भंडारा जिल्हा

        महाराष्ट्र राज्याच्या ईशान्य कोप-यातील, नागपूर विभागातील एक जिल्हा आहे .भंडारा जिल्ह्याच्या पूर्वेस  गोंदिया , दक्षिणेस चंद्रपूर, पश्चिमेस नागपूर हे महाराष्ट्रातील जिल्हे, तर उत्तरेस मध्य प्रदेश , आग्नेयेस गडचिरोली  दुर्ग हे  जिल्हे आहेत. भंडारा, तुमसर , पवनी , मोहाडी , साकोली , लाखांदूर , लाखनी हे जिल्ह्याचे ७  तालुके आहेत. भंडारा जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३७१६ चौरस किमी असून एकूण लोकसंख्या ११,३५,८३५ इतकी आहे.वैनगंगा ही जिल्ह्याची प्रमुख नदी आहे. भंडा-यात ३,६४८ एवढी लहान तळी आहेत. जिल्ह्याचे हवामान विषम असल्याने तुलनेने येथे चांगला पाऊस पडतो. या जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान सरासरी सुमारे १५० सें. मी. इतके आहे. भंडारा शहर  हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे.

मुख्यालय

भंडारा

क्षेत्रफळ

3716.65 Sq.Km

लोकसंख्या

11,36,146

लोकसंख्येची घनता

306

साक्षरता

78.5

तालुक्यांची संख्या

7

उपविभाग

2

नगरपरिषद

3

खेडे

878

Loksabha Constituencies

1

Assembly Constituencies

3

 इतिहास : भंडारा जिल्ह्याचा प्राचीन इतिहास विशेष ज्ञात नाही. पूर्वी या प्रदेशावर गवळ्यांचे राज्य असावे. इ.स. सातव्या शतकापासून येथील काही भागावर हैह्य़वंशीय राजपूत राजांचे अधिराज्य होते व त्यांची राजधानी नागपूर जिल्ह्यातील नगरधन येथे असावी, असे मध्य प्रदेश राज्याच्या बिलासपुर जिल्हयातील रतनपुर येथे सापडलेल्या शिलालेखावरुन (इ.स. ११८४) दिसून येते. बाराव्यात ते सोळाव्या शतकांपर्यंतच्या कालावधीत राजपूतांच्या सत्तेचा -हास होत जाऊन तेथे गोडांची सत्ता प्रस्थापित झाली. सतराव्या शतकात येथील काही भाग छिदवाडा जिल्ह्यातील देवगड येथील बख्त बुलंदशहाच्या अंमलाखाली होता. या काळात या प्रदेशाची बरीच प्रगती झाली. बख्त बुलंदनंतर चांद सुलतान, रघुजी भोसले, आप्पासाहेब भोसले व नंतर ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली हा भाग आला. राजे रघुजी भोसले यांच्या कारकीर्दीत शेतीला व उद्योगध्यांना उत्तेजन मिळाले. त्यामुळे या प्रदेशाची भरभराट होऊन प्रजा सुखी व संपन्न होती, असा उल्लेख आढळतो. तसेच त्यांनी पेंढा-य़ांचा जनतेला होणार त्रास कमी करण्यासाठी पवनी, सान-गडी, कामठा, लाजी इ. ठिकाणी गढ्या बांधून घेतल्या. ब्रिटीशांच्या कारकिर्दीत राज्यकारभाराचे मुख्य ठिकाण भंडारा केले व पूर्वीच्या वैनगंगा प्रांत भंडारा जिल्हा म्हणून ओळखला जाऊ लागला.

 जिल्ह्याचे वैशिष्टे :महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार म्हणजे भंडारा! अक्षरश: हजारो तलावांचा जिल्हा म्हणजे भंडारा! तलावांमुळे जिल्ह्याच्या जलसिंचनात भर पडली आहेच, शिवाय जिल्ह्याचा परिसर निसर्गरम्यही बनलेला आहे. जिल्ह्यातील समृद्ध जंगले, मुबलक खनिज संपत्ती, विविध प्राचीन जाती-जमातींचा निवास आणि धातूच्या भांड्यांची निर्मिती व त्यावरील पारंपरिक कलाकुसर हीदेखील जिल्ह्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

ऐतिहासिक महत्त्वाचे:

पितळी भांड्यांचे शहर म्हणून अशी भंडारा शहराची व पर्यायाने भंडारा जिल्ह्याच्या नावाची व्युत्पत्ती मांडली जाते. भाणारा शब्दापासून भंडारा हे नाव पडले असेही म्हटले जाते. या भागात १२ व्या शतकातील एका शिलालेखात भंडारा शहराचा भाणारा असा उल्लेख आढळतो. भाण हा शब्द भांडी या अर्थाने पूर्वी वापरला जात असावा, असे अनुमान निघते. भंडारा हे पितळी भांड्यांसाठी पूर्वापार प्रसिद्ध असल्यामुळे भाण शब्दावरून भाणारा असे नाव पडून पुढे त्याचा अपभ्रश भंडारा असा झाला असावा. स्थानिक लोक आजही भंडारा शहराच्या नावाचा उच्चार भाणारा असाच करतात.

भंडारा जिल्ह्याचे अस्तित्व ११व्या शतकातदेखील होते याची नोंद रतनपूर (जि. बिलासपूर) येथील उत्खननात सापडलेल्या शिलालेखावरती आहे. महानुभव पंथाच्या लीलाचरित्र या पवित्र अशा ग्रंथात भंडारा जिल्ह्याचा संदर्भ अनेकदा आलेला आढळतो. उत्तम निसर्गसंपदा लाभलेला हा जिल्हा १७४३ पर्यंत गवळी राजवटीखाली होता. गवळी राजवटीत बांधलेला किल्ला भंडारा शहरातच आहे. त्याकाळी बांधलेला खांब तलाव आजही टिकून आहे. भंडारा जिल्हा अधिकृतरीत्या १८२१ मध्ये अस्तित्वात आल्याची नोंद इतिहासात आढळते. त्यानंतर १८५३ पर्यंत येथे मराठेशाही होती.

मराठेशाहीच्या वारसदारा-अभावी भंडारा जिल्हा १८५३ मध्ये इंग्रजांच्या हाती गेला. पूर्व महाराष्ट्रातील (विदर्भातील) या जिल्ह्याचे १९९९ मध्ये विभाजन करण्यात आले व नवा गोंदिया जिल्हा निर्माण करण्यात आला.

 जिल्ह्याच्या भूगोल :

जिल्ह्यात वैनगंगा ही प्रमुख नदी असून चूलबंद, बावनथडी, अंबागड, बोदलकसा, गाढवी, सूर, मरू या नद्याही जिल्ह्यातून वाहतात. हा जिल्हा तलावांचा म्हणून ओळखला जातो. अनेक तालुक्यांत छोटे-मोठे तलाव असून तुमसर तालुक्यातील चांदपूर तलाव हा जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.

भंडारा जिल्हा जंगल संपत्तीच्या दृष्टीने समृद्ध आहे. सुमारे ३०% क्षेत्र विविध प्रकारच्या वनांनी व्यापलेले आहे. औषधी वनस्पती व फळे, डिंक, लाख, मध, मोहाची फुले आदी वनउत्पादने येथे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.

खनिज संपत्तीच्या दृष्टीने भंडारा जिल्हा राज्यातील एक समृद्ध जिल्हा आहे. मँगनीज हे खनिज जिल्ह्याच्या उत्तर भागात मुबलक प्रमाणात सापडते. तुमसर तालुका मँगनीजसाठी प्रसिद्ध आहे. तुमसर व कवडसी येथे पांढरी माती मुबलक सापडते. शिवाय इतर खनिजेही जिल्ह्यात काही प्रमाणात मिळतात. मँगनीज, क्रोमाईट, क्वार्टझाईट, सिलिमनाईट, कायनाईट या खनिजांवर आधारित अनेक उद्योग भंडारा जिल्ह्यात चालतात.

राजकीय संरचना:

लोकसभा मतदारसंघ

भंडारा, तुमसर व साकोली हे भंडारा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ आणि गोंदिया, तिरोरा व अर्जुनी - मोरगाव हे गोंदिया जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ मिळून भंडारा - गोंदिया लोकसभा मतदारसंघ बनला आहे.

विधानसभा मतदारसंघ :

तुमसर, भंडारा, साकोली.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ५२ तर पंचायत समितीचे १०४ मतदारसंघ आहेत.

शेती

महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार म्हणून भंडाऱ्याची ओळख पूर्वीपासून करून दिली जाते. राज्यात सर्वात कमी पडीक जमीन असलेला जिल्हा म्हणून भंडार्याचे नाव घेता येईल.

४०० वर्षांपूर्वीपासून कोहली जमातीच्या लोकांनी पारंपरिक पध्दतीने पाणी अडवणे, जिरवणे आणि साठवण्याच्या पध्दतींनी भंडारा जिल्ह्यात वेगळीच करामत केली आहे. टेकड्यांच्या, द-या - खो-यांचा खोल भागातून भरपूर पाणी साठवल्यामुळे अनेक नैसर्गिक तळी तयार झाली आहेत. अनेक तळी मानवनिर्मितही आहेत. बहुतांश तळी आजवर टिकवून ठेवल्याने भंडारा हा तळ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. एकूण सुमारे ३६०० छोटे - छोटे तलाव आजही जिल्ह्यात आहेत.

प्रामुख्याने जलसिंचनासाठी जिल्ह्यातील या तलावांचा उपयोग होतो. तुमसर तालुक्यातील चांदपूर हा मोठा व महत्त्वाचा तलाव आहे. शेजारील गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्पातील पाणी लाखांदूर तालुक्यातील शेतीस पुरविण्यात येते. वैनगंगा व तिच्या उपनद्यांच्या काठांवर अनेक उपसा जलसिंचन योजना राबविल्या जात आहेत.

तांदूळ हे पीक घेण्यायोग्य जमीन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. पाऊस भरपूर पडत असल्यामुळे व जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध असल्यामुळे तांदळाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत भात पिकवला जातो. जिल्ह्यात ऊस, तूर, सोयाबीन,ज्वारी, मूग, गहू, हरभरा, जवस ही पिके घेतली जातात. काही ठिकाणी उडदाचेही पीक घेतले जाते.

भंडारा जिल्ह्यात संपूर्ण राज्याच्या तुलनेत सर्वात अधिक जमीन ओलीताखाली येते. अनेक तलावांप्रमाणेच इंदिरासागर देखील मोठा जलाशय इथे आहे. नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातही त्यामुळे पाणी मिळते.

उद्योग:

भंडारा जिल्ह्यात गाडेगाव व तुमसर येथे औद्योगिक वसाहती आहेत. भंडार्याजवळ जवाहरनगर येथे युद्धसाहित्य निर्मितीचा कारखाना आहे.

भंडारा जिल्ह्यातील अतिशय जुने उद्योग म्हणजे तेंदूच्या पानांपासून विड्या बनविणे आणि धातुंची भांडी बनवणे हे होत. जिल्ह्यात उपयुक्त भांडी बनवली जातातच, शिवाय भांड्यांवरील कलाकुसरही वाखाणण्याजोगी असते. जिल्ह्यातील नद्या व तळ्यांमधील मासेमारी मोठ्या प्रमाणावर चालते. जंगलांमुळे लाकूड कटाई, बांबूपासून टोपल्या व चटई इत्यादी वस्तू तयार करणे असे उद्योग चालतात.

कोसा या प्रकारचे रेशीम तयार करून कापड तयार करण्याचा व्यवसाय प्रसिध्द आहे. तांब्या, पितळ्याची भांडी तयार करणे, कौले व विटा तयार करणे, हातमागावर कापड विणणे असेही व्यवसाय चालतात. भात गिरण्या किंवा धान गिरण्या जिल्ह्यात सर्वत्र विखुरलेल्या आहेत. जिल्ह्यात मोहाडी तालुक्यात देव्हाडा येथे वैनगंगा सहकारी साखर कारखाना आहे. तुमसर रोड येथे कागद निर्मिती कारखाना आहे.

मँगनीज शुध्दीकरण, पोलाद उद्योग असे महत्त्वाचे उद्योगही जिल्ह्यात चालतात. गेल्या दशकात पोलाद उद्योगासाठी मोठ्या कंपन्या जिल्ह्यात स्थापन झाल्या आहेत.

दळणवळण :

जिल्ह्यांतील महत्त्वाचा रस्ता म्हणजे हाजीरा-धुळे-कोलकाता (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६) होय, जो भंडारा, लाखनी व साकोली तालुक्यांतून जातो.

जिल्ह्यातील सर्व औद्योगिक उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी येथील महामार्ग व लोहमार्ग महत्त्वपूर्ण ठरतात. ही गरज लक्षात घेता, फार पूर्वी म्हणजे १८८२ मध्ये मुंबई-नागपूर-कोलकाता हा जिल्ह्यातून जाणारा पहिला लोहमार्ग सुरू केला गेला.या लोहमार्गावर भंडारा रोड, तुमसर रोड (प्रमुख जंक्शन) ही महत्त्वाची स्थानके आहेत. नागपूर-चंद्रपूर लोहमार्ग पवनी तालुक्यातून गेला आहे.

पर्यटन

भंडारा शहरात अंबाबाई, पिंगळाई व निंबाई देवीची हेमाडपंती शैलीची मंदिरे प्राचीन काळापासून आहेत. येथील कोरंभी देवीच्या दर्शनासाठीही बरेच भाविक गर्दी करतात.भंडा-यात प्राचीन किल्ला असून त्याचे रूपांतर आता जेलमध्ये झालेले आहे. येथील खांब तलाव (तलावाच्या मध्यभागी उभा असलेला खांब) प्रसिद्ध आहे. भंडारा शहरात छत्रनाथ गोसावी उर्फ अलोन बाबा यांनी स्थापन केलेला मठ आहे. अलोन बाबा मीठ खात नसत. आजही येथील त्यांचे अनुयायी मीठ न खाण्याचा नियम पाळतात.

रावणवाडी येथे १०० वर्षे जुने राममंदिर आहे. या जुन्या देवळात आजही भाविकांची गर्दी होते. भंडार्यापासून २० कि.मी. अंतरावर मोहाडी या ठिकाणी चौंडेश्वरी देवीचे मंदिर आहे. चौंडेश्र्वरी देवी भंडारा जिल्ह्यातील अंबागड येथे मध्ययुगीन किल्ला आहे. बख्त बुलंदशाह या गोंड राजाच्या कालावधीत, १८ व्या शतकात तो बांधला गेला असे इतिहास सांगतो. या किल्ल्याच्या व गावाच्या परिसरात असंख्य आंब्याची झाडे होती. पूर्वी या किल्ल्याचा वापर तुरुंग म्हणूनच केला जात असे.

जिल्ह्यातील पवनी हे ठिकाण पदमावती नगरी म्हणून ओळखले जात असे. वैनगंगेच्या काठावर असलेले हे ठिकाण बौध्द धर्मीयांचे महत्त्वाचे क्षेत्र आहे. तिथे बौध्दकाळातील स्तूप आहे. कर्हाडा आणि बालसमुद्र या नावाचे दोन तलावही आहेत. सिंधपुरी बौद्धविहार हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. येथील सांगडी किल्ला, चांदपूरचा तलावही प्रसिद्ध आहेत.पवनी तालुक्यातील अड्याळ येथील श्रीहनुमान मंदिर प्रसिद्ध आहे. चैत्र शुद्ध नवमीला येथे यात्रा भरते. ही यात्रा घोड्याची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. पवनी येथेच आद्यकवी मुकुंदराज यांचे स्मारक आहे.

वैनगंगा नदीच्या पात्रात माडगी हे बेट निर्माण झाले आहे. येथे प्राचीन नृसिंह मंदिर असून येथे कार्तिक पौर्णिमेला मोठी यात्रा भरते.गायमुख येथे अंबागड टेकडीवरील प्राचीन शिवमंदिर प्रसिद्ध आहे. येथे गोमुखातून सतत पडणारी धार अति पवित्र समजली जाते. महाशिवरात्रीस येथे मोठी यात्रा भरते.कोका हे जंगलात वसलेले प्रसिद्ध स्थळ आहे. येथे डिसेंबर महिन्यात सैबेरियामधून येणारे पक्षी थंडीतील स्थलांतरादरम्यान येतात व जानेवारीच्या मध्यास परत जातात.

सामाजिक / विविध :

भंडारा जिल्हा शैक्षणिकदृष्ट्या नागपूर विद्यापीठाच्या अंतर्गत येतो. या विद्यापीठाशी संलग्न असलेली एकूण सुमारे ६० महाविद्यालये या जिल्ह्यात आहेत.गोंड, कोहली, पोवार, गोवारी, हळबी या जाती जमातींचे लोक भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळतात.

विशेष व्यक्ती :

महानुभव पंथाचे संस्थापक चक्रधर महाप्रभू यांनी भंडारा जिल्ह्यातील अनेक गावांना भेटी दिल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. चक्रधर स्वामींचे प्रदीर्घकाळ वास्तव्य येथे असल्यामुळे या ठिकाणी त्यांचे अनेक शिष्य तयार झाले. त्यांच्या पहिल्या काही शिष्यांपैकी एक नीळकंठराय भंडारेकर हे भंडारा येथीलच होते.

No comments

Hindi vyakaran Mock Test

Scholarship Exam 2024 PAPER 1/2 : Hindi अनेकार्थी शब्द Start The Quiz Time's Up score: Next question See Your Result Total Quest...

Powered by Blogger.