मापन, ऊर्जा
मापन
- अचूक मोजमाप अंदाज आणि तुलना करून येत नाही. त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष मोजमाप करुनच ठरवावे लागते. मोजमाप करणे यालाच मापन म्हणतात. वस्तुमान, अंतर, तापमान, काळ यांचे मापन नेहमी करावे लागते. यांनाच राशी म्हणतात.
- लांबी, वस्तुमान, काल, आकारमान, क्षेत्रफळ, तापमान या राशी आहेत. मापनासाठी प्रमाणित मापाची आवश्यकता असते. या मापाला एकके म्हणतात. यामुळे मापनात एकसूत्रता येते.
- मीटर हे लांबीचे एकक आहे. सेकंद, मिनिट किंवा तास हे काळाचे एकक आहेत. तर ग्रॅम, किलोग्रॅम, क्विंटल हे वस्तुमानाची एकके आहेत.
- अनेक देशांत अंतरासाठी मीटर हे माप वापरतात. मैदानाची लांबी-रुंदी कापड मीटर मध्ये मोजतात. मीटरपेक्षा कमी अंतरासाठी सेंटीमीटर हे लहान माप वापरतात. त्यापेक्षा कमी अंतर असेल तर मिलिमीटर हे माप वापरतात.
- एखादा पदार्थ द्रवात बुडवल्यास तो स्वतःच्या आकारमानाएवढा द्रव बाजूला सारतो या नियमाचा उपयोग करून अनेक आकाराच्या स्थायूचे आकारमान काढता येते.
धारकता
- एखाद्या भांड्यात किती द्रव मावेल याला त्या भांड्याची धारकता किंवा धारण क्षमता म्हणतात.
- पदार्थाचे तापमान पाहण्यासाठी तापमापीचा उपयोग होतो. अंश सेल्सिअसने तापमान मोजण्याचे एकक आहे. ते (°C) अंश सेल्सियस असे लिहितात.
- एखादी घटना घडण्यासाठी लागणारा किंवा दोन घटनांच्या मधला वेळ म्हणजेच काल होय, कालमापनासाठी घड्याळाचा उपयोग होतो. सेकंद, मिनिट, तास कालमापनाची एकके आहेत.
- एम. के. एस. (M.K.S.) पद्धती ही प्रचलित मापन पद्धती आहे. लांबी, वस्तुमान आणि काळ या तीन भौतिक राशी मूलभूत राशी समजल्या जातात. या पद्धतीत लांबी मीटरमध्ये वस्तुमान किलोग्रॅम मध्ये व काळ सेकंदात मोजतात. 1960 पासून मॅट्रिक पद्धतीचा जगभर वापर करण्यास सुरुवात झाली.या पद्धतीलाच SI (System Internation) असेही म्हणतात.
- सी. जी. एस. पद्धती (C.G.S.) या पद्धतीमध्ये लांबी सेंटीमीटर मध्ये, वस्तुमान ग्रॅममध्ये व काल सेकंदात मोजला जातो.
- मौल्यवान, विशेष महत्त्वाच्या आणि अल्प प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या पदार्थांचे मापन नेहमीच काटेकोरपणे आणि अचूक केले जाते.
- •मापन किती अचूक असावे हे मापन कशासाठी होणार यावर ठरते. त्याप्रमाणे त्या त्या साधनांचा वापर मापनासाठी करावा लागतो.
- तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अंतर, वस्तुमान, काल यासारख्या राशींची सूक्ष्म मापने अचूकपणे करणारी साधने आता उपलब्ध आहेत.
- 1960 सालचे रोम शहरातील ऑलिंपिक स्पर्धेमध्ये 'फ्लाईंग शिख' मिल्खा सिंग या धावपटूचे पदक 1/10 सेकंदाने हकले होते. तर 1984 साली लॉस एंजेलिस मध्ये झालेल्या ऑलिंपिक शर्यतीत पीटी उषा या भारतीय धावपटूचे पदक तर केवळ 1/100 सेकंदाने हकले हे तेथील प्रगत तंत्रज्ञानाच्या साह्याने कळाले.
- कोणतेही मापन करताना दोन प्रकारच्या चुका संभवतात. एक म्हणजे
- साधनाची मर्यादा आणि दुसरे म्हणजे ते हाताळताना झालेली हेळसांड किंवा निष्काळजीपणा.
मॅगलेव्ह ट्रेन (Manglev Train) -
- चुंबकाचा अगदी अलीकडचा वापर म्हणजे मॅगलेव्ह गाडी. तासी 500 ते 580 किलोमीटर वेगाने धावणारी मॅगलेव्ह ट्रेन हे तिचे नाव. सजातीय चुंबकाच्या परस्परांपासून लांब जाण्याच्या गुणधर्माचा मॅगलेव्ह ट्रेन मध्ये वापर झाला आहे. या गुणधर्मामुळे मॅगलेव्ह गाडीचा तळ आणि रूळ परस्परांपासून लांब जातात. त्यामुळे ही गाडी धावताना रुळावरून चक्क अधांतरी उचलली जाते. या गाडीला लिनियर मोटरच्या सहाय्याने वेग दिला जातो.
गती आणिगतीचे प्रकार -
- एकाच दिशेने जाणाऱ्या गतीला रेषीय गती म्हणतात.
- ठराविक अंतर विशिष्ट वेळेत पार करणाऱ्या गतीला एकसमान गती म्हणतात.
- आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला आंदोलित गती म्हणतात.
- ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून जाते त्या गतीला नियतकालिक गती म्हणतात.
- पृथ्वीची सूर्याभोवती आणि चंद्राची पृथ्वीभोवती असणारी गती नियतकालिक असते. नियतकालिक गतीमध्ये ठराविक वेळेत एक फेरी पूर्ण व्हावी लागते.
- ज्या गतीची दिशा सतत बदलत असते त्या गतीला यादृच्छिक गती म्हणतात. फुलपाखरांची गती आणि फुटबॉलच्या सामन्यातील खेळाडूंची गती सुद्धा याच प्रकारचे असते.पद्धतीतील एकक सेमी/सेकंद आहे.
ऊर्जा
- प्रत्येक गतिमान वस्तूमध्ये ऊर्जा असते. गतीमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेला गतिज ऊर्जा म्हणतात.
- उष्णता, ध्वनी आणि प्रकाश ही ऊर्जेची रूपे आहेत. फटाक्यांतील पदार्थांमध्ये रासायनिक ऊर्जा ठासून भरलेली असते. त्यामुळेच आघात केल्याबरोबर किंवा पेटवल्या बरोबर प्रकाश, आवाज आणि उष्णता बाहेर पडते.
- ऊर्जा कधीच नष्ट होत नसते. तिचे एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतरण होत असते. हिवाळ्यात दोन्ही हात चोळतो तेव्हा गतीज ऊर्जेचे उष्णतेत रूपांतर होते.
- सजीवांना अन्नातून ऊर्जा मिळते. वनस्पती हे मानवाचे आणि प्राण्यांचे मुख्य अन्न आहे. म्हणजेच वनस्पती हा ऊर्जेचा एक महत्त्वाचा स्त्रोत ठरतो.
- जट्रोपा, करंज अशा वनस्पतींपासून इंधन तेल मिळवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. म्हणून या वनस्पतींची लागवड पुरेशा प्रमाणात करण्याचे प्रोत्साहन दिले जात आहे.
- जनावरांचे शेण, पालापाचोळा यांचा ऊर्जास्त्रोत म्हणून वापर करतात. यांच्यापासून गोबरगॅस किंवा बायोगॅस मिळतो. गोबरगॅस संयंत्र मध्ये शेणावर सूक्ष्मजीवांची क्रिया घडवून आणले जाते. त्यापासून मिथेन वायूतयार होतो.
- सौरऊर्जा, वारा, वाहते पाणी, समुद्राच्या लाटा, हे ऊर्जेचे अपारंपरिक स्त्रोत आहेत.
पदार्थ वेगळे करण्याची पद्धत -
- स्थायू, द्रव आणि वायू यापैकी कोणतेही पदार्थ एकमेकांत मिसळले की मिश्रण तयार होते.
- मळणी करणे, पाखडणे, चाळणे, निवडणे या पदार्थ वेगळे करण्याच्या सर्वसाधारण पद्धती आहेत.
- स्थायूंना उष्णता दिल्यानंतर सामान्यतः त्यांचे प्रथम द्रवात आणि नंतर वायूत रूपांतर होते परंतु काही स्थायूंना उष्णता मिळाली की त्याचे रूपांतर द्रवात न होता एकदम वायूमध्ये होते याला संप्लवन असे म्हणतात. आयोडीन, नवसागर, कापूर, डांबराच्या गोळ्या हे संप्लवनशील पदार्थ आहेत.
- चुंबकीय गुणधर्माचा उपयोग करून मिश्रणातील चुंबकीय पदार्थ वेगळे करता येतात.लोखंड, कोबाल्ट, निकेल हे धातूचुंबकीय आहेत.
इंद्रिय संस्था
- ठराविक काम एकत्रितपणे करणाऱ्या इंद्रिय समूहाला 'इंद्रिय संस्था' असे म्हणतात.
- दात, जीभ, जठर, लहान आतडे, मोठे आतडे तसेच लाळग्रंथी, अंतरग्रंथी, स्वादुपिंड ही सर्व अन्नपचनास मदत करणारी पंचनेंद्रिय आहेत. ही सर्व पंचेंद्रिय समूहाने पचनाचे काम करतात.
- अन्नपचनाचे काम एकत्रितपणे करणाऱ्या पचन इंद्रियांच्या समूहाला पचन संस्था असे म्हणतात.
- अन्नाचा घास चावण्याचे काम तोंडात सुरू असतानाच त्यात लाळ मिसळली जाते. लाळ तयार करणाऱ्या ग्रंथींना लाळ ग्रंथी म्हणतात. लाळेमध्ये टायलिन नावाचा पाचक रस असतो. या रसामुळे पिष्टमय पदार्थाचे ग्लुकोजमध्ये म्हणजेच साखरेत रूपांतर होते.
- जठरात आलेले हे अन्न काही वेळ घुसळले जाते. त्या वेळी जठर रस नावाचा पाचक रस त्यात मिसळतो. लहान आतड्यात अन्नामध्ये आणखी तीन पाचक रस मिसळतात. तेथे तयार होणारा आंत्ररस यकृत नावाच्या ग्रंथीत तयार होणारा पित्तरस आणि स्वादुपिंडात तयार होणारा स्वादुरस या पाचक रसांमुळे लहान आतड्यात अन्नपचनाचे काम होते.
- नाक, श्वासनलिका फुप्फुसे, श्वासपटल आणि छातीचा पिंजरा यांची श्वसनक्रियेत मदत होते. या इंद्रियांना एकत्रितपणे श्वसन संस्था असे म्हणतात.
जीवसृष्टीचे आवरण
- संपूर्ण पृथ्वीभोवती वायूचे आवरण आहे त्याला वातावरण म्हणतात. या वातावरणाचे वेगवेगळे थर मानले जातात. या वातावरणात मुख्यत्वेकरून नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड हे वायू, पाण्याची वाफ धुलीकण हे घटक आहेत.
- वातावरणातील ऑक्सिजन सजीवांच्या श्वसनासाठी आवश्यक आहे. सजीवांचे अस्तित्व त्यावर अवलंबून आहे. याशिवाय ज्वलनासाठी ऑक्सिजन आवश्यक आहे तर हवेतील कार्बनडाय ऑक्साईड, पाणी, सूर्यप्रकाश व हरितद्रव्याच्या मदतीने वनस्पती अन्न तयार करतात.
- वातावरणातील नायट्रोजनपासून नायट्रेट्सची निर्मिती होते. या नायट्रेट्सचा वनस्पतींच्या वाढीसाठी उपयोग होतो.
- सूर्यापासून निघणारे काही अपायकारक किरण वातावरणात शोषले जातात म्हणून वातावरण हे पृथ्वीचे एक संरक्षक कवच आहे असे म्हणता येते.
- पाणी, बर्फ आणि वातावरणातील पाण्याची वाफ या स्वरूपात पृथ्वीभोवती पाण्याचे आवरण असते त्यालाच जलावरण असे म्हणतात.
- पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या दृष्टीने समुद्राचे महत्त्व फार मोठे आहे.
- जगातील अनेक लोकांसाठी समुद्रातील मासे हे महत्त्वाचे अन्न आहे. त्याचप्रमाणे मीठ, आयोडीन यासारखे उपयुक्त पदार्थ समुद्राच्या पाण्यातून मिळवले जातात. सर्वांच्या मृत अवशेषांपासून खनिज तेल बनण्याची प्रक्रिया सागराच्या तळातच घडत असते. यापासूनच आपल्याला पेट्रोल, डिझेल, रॉकेल, पॅराफिण, डांबर, मेण यासारखे उपयुक्त पदार्थ मिळतात.
- पृथ्वीवरील जमीन हा शिलावरणाचा महत्त्वाचा भाग आहे. मानवासाठी लागणारे अन्न, इमारती, घरे, उद्योगधंद्यांसाठी लागणारी खनिजे जमिनीतूनच मिळतात.ही जमीन शिलावरणाचा प्रमुख भाग आहे.
- वातावरण, जलावरण आणि शिलावरण या तिन्ही आवरणाच्या जीवसृष्टीने व्यापलेल्या भागाला जीवावरण म्हणतात.
- वातावरण, जलावरण आणि शिलावरण यांचा जीवसृष्टीशी महत्त्वाचा संबंध असतो, त्यामुळे पृथ्वीवर जीवसृष्टी टिकून आहे.
त्सुनामी
- जमिनीप्रमाणेच सागराच्या तळाशी भूकंप होतात अशा भूकंपामुळे सागरात अधिक लाटा निर्माण होतात.
- महासागराच्या तळाशी भूकंपामुळे निर्माण होणाऱ्या या लाटांना त्सुनामी लाटा म्हणतात. त्सुनामी हा जपानी भाषेतील शब्द आहे. त्सुनामी याचा अर्थ किनाऱ्यावर येऊन धडकणारी मोठी लाट असा होतो.
आपले पर्यावरण
- परिसर म्हणजे आसपासची जागा. जीवनाशी संबंध असलेल्या सभोवतालच्या सगळ्या गोष्टींना पर्यावरण म्हणतात. सर्व सजीव हवा, पाणी, जमीन, सूर्यप्रकाश हे सारे पर्यावरणाचे घटक आहेत.
- पर्यावरणाच्या एखाद्या घटकात जरी बिघाड झाला तरी इतर घटकांशी असलेल्या संबंधावर परिणाम होऊन पर्यावरणाचा समतोल बिघडतो.
- पृथ्वीभोवतीचे वायूंचे आवरण म्हणजेच पृथ्वीचे वातावरण. समुद्रसपाटीपासून सुमारे 17 ते 26 किमी उंचीवरच्या वातावरणाच्या थरात ओझोन नावाचा एक वायू असतो.
- या ओझोन वायूचा जगण्यासाठी सजीवांना उपयोग नसला तरी सूर्याकडून येणाऱ्या प्रकाशात काही घातक किरण असतात, हे किरण पृथ्वीवर जमिनीपर्यंत पोचणे सजीवांच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असून सजीवांचा यामुळे हास सुद्धा होऊ शकतो.
- पृथ्वीकडे येणारा सूर्यप्रकाश वातावरणातून येताना ओझोनच्या थरात हे किरण बऱ्याच प्रमाणात शोषले जातात, ते आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत. यांमुळे होणारे धोके टळतात.
Post a Comment