेज परिषदेने बाबासाहेबांच्या बाजूने ठराव घेतला. गांधींना त्यात सपशेल अपयश पचवावे लागले आणि बाबासाहेबांपुढे गुढगे टेकावे लागले. याच गोलमेज परिषदेने घेतलेल्या ठरावांचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. आणि त्याचेच रूपांतर पुढे १९३५ च्या कायद्यात झाले. म्हणजेच याही कायद्यात बाबासाहेबांचे योगदान मोठे आहे.
पुढे भारतीय संविधान निर्मितीच्या प्रक्रियेला इंग्रज सरकारकडून प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी त्यांनी विविध आयोगांना भारतात पाठविले. त्यातलेच पहिले १९४२ ला परत सायमन कमिशन भारतात आले. तेव्हाही गांधीप्रणीत काँग्रेसने त्याला विरोध केला. परंतु बाबासाहेबांनी मात्र सहकार्य केले. आपल्या मागण्यांचे निवेदन देत राहिले. त्यानंतर पुन्हा संविधान निर्मितीच्या संबंधाने निर्णय घेण्यासाठीक्रिप्स मिशन (त्रिमंत्री योजना म्हणून प्रसिद्ध) भारतात आले. तेव्हा थोडीशी काँग्रेसची भूमिका मवाळ झाली होती. कारण प्रत्येक वेळेस बाबासाहेब आपल्या मागण्या इंग्रजांकडून मान्य करवून घेत होते. परत १९४६ ला माउंटबॅटनच्या नेतृत्वात एक आयोग भारतात आले. हा आयोग संविधान सभेच्या निर्मितीसाठी शेवटचा आयोग ठरला. या सर्व इतिहासात बाबासाहेबांचे मोठे योगदान राहिले आहे. संविधान निर्मितीच्या पूर्वेतिहासात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान, काँग्रेस किंवा गांधी किंवा अन्य कुणापेक्षाही जास्त आहे.
माउंटबॅटनने दिलेल्या अंतिम सूचनेवरून संविधान सभेच्या निवडणुका सुरू झाल्या. बाबासाहेब पश्चिम बंगाल प्रांतातून संविधान सभेवर निवडून आले. (तेव्हाही काँग्रेसने बाबासाहेब संविधान सभेवर निवडून येऊ नये म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. कारण पूर्वेतिहास त्यांना माहीत असल्याने...काँग्रेसचे काहीही चालले नसते म्हणून) ९ डिसेंबर १९४६ ला संविधान सभेची पहिली बैठक बोलाविण्यात आली. आणि भारतीय संविधानाचे प्रारूप कसे असावे यावर दीर्घ चर्चा झाली. या चर्चेत प्रत्येकच सदस्याला मते मांडण्याची संधी देण्यात आली. बाबासाहेबांना आपली मते मांडण्यासाठी वाट पहावी लागत होती.
अखेर १७ डिसेंबर १९४६ ला बाबासाहेबांना संविधान सभेसमोर संविधानाच्या प्रारूपावर मत मांडण्यासाठी अचानक आमंत्रित करण्यात आले. (अचानक यासाठी की अनेक सदस्य बाकी असल्याने बाबासाहेबांना याची कल्पनाच नव्हती की त्यांना या दिवशी आपली मते मांडवी लागतील म्हणून...) बाबासाहेबांनी सुरुवातीलाच याचा उल्लेख केला की "माझा नंबर आज लागेल याची मला कल्पना नव्हती. तशी पूर्वसूचना मला मिळाली असती तर मी पूर्वतयारीनिशी माझे मत मांडले असते. पण तरीही मी माझे मत मांडणार आहे..." बाबासाहेबांचे ते संविधान सभेतील पहिले भाषण सुरू झाले. संपूर्ण सभागृह अवाक होऊन अतिशय एकाग्रचित्त झाले होते. बाबासाहेब एकावर एक मुद्दे आपल्या बुद्धिचातुर्याने संविधान सभेसमोर मांडत होते. सभागृहातील एकही सदस्य त्या बाबासाहेबांच्या भाषणाच्या वेळी उठला नाही की जागचा हललासुद्धा नाही. बाबासाहेबांच्या मुखातून जणू काही भविष्याचे संविधानच बाहेर पडत होते. संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाची एक आचारसंहिताच लिहिली जात होती. बाबासाहेबांचे भाषण झाल्यावर सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने निनादून उठले. संपूर्ण सभागृहातील सदस्यांनी बाबासाहेबांच्या विद्वत्तेपुढे मानच झुकविली. बाबासाहेबांचे विरोधकही त्या भाषणाने इतके प्रभावी झाले की त्यांच्या तोंडून कौतुकाचे शब्दही फुटत नव्हते.
अशातच भारत आणि पाकिस्तान फाळणी होण्याचे संकेत होते. ती झाली. बाबासाहेबांचा मतदार संघ पाकिस्तानात गेला. त्यामुळे संविधान सभेतील त्यांचे सदस्यत्व धोक्यात येणार होते. अशा परिस्थितीत; ज्यांनी बाबासाहेबांचे १३ डिसेंबर १९४६ चे भाषण ऐकले होते त्या बाबासाहेबांच्या समर्थकांचा आणि संविधान सभेतील अन्य सभासदांचा काँग्रेसवर दबाव निर्माण झाला. काँग्रेसला पण बाबासाहेबांना संविधान सभेतील कामकाजापासून अलिप्त ठेवता येत नव्हते. कारण इतकी प्रचंड विद्वत्ता आणि कल्याणाचा जाहीरनामा संपूर्ण काँग्रेसमध्ये कुणाकडेही नव्हते. भारताचे संविधान बाबासाहेबांशिवाय बनणे अशक्यप्राय होते हे काँग्रेस चांगलेच ओळखून होती. म्हणून शेवटी बाळ गंगाधर खेरांना पत्र लिहून जयकरांचे मुंबई प्रांतातील संविधान सभेतील सदस्यत्व रद्द करण्यात आले. आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांना संविधान सभेवर निवडून आणण्यात आले. काँग्रेस, संविधान सभा, भारत देश या सर्वांचीच ती गरज होती. बाबासाहेब संविधान सभेवर निवडून जाणे सर्वांच्याच हिताचे होते. त्यानंतर बाबासाहेबांनी संविधानाच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदावरून केलेली कामगिरी आणि त्यांची संविधान सभेतील सर्व कलमांवर केलेली भाषणे म्हणजे या देशाचे भवितव्यच होते.
संविधान निर्मितीचा हा पूर्ण इतिहास आपण लक्षात घेतला तर बाबासाहेब संविधान अंमलात येण्याच्या आधीच भारतीय घटनेचे शिल्पकार बनले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना स्वतंत्र भारताच्या राज्य घटनेचे शिल्पकार ठरविण्याचा बहुमान आम जनतेने बहाल केला आहे. मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्याने घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मसुदा घटना समितीला सादर केला. डॉ . आंबेडकर भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार होते असे भारताचे माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन म्हणतात. तसेच ते संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष होते. म्हणून संविधानसभेत हा मसुदा सादर करणे आणि आणि स्वीकृत करवून घेणे या प्रक्रियेत त्यांची भूमिका सुकाणू धारकाची होती. मसुदा समितीतील डॉ. आंबेडकरांचे एक सहयोगी श्री टी.टी. कृष्णम्माचारी, यांनी संविधान सभेतील एका भाषणात असे प्रतिपादन केले की,
संविधान सभेने मसुदा समितीवर सात सदस्य नियुक्त केले होते. त्यापैकी एकाने या सभागृहाचा राजीनामा दिला आणि त्याची जागा दुसऱ्याने घेतली. एकाचा मृत्यू झाला आणि ती जागा रिक्तच राहिली. एक अमेरिकेत निघून गेला आणि ती जागा भरली गेलीच नाही, आणि एक अन्य सभासद राज्याच्या राजकारणात गुंतून पडले आणि त्यामुळे तेवढी पोकळी निर्माण झाली. एक किंवा दोन व्यक्ती दिल्लीपासून बऱ्याच लांब होत्या आणि त्यांची प्रकृती त्यांना उपस्थित राहण्याची अनुमती देत नव्हती. म्हणून सरतेशेवटी असे घडले की, संविधानाचा मसुदा तयार करण्याचे उत्तरदायित्व डॉ. आंबेडकरांवर आले. कदाचित सभागृहाला या वास्तवाची जाणीव असावी आणि डॉ. आंबेडकरांनी ही जबाबदारी, हे कार्य अत्यंत योग्यपणे पार पडले, यात मला तीळमात्रही शंका नाही. म्हणून आम्ही त्यांचे ऋणी आहोत’’.
धर्मांतर
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धर्मांतराची संकल्पना स्पष्ट होती ती अशी की, हिंदू धर्मात अस्पृश्यांना सहानुभूतीची वागणूक मिळत नाही. जो धर्म जातिव्यवस्थेचा पुरस्कार करून माणसा-माणसांत भेद करतो, ज्या धर्मात स्वातंत्र्य, समता, बंधुता नाही, त्या धर्मात राहून अस्पृश्यांचा उद्धार होणार नाही म्हणून त्यांनी धर्मांतर केले पाहिजे. बाबासाहेबांचा हिंदू धर्म नि समाजव्यवस्थेला असा सवाल होता की, जो धर्म अस्पृश्यांना देवळात जाऊ देत नाही, प्यायला पाणी मिळू देत नाही, विद्या ग्रहण करू देत नाही, अस्पृश्यांच्या सावलीचाही विटाळ मानतो, जो धर्म अस्पृश्यांना अति तुच्छ मानतो, त्या हिंदू धर्मात अस्पृश्यांनी कशासाठी राहावयाचे? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवले, नाशिक येथे हिंदू धर्म त्यागाची घोषणा केली. त्यानंतर ख्रिश्चन, मुस्लिम, शिख इत्यादी धर्मांच्या धर्मगुरूंनी बाबासाहेबांनी लक्षावधी व कोट्यवधी अनुयायांसह आपल्या धर्मात यावे यासाठी निमंत्रणे दिली तर काहींनी आमिषे ही दाखवली. बॅरीस्टर महमंद अलि जिना यांनी मी. जयकरांमार्फत बाबासाहेबांनी इस्लाम स्विकारा, पाकिस्तानला या व पाकिस्तानचे गव्हर्नर व्हा अशी ऑफर दिली होती तर त्यावेळेचे जगातील सर्वाधिक श्रीमंत राजवट निझाम याने बाबासाहेबांना इस्लाम स्विकारल्यास धर्मांतरीत प्रति व्यक्ति मागे लक्षावधी नव्हे तर कोट्यवधी रूपये बाबासाहेबांना देण्याचे कबूल केले होते. परंतु भारतभूमीतला, विवेकनिष्ट व मानवी मुल्यें जपनारा धर्म हवा होता म्हणून त्यांनी ह्या दोन्ही ऑफर नाकारल्या. एका विदेशी ख्रिश्चन धर्माचे धर्मगुरूंनी त्यांनी ख्रिश्चन धर्म स्विकारावा अशी विनंती केली व धर्म स्विकारल्यानंतर जगातील सारेच ख्रिश्चन देश अस्पृश्यांचा सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक स्तर उंचावण्यास मदत करतील अशी हमी दिली. महाबोधी सोसाईटी कडून बौद्ध भिक्खूंनी त्यांनी बौद्ध धर्म स्विकारावा अशी तार पाठवली होती जो धर्म आशिया खंडाचा प्रमुख धर्म होता. बाबासाहेबांनी घाई न करता आपल्या धर्मांतरांच्या घोषणेनंतर सलग २१ वर्षे जगातील विविध धर्मांचा सखोल अभ्यास केला त्यानंतर त्यांचा मानवतावादी व विज्ञानवादी म्हणून त्यांचा पूर्णपणे कल बौद्ध धम्माकडे वळला. धर्मांतरापूर्वी म्हणूनच मुंबईत १९४५ मध्ये स्थापन केलेल्या महाविद्यालयास त्यांनी सिद्धार्थ, तर औरंगाबादेत १९५० मध्ये काढलेल्या महाविद्यालयास मिलिंद आणि परिसरास नागसेनवन अशी नावे दिली. मुंबईतील दादर येथील आपल्या निवासस्थानालाही त्यांनी ‘राजगृह’ असे नाव दिले. बाबासाहेबांना अखेर बुद्धाचा जीवनमार्ग लोककल्याण, सदाचार, समता, स्वातंत्र्य, बंधुतेचा वाटला म्हणून त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे आपल्या अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारला. त्या दिवशी अशोक विजयादशमी होती (या दिवशी सम्राट अशोक यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता). हे शपथग्रहण सकाळी ९.०० वाजता झाले. श्रीलंकेचे महान बौद्ध भिक्खू महत्थवीर चंद्रमणी यांचेकडून डॉ. बाबासाहेब व सौ. डॉ. सविता आंबेडकर यांनी त्रीशरण व पंचशील ग्रहण करून सर्वप्रथनम धम्मदीक्षा घेतली आणि त्यांनंतर स्वत: आपल्या ५,००,००० अनुयायांना त्रीशरण, पंचशील आणि २२ प्रतिज्ञा देऊन बौद्ध धम्माची दिक्षा दिली. पुढील दिवशी ही नागपूर मध्ये त्यांनी २,००,००० अनुयायांना दिक्षा दिली तसेच तिस-या दिवशी चंद्रपुर येथे ३,००,००० अनुयायांना धम्म दीक्षा दिली. अशाप्रकारे केवळ तीन दिवसांत बाबासाहेबांनी १०,००,००० पेक्षा लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन जगातील बौद्धांची संख्या १० लाखांनी वाढवली. या घटनेची जागतिक इतिहासात नोंद झाली तर या घटनेने भारतात बौद्ध धर्म पुनर्जीवत झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतर जगात ऐतिहासिक होते कारण ते जगातील सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर होते. बाबासाहेबांनी आपल्या नवीन बौद्धांना स्वत: च्या २२ प्रतिज्ञा दिल्या ज्या बौद्ध धर्माचेच सार आहे, त्यामध्ये बौद्ध धर्मात असलेला अनिरीश्वरवाद, पंचशील, त्रीशरण, अष्टांगमार्ग, दहा पारमिता, मानवी मुल्यें व तत्त्वे आहेत. प्रज्ञासूर्य बाबासाहेबांनी मानवतावादी आणि विज्ञानवादी बौद्ध धर्म भारताला दिला.
बौद्धांच्या बावीस प्रतिज्ञा
1. मी ब्रह्मा, विष्णु, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
2. राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
3. मी गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
4. देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास नाही.
5. गौतम बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, हा खोटा आणि खोडसाळ प्रचार आहे असे मी मानतो.
6. मी श्राद्धपक्ष करणार नाही; पिंडदान करणार नाही.
7. मी बौद्धधम्माच्या विरुद्ध व विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही.
8. मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करवून घेणार नाही.
9. सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो.
10.मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन.
11.मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.
12.तथागताने सांगितलेल्या दहा पारमिता मी पाळीन.
13.मी सर्व प्राणिमात्रांवर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन.
14.मी चोरी करणार नाही.
15.मी व्याभिचार करणार नाही.
16.मी खोटे बोलणार नाही.
17.मी दारू पिणार नाही.
18.ज्ञान (प्रज्ञा), शील, करुणा या बौद्धधम्माच्या तीन तत्त्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन.
19.माझ्या जुन्या, मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बौद्धधम्माचा स्वीकार करतो.
20.तोच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.
21.आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो.
22.इतःपर मी बुद्धांच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो.
कोलंबिया विद्यापीठात डॉ. आंबेडकर अध्यासन
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातल्या विधी विद्यालयात अध्यासन स्थापन करण्यात आले आहे. याशिवाय तेथे शिक्षण घेण्यासाठी भारत सरकारची एक शिष्यवृत्ती आहे. डॉ. आंबेडकर हे या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी होते.
डॉ. आंबेडकरांना बडोद्याच्या महाराजांकडून शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर ते कोलंबिया कोलंबिया विद्यापीठात शिकायला गेले होते. एम.ए. केल्यानंतर त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये डी.एस्सी. केले. त्यानंतर १९२७ मध्ये कोलंबिया विद्यापीठातून पीएच.डी. मिळवली. डॉ. आंबेडकरांच्या थोर सामाजिक कार्याबद्दल आणि मानवी हक्कांचा पहारेकरी या भूमिकेबद्दल कोलंबिया विद्यापीठाने १९५२ मध्ये त्यांना मानद डॉक्टरेट देऊन त्यांचा सत्कार केला. पुढे १९९५ मध्ये बुद्धिस्ट ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड किंगडमतर्फे लेहमन ग्रंथालयाला आंबेडकरांचा पुतळा भेट म्हणून देण्यात आला.
कोलंबिया विद्यापीठात आंबेडकर जॉन डेव्ही यांच्या मार्गदर्शनाखाली शिकले. आंबेडकरांच्या समता आणि सामाजिक न्यायाच्या कल्पनांनी डेव्हीही प्रभावित झाले होते. कोलंबिया विद्यापीठात प्रथमच आपण समानतेचा अनुभव घेतल्याचे आंबेडकरांनीही लिहून ठेवले आहे. कोलंबिया विद्यापीठातील जॉन डेव्ही, जेम्स शॉटवेल, एडविन सेलिगमन आणि जेम्स हार्वे रॉबिन्सन हे महान प्राध्यापक मला लाभले आणि येथेच आयुष्यातील अनेक चांगले मित्र येथे मिळाले, असे डॉ. आंबेडकरांनी न्यूयॉर्क टाइम्सला १९३० मध्ये दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्यायतत्त्वावर आधारित समाजरचना घडवण्यासाठी अहोरात्र मेहनत करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना लिहिली. सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना याचे ‘स्वातंत्र्य’, दर्जाची आणि संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून भारत एक सार्वभौम, समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा हक्क या संविधानाद्वारे सर्व भारतीयांस प्राप्त करून दिला आहे. या अतुलनीय कार्याची पावती कोलंबिया युनिव्हर्सिटीने घेऊन आपल्या द्विशतकसांवत्सरिक उत्सवाप्रसंगी डॉ. आंबेडकरांना ‘एल.एल.डी.- डॉक्टर ऑफ लॉज्’ ही बहुमानाची उपाधी देण्याचं जाहीर केले. कोलंबिया विद्यापीठात दिनांक ५ जून १९५२ रोजी पदवीदान समारंभ झाला. ‘भारतीय घटनेचे शिल्पकार, मंत्रिमंडळाचे सदस्य आणि राज्यसभेचे सदस्य, भारतीय नागरिकांपैकी एक प्रमुख नागरिक, एक महान सुधारक आणि मानवी हक्काचा आधारस्तंभ असणारा एक पराक्रमी पुरुष’ असं कोलंबिया विद्यापीठाने त्यांना दिलेल्या मानपत्रात संबोधण्यात आले आहे
आंबेडकरांच्या व्यक्तित्वाचे विविध पैलू
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना चित्रकलेत विशेष रुची होती. "पेंटिंग अॅज अ पास्ट टाईम' या चर्चिलच्या पुस्तकाने त्यांच्यात चित्रकलेची आवड निर्माण झाली होती. बी. आर. मडिलगेकर यांच्याकडून त्यांनी चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले होते. चित्रकलेचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी अनेक पुस्तके विकत घेतली होती. चित्रे काढण्यात आणि रंगविण्यात ते तल्लीन होऊन जात असत.
बाबासाहेब व्हायोलीन वाजवत.
बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा
1. महार आणि त्यांचे वतन (मराठी)
2.फेडरेशन व्हर्सेस फ्रीडम
३. थॉटस ऑन पाकिस्तान (१९४८)
१२) प्रॉब्लेम ऑफ शेड्यूल कास्ट्स
३) लेबर ऍन्ड पार्लमेंटरी डेंमॉक्रसी
१३) रानडे , गांधी ऍन्ड जीना (१९४३)
४)व्हॉट कॉग्रेस ऍन्ड गांधी हॅव टू द अनटचेबल्स (१९४६)
१४) द कम्यूनल डेडलॉक ऍन्ड व्हाय दे अनटचेबल्स
५) द अनटचेबल्स (१९४६)
६) महाराष्ट्र ऍज अ लिंगुइस्टिक प्रॉव्हिन्स
१५) हू आर दे ऍन्ड व्हाय दे बिकेम अनटचेबल्स
७) द राईज ऍन्ड फॉल ऑफ हिंदू वुमेन
१६) द बुध्द ऍन्ड फ्युचर ऑफ हिज रिलीजन
८) कॅबिनेट मिशन ऍन्ड द अनटचेबल्स
१७) बौध्द उपासना पाठ
९) द बुध्द ऍन्ड हिज धम्मा (मरणोत्तर १९५७ मध्ये प्रकाशित)
१८) बौध्द पूजापाठ
१०) कास्ट इन इंडिया, देअर मेकॅनिझम, जेनेसीस ऍन्ड डेव्हलपमेंट(१९१६)
१९) बुध्द धम्मदीक्षा पाठ इ.
मरणोत्तर महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले त्यांचे अप्रकाशित ग्रंथ
१) फिलॉसॉफी ऑफ हिंदुइजम
२) एसे ऑन अनटचेबल्स ऍन्ड असटचेबिलीटी
२) रिडल्स इन हिंदुइजम (१९५७)
४) पॉली ग्रामर ऍन्ड पॉली डिक्शनरी
बहुमान
सयाजीराव गायकवाड यांनी दलितांचा मुक्तीदाता या शब्दांत डॉ. आंबेडकरांचा गौरव केला.१४ एप्रिल १९९० मध्ये डॉ. आंबेडकरांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला .६ डिसेंबर १९५६ मध्ये आंबेडकरांचे झोपेतच महापरिनिर्वाण झाले. त्यांचे समाधीस्थळ चैत्यभूमी म्हणून ओळखले जाते.
Post a Comment