ताराबाई मोडक

        ताराबाई मोडक (जन्म : इंदूर, १९ एप्रिल, इ.स. १८९२; मृत्यू : ३१ ऑगस्ट , इ.स. १९७३) ह्या एक मराठीभाषक आणि 'भारतातीलपहिल्या बालशिक्षणतज्ज्ञ होत्या. त्यांना भारताच्या 'मॉन्टेसरी’ म्हणतात.

ताराबाईंचा जन्म इंदूरचा आणि बालपणही तिथेच गेले. त्यांचे आई आणि वडील प्रार्थना समाजाचे अनुयायी होते.. त्यामुळे घरात प्रगत वातावरण होते. त्यांचे वडील सदाशिव पांडुरंग केळकर यांनी १९ व्या शतकात ठरवून विधवेशी पुनर्विवाह केला होता. प्रार्थना समाजाचे बळ त्यांच्या पाठीशी होते. अशा या आधुनिक वातावरणात ताराबाई वाढल्या. केळकर कुटुंब कालांतराने इंदूर सोडून मुंबईला स्थायिक झाले. पण ताराबाई आणि त्यांच्या बहिणीची रवानगी पुण्याच्या हुजूरपागेत झाली (इ.स. १९०२). पुनर्विवाहित आईची मुलगी म्हणून समाजाकडून त्यांना प्रसंगी हेटाळणीही सहन करावी लागली. शाळेच्या वसतिगृहात त्यांना प्रवेश नाकारला गेला. पण ताराबाईंना आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा कायमच अभिमान वाटत राहिला. शाळेत असताना त्यांनी वाचनालयाच्या ग्रंथपालांकडे भास्कराचार्यांचे ’लीलावती’ आहे का अशी विचारणा केली होती. ग्रंथालयात ते पुस्तक नव्हते, पण ग्रंथपालबाईंना त्यावेळी या मुलीचे खूप कौतुक वाटले होते.

याच दरम्यान त्यांच्या वडिलांचे निधन झाले (१९०६) आणि ताराबाई पुणे सोडून मुंबईला आल्या. इथे त्या एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत (अलेक्झांड्रा गर्ल्स हायस्कूलमध्ये) जाऊ लागल्या. सुरुवातीला त्या शाळेत जायला ताराबाई नाराज होत्या. बूट घालण्यासारखे रिवाज त्यांना पसंत नव्हते. पण लवकरच त्या शाळेत रुळल्या आणि पाश्चात्य समाजाच्या संपर्कात आल्या. वातावरणातला हा बदल ताराबाईंना खूप शिकवून गेला. पण लवकरच त्यांच्या आईदेखील वारल्या (१९०८). आई आणि वडील या दोघांचाही आधार आता तुटला होता. आर्थिक चणचण दिवसेंदिवस वाढत होती. १९०९साली ताराबाई मॅट्रिक झाल्या.

ताराबाई मोडक या प्रथम मुंबईच्या एल्फिम्स्टन कॉलेजात आणि नंतर विल्सन कॉलेजात शिकू लागल्या. १९१४साली फिलॉसॉफी घेऊन बी.ए. झाल्या. १०१६साली त्या एम.ए.च्या परीक्षेला बसल्या, पण तीत पास होऊ शकल्या नाहीत.

प्रार्थना समाजामुळे प्रगत विचार आणि जीवनमान ताराबाईंच्या अंगवळणी पडले होते. त्यांच्या या अभिरुचिसंपन्न जीवनशैलीनेच त्यांना प्रतिकूल परिस्थितीत जगण्याचे बळ दिले. एकीकडे शिस्तबद्ध अध्ययन चालू असतानाच त्यांनी विविध छंद जोपासले. टेनिस, बॅडमिंटन तर त्या उत्तम खेळतच पण विविध विषयांवर वैचारिक देवाणघेवाण करण्यात त्यांना विशेष रस होता.

कॉलेजमध्ये असतानाच त्यांचा परिचय के.व्ही. मोडक यांच्याशी झाला. के.व्ही. हे एल्‍फिन्स्टन कॉलेजचे माजी प्राचार्य वामन मोडक यांचे चिरंजीव. मोडक कुटुंबही प्रार्थना समाजाशी बांधिलकी ठेवून होते. ताराबाई आणि के.व्ही. यांच्या ओळखीचे रूपांतर लवकरच प्रेमात झाले आणि पदवीधर झाल्यावर एका वर्षातच त्या के. व्ही. मोडकांशी विवाहबद्ध झाल्या. के.व्ही. त्या वेळी अमरावती मुक्कामी होते आणि तिथे एक निष्णात वकील म्हणून प्रसिद्ध होते. इ.स. १९१५ साली ताराबाई लग्न करून अमरावतीला आल्या, तेव्हा त्या तिथल्या पहिल्या स्त्री पदवीधर होत्या. के.व्ही. आणि ताराबाई यांचा संसार हा दोन आधुनिक, बुद्धिमान आणि प्रतिभावंतांचा संसार होता. अमरावतीच्या सामाजिक क्षेत्रात दोघांचाही दबदबा होता. सभा, संमेलनांतून उठबस होती. साहित्य, संगीत, नाटके, पाहुण्यांची सरबराई यात दिवस जात होते. याच दरम्यान त्यांच्या आयुष्याने एक वेगळीच कलाटणी घेतली.

१९१५साली अमरावतीला मुलींसाठी सरकारी हायस्कूल सुरू झाले. तेथे १९१८पर्यंत ताराबाईंनी नोकरी केली. १९२०मध्ये त्यांना मुलगी झाली.

पुढे काही कारणांनी त्यांचा संसार अपयशी ठरला, त्यांनी विभक्त होण्याचा आणि अमरावती सोडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना मनाचा आत्यंतिक खंबीरपणा त्यांनी दाखवला. ज्या काळात नवऱ्याचे घर सोडणाऱ्या स्त्रीला फक्त परित्यक्ता असेच संबोधले जायचे, त्या काळात ताराबईंनी स्वतंत्र संसार थाटला. सोबत एक वर्षाची कन्या-प्रभा-होती आणि पुढचे भविष्य अंधकारमय होते.

पण ताराबाईंना स्वावलंबी होण्यासाठीची संधी लवकरच चालून आली (१९२१). राजकोटच्या बार्टन फीमेल ट्रेनिंग कॉलेजमध्ये त्यांना प्राचार्यपदासाठी बोलावणे आले. राजकोटची ही नोकरी उत्तम होती आणि त्यांच्यासाठी एक आव्हान होती. एकतर मुलुख गुजराती होता. त्यामुळे आधी शिकवणी लावून गुजराती शिकावी लागली. प्राचार्यपदाच्या कामात व्यवस्थापनाचा मोठा वाटा होता. त्यासाठी त्यांनीबडोदा, अहमदाबाद येथील ट्रेनिंग कॉलेजना भेट देऊन व्यवस्थापनाचे तंत्रही आत्मसात केले. ताराबाईंनी ही नोकरी जेमतेम दोन वर्षे केली. या वेळी त्यांची नोकरी सोडायला कारण होती त्यांची मुलगी प्रभा! तिच्या त्यांच्या मुलीच्या, प्रभाच्या भविष्याच्या चिंतेखातर, तिची कुचंबणा लक्षात घेऊन ताराबाईंनी राजकोटची नोकरी सोडली. कॉलेजात नोकरीत असताना ताराबाईंनी मानसशास्‍त्रावरील खूप पुस्तके वाचली.

याच काळात त्यांनी गिजुभाई बधेका यांच्या भावनगर येथील शिक्षणप्रयोगांविषयी वाचले आणि त्या सौराष्ट्रातील भावनगरला येऊन दाखल झाल्या. गिजुभाई भावनगरमधील ‘दक्षिणामूर्ती’ या संस्थेत मॉन्टेसरी शिक्षणपद्धतीनुसार बालशिक्षणात प्रयोग करत होते. त्यांनाही त्यांच्या या कार्यात सहकारी हवाच होता आणि ताराबाईंच्या रूपाने तो मिळाला. ताराबाई स्वत: उच्चशिक्षित, शिकवण्याची कला आणि आवड असलेल्या आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एखादी गोष्ट स्वीकारली की, तडीस नेण्यासाठी झोकून देणाऱ्या होत्या.

गिजुभाई आणि ताराबाईंची भेट ऐतिहासिक होती. भारतातल्या बालशिक्षणाची ती नांदी होती. दोघांनी मिळून बालशिक्षणाला मूर्तरूप देण्याचा प्रयत्न केला. ज्या काळात खुद्द शिक्षणालाच फारसे महत्त्व नव्हते आणि प्राथमिक शिक्षण ६ व्या वर्षापासून सुरू होत होते, त्या काळात बालशिक्षणाचे महत्त्व लोकांना पटवून देणे हा ‘वेडेपणा’ होता. समाजाची ही मानसिकता ताराबाई ओळखून होत्या. त्यामुळे लोकांपर्यंत जायचे तर आपल्या म्हणण्याला शास्त्रीय बैठक असायला हवी हे त्या जाणून होत्या. म्हणूनच ताराबाई आणि गिजुभाईंनी शास्त्राचा आधार असणाऱ्या मॉन्टेसरी शिक्षणपद्धतीचा अभ्यास करून त्यांना भारतीय रूप देण्याचा प्रयत्न केला. तरीही त्यांच्या या प्रयत्नाकडे निव्वळ ‘फॅड’ म्हणून बघणाऱ्यांची संख्या कमी नव्हती. आज बालशिक्षण एक शास्त्र म्हणून उदयाला आले आहे. पण त्याचे बीजारोपण करण्याचे काम गिजुभाईंबरोबर ताराबाईंनी केले. गिजुभाईंना त्यामुळेच ताराबाई गुरुस्थानी मानत आल्या. त्यांच्याकडूनच त्यांनी बालशिक्षणाची संथा घेतली. त्यांच्या प्रत्येक प्रयोगात मनापासून सामील झाल्या.

भावनगरमधील वास्तव्याने त्यांच्यातील लेखिकेलाही आकार दिला. १९२६ साली नूतन बालशिक्षण संघाची (मॉन्टेसरी संघाची) स्थापना झाली आणि त्याच्यातर्फे ‘शिक्षणपत्रिका’ हे मासिक प्रकाशित होऊ लागले. या नियतकालिकाचे संपादन ताराबाईंनी केले. या मासिकाची हिंदी आणि मराठी आवृत्ती ताराबाईंच्या बळावरच उभी राहिली. इथे असतानाच ताराबाईंनी शंभरच्यावर पुस्तकांचे संपादन केले, काहींचे लेखन केले, बालशिक्षणाच्या प्रसारासाठी मॉन्टेसरी संमेलने भरवली आणि बालशिक्षण हे त्यांचे कार्यक्षेत्रच बनून गेले. ताराबाई भावनगरविषयी म्हणतात, ‘तेथेच मला माझे गुरू, जीवनदिशा आणि जीवनकार्य गवसले’.

ताराबाई भावनगरला ९ वर्षे होत्या. या काळात त्यांनी फक्त मॉन्टेसोरींच्या तत्त्वांचा अभ्यासच केवळ केला असे नाही, तर ती प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय संदर्भानुसार त्यांत बरेच बदल केले. आपल्याकडे शिक्षणाला पावित्र्याची किनार आहे. याचा विचार करून बालघरांचे रूपांतर बालमंदिरांत केले. बालशिक्षणात भारतीय नृत्यप्रकार, कलाप्रकार, लोकगीते आणि अभिजात संगीत यांचाही समावेश केला. माँटेसोरी तत्त्व बालकांच्या विकासाबरोबरच त्यांच्या स्वातंत्र्याला प्राधान्य देते. ताराबाई प्रयोग करत असलेला काळ गांधीयुगाचा म्हणजे पर्यायाने स्वातंत्र्ययुद्धाचा होता. त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्याला, बालस्वातंत्र्याला विशेष अर्थ होता. ताराबाईंनी या सर्व विचारांचा, संकल्पनांचा मेळ आपल्या बालशिक्षणात साधला.

बालशिक्षणात प्रयोग आणि त्याचा प्रसार करत असतानाच ताराबाईंनी शिक्षकांचे प्रशिक्षण हाती घेतले. त्यापाठोपाठ बालशिक्षण तळागाळापर्यंत जाण्यासाठी पालक आणि शासन यांच्या प्रबोधनाचे कामही केले. इतके सगळे करूनही त्यांना आता ध्यास लागला होता तो खेड्यातील बालशिक्षणाचा!

खेड्यांमध्ये बालशिक्षणाचा प्रसार करायचा असेल, तर त्यासाठी स्वस्त साधने हवीत, शिवाय स्थानिक पातळीवरही सहज उपलब्ध होतील किंवा बनवून घेता येतील अशीही हवीत. गिजुभाईंनी जेव्हा बालशिक्षण आजूबाजूच्या खेड्यातून नेण्याचा विचार केला, तेव्हा अशी साधने बनवण्याची जबाबदारी ताराबाईंवर सोपवली. हेच खेड्यातील बालशिक्षणाचे धडे ताराबाईंना पुढे कोसबाडला उपयोगी पडले.

पुढील काळात मुंबईला आल्यावर त्यांनी दादरला आपल्या कल्पनांवर आधारित असे शिशुविहार सुरू केले. इथे येऊन त्यांना आपल्या बालशिक्षणाचा पुन्हा श्रीगणेशा करावा लागला. कारण तोपर्यंत बालशिक्षण आणि ताराबाई दोन्हीही महाराष्ट्राला नवखे होते. शिशुविहारची स्थापना त्यांनी इ.स. १९३६ मध्ये केली आणि जसजशा या बालशाळा वाढत जातील, तसतसा त्यांना आवश्यक असणारा प्रशिक्षित शिक्षकवर्गही लागणार या विचाराने शिशुविहारमध्येच त्यांनी बाल अध्यापक विद्यालयाची मंदिराची स्थापना केली. शिशुविहार आणि बालअध्यापक विद्यालय यांचे पुढच्या दहा वर्षांचे नियोजनही त्यांनी व्यवस्थित करून ठेवले. पुढे पुन्हा खेड्यात जाऊन पूर्णवेळ बालशिक्षणाला वाहून घेण्याची भावना मूळ धरू लागली. त्यासाठी त्या ठाणे जिल्ह्यातील बोर्डीला वास्तव्यास आल्या. या वेळी त्यांच्याबरोबर त्यांच्या शिष्या अनुताई वाघ होत्या. बोर्डीला आल्या तेव्हा ताराबाईंच्या आयुष्याची मध्यान्ह केव्हाच उलटून गेली होती आणि बालशिक्षणातही त्या मुरल्या होत्या. अनुताईंचीमात्र ही सुरुवात होती.

इ.स. १९४५ मध्ये बोर्डीला आल्यावर ताराबाईंनी आपले पूर्ण लक्ष बालशिक्षणावर एकवटले. आता त्यांना त्यांच्या प्रयोगांना ग्रामीण संदर्भांचे परिमाणही द्यायचे होते. कालांतराने कोसबाडला आल्यावर त्यांच्या प्रयोगांना आदिवासींच्या संदर्भांचे परिमाणही मिळाले आणि साऱ्या देशात एकमेव ठरावी अशी सर्वव्यापी बालशिक्षणाची पद्धत अस्तित्वात आली. बोर्डी आणि कोसबाड इथल्या आपल्या अठ्ठावीस (२८) वर्षांच्या वास्तव्यात ताराबाईंच्या नेतृत्वाखाली आदिवासींच्या शिक्षणाचा डोलारा कसा उभा राहिला हा इतिहास ग्रंथबद्ध आहे. गिजुभाईंना जशा त्यांच्या आदर्श सहकारी म्हणून ताराबाई मिळाल्या तशाच ताराबाईंना गुरुस्थानी मानून त्यांच्या प्रत्येक प्रयोगात सर्वस्व ओतून काम करणाऱ्या अनुताई मिळाल्या. या दोघींनी हरिजन वाड्यापासून सुरू केलेला प्रवास कुरणशाळा, घंटाशाळा, अंगणवाडी असा होत शेवटी आदिवासी समाजात शिक्षण प्रसार आणि रोजगारनिर्मिती करण्यापर्यंत झाला.

ताराबाईंचे हे योगदान केंद्र सरकारच्या नजरेतूनही सुटले नाही आणि त्यांनी ताराबाईंना इ.स. १९६२ साली ‘पद्मभूषण’ हा प्रतिष्ठेचा नागरी सन्मान बहाल केला.

शिक्षणतज्ज्ञ या नात्याने ताराबाईंनी अनेक पदे भूषवली. त्यांना अनेक मान-सन्मान मिळाले. गिजुभाईंच्या निधनानंतर इ.स. १९३९ पासून नूतन बालशिक्षण संघाची धुरा त्यांच्याचकडे होती. इ.स. १९४६-इ.स. १९५१ अशी पाच वर्षे त्या तत्कालीन मुंबई राज्याच्या विधानसभा सदस्या होत्या. याच राज्यात प्राथमिक शाळा पाठ्यपुस्तक समितीवर त्यांनी अनेक वर्षं काम केले. अखिल भारतीय बालशिक्षण विभागाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या. इतर अनेक राज्ये आणि केंद्र सरकारच्या शिक्षण समितीवर त्यांची नेमणूक झाली होती. महात्मा गांधींनी आपल्या बुनियादी शिक्षण पद्धतीचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपवले होते. १९४९ मध्ये इटलीतील आंतरराष्ट्रीय दादरला परिषदेत भाषण करण्याची संधी त्यांना मिळाली होती.

ताराबाईंच्या आयुष्याची चित्तरकथा जितकी विलक्षण आहे, तितकीच ती त्यांच्याविषयीचा आदर दुणावणारी आहे. पावलोपावली भिडणारी प्रतिकूल परिस्थिती त्यांनी संकट म्हणून न स्वीकारता संधी म्हणून स्वीकारली आणि निव्वळ मार्गच काढला नाही, तर त्यातून सुंदर संकल्पना घडवल्या. वैयक्तिक होरपळीचे प्रतिबिंब ना कधी त्यांच्या स्वभावावर, ना व्यक्तिमत्त्वावर आणि ना कधी त्यांच्या कार्यावर पडले.

ताराबाईंची कर्मभूमी ठाणे जिल्ह्यातली असली, तरी त्यांच्या कार्याने फक्त तेवढ्याच भागाला फायदा झाला नाही, तर त्यांचे कार्य खेड्यातील आणि आदिवासी भागातील बालशिक्षण तंत्राचे एक देशव्यापी ‘मॉडेल’ बनले. पद्मभूषण ताराबाई मोडक यांचे ऑगस्ट ३१ इ.स. १९७३ ला मुंबईत निधन झाले. इ.स. १९३६ मध्ये पद्मभूषण ताराबाई मोडक यांनी मुंबईत दादरला शिशुविहार ही संस्था स्थापन केली. 

No comments

Hindi vyakaran Mock Test

Scholarship Exam 2024 PAPER 1/2 : Hindi अनेकार्थी शब्द Start The Quiz Time's Up score: Next question See Your Result Total Quest...

Powered by Blogger.