लातूर जिल्हा
प्रारंभीच्या काळात मौर्यांच्या अधिपत्याखाली असणारा लातूर हा भाग पुढे सातवाहन, राष्ट्रकूट व यादव घराण्याच्या अंमलाखाली होता. पुढे काही काळ या प्रदेशावर दिल्लीचे सल्तनत, बहामनी राजवट, निजामशाह व आदिलशाह यांनी राज्य केले. मध्यंतरी औरंगजेबाने हा भाग मोगल सत्तेच्या अंमलाखाली आणला. स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळापर्यंत निजामाच्या अखत्यारीत असणारा हा भाग १९४८ मधे तत्कालीन मुंबई प्रांतात समाविष्ट करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचा निर्मितीनंतर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये असणारा लातूरचा भाग १५ ऑगस्ट १९८२ पासून उस्मानाबादपासून वेगळा करण्यात आला आणि अशा प्रकारे स्वतंत्र लातूर जिल्हा अस्तित्वात व नावारुपास आला. लातूर हे मराठवाडयातील एक ऐतिहासिक शहर आहे. दक्षिणेवर राज्य करणार्या राष्ट्रकूट राजांच्या राजधानीचे हे शहर होते. पहिला राष्ट्रकूट राजा दंतिदुर्ग याच शहरात राहत असे या शहराचे तत्कालीन नाव कत्तलूर असे होते. पुढे अपभ्रंश होत त्याचे सध्याचे लातूर हे नाव पडले.
इथली शिकवण्याची पद्धत लातूर पॅटर्न नावाने देशभर प्रसिध्द आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि हिंदी-मराठी सुपरस्टार रितेश देशमुख हे लातूरचेच. लातूर हा मराठवाडा विभागातील एक प्रमुख जिल्हा असून अलीकडच्या काळात लातूर एक गुणवत्तापूर्ण शैक्षणिक केंद्र बनले आहे. ३० सप्टेंबर १९९३ ला पहाटे ३.५६ वाजता झालेल्या ह्या भीषण भुकंपामुळे जिल्ह्याचे प्रचंड नुकसान झाले होते. परंतु पुढील काळात जिल्हा या धक्क्यातून सावरला आणि आता तो प्रगतीपथावर आहे.
महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेवर आणि कर्नाटकाच्या ईशान्य सीमेजवळ हा लातूर जिल्हा येतो. महाराष्ट्राच्या औरंगाबाद विभागातील हा एक महत्त्वाचा जिल्हा आहे. नांदेड, बीड, उस्मानाबाद हे महाराष्ट्रातील जिल्हे आणि बिदर हा कर्नाटकातील जिल्हा लातूरला जोडून आहेत.
लातूर जिल्ह्यातील तालुके
· अहमदपूर
· उदगीर
· औसा
· चाकूर
· देवणी
· निलंगा
· रेणापूर
· लातूर शहर
· शिरूर (अनंतपाळ)
लातूर जिल्ह्यातील शेतीव्यवसाय
कृषिप्रधान असलेल्या लातूर जिल्ह्यात ज्वारी हे प्रमुख पीक असून ऊसाखालचे क्षेत्रदेखील लक्षणीय आहे. कन्हार जिल्ह्यातील नद्यांच्या खोर्यांमध्ये अतिशय सुपीक माती आढळते. काही भागात हलकी,मध्यम स्वरुपाची तर काही भागात भरडी जमीन आढळते.औसा येथील द्राक्षे प्रसिद्ध आहेत. कापूस, दूध व मध या उत्पादनांसाठी जिल्ह्यात विशेष योजना राबवण्यात येत आहेत.
लातूर जिल्ह्याचे लोकजीवन
लातूरला मराठवाड्याचे पुणे म्हणून ओळखले जाते. लातूर जिल्हा हा शैक्षणिकदृष्ट्या नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाशी जोडला असून या विद्यापीठा-अंतर्गत सर्वांत जास्त ६६ महाविद्यालये आहेत. नांदेडच्या स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठाचे एक उपकेंद्र लातूर येथे स्थापन होत आहे. लातूर शहरात अनेक शैक्षणिक संस्था असून शिक्षणाच्या बाबतीत गेल्या काही वर्षांपासून लातूर जिल्हा एक उत्तम शैक्षणिक केंद्र म्हणून नावारूपाला येत आहे. इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षांमध्ये नेत्रदीपक यश मिळवण्याचा लातूर पॅटर्नच जिल्ह्याने प्रस्थापित केला आहे. केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सी.आर.पी.एफ.) आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्रही लातूरमध्ये कार्यरत आहे. तसेच जिल्ह्यात चाकूर येथे सीमा सुरक्षा दलाचे (बी.एस.एफ.) प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे.
लातूर जिल्ह्याची भौगोलिक माहिती
महाराष्ट्राच्या दक्षिण-पूर्व सीमेवर आणि कर्नाटकाच्या उत्तर-पूर्व सीमेजवळ हा जिल्हा स्थित असून महाराष्ट्राच्या औरंगाबाद विभागातील एक महत्त्वाचा जिल्हा आहे.आग्नेय महाराष्ट्रात मराठवाडा विभागात असणार्या लातूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे ७,१५७ चौ. कि. मी. असून जिल्ह्याच्या उत्तरेस परभणी, उत्तर व पूर्वेस नांदेड, पूर्वेस व आग्नेयेस बिदर (कर्नाटक), दक्षिण व पश्र्चिमेला उस्मानाबाद, वायव्येला बीड हे जिल्हे लातूरला जोडून आहेत. जिल्ह्याचा पश्र्चिम भाग व मध्य भाग बालाघाट डोंगर रांगांनी व्यापलेला आहे. जिल्ह्याच्या मध्यभागी मांजरा नदीचे खोरे, तर दक्षिणेकडे तेरणा नदीचे खोरे पसरलेले आहे. उत्तरेकडील प्रदेश सखल व सपाट आहे.
मांजरा ही जिल्ह्यातील मुख्य नदी असून तेरणा, तावरजा, धरणी या तिच्या उपनद्या आहेत. जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागातून मन्याड, लेंडी या नद्या वाहतात. मांजरा, तेरणा, धरणी, तीरु, तावरजा व मन्याड या नद्यांवर जिल्ह्यात धरणे बांधण्यात आली आहेत. लातूर जिल्ह्याचे हवामान उष्ण, काहीसे सौम्य व कोरडे असून पर्जन्यमान मध्यम स्वरूपाचे आहे. जिल्ह्यात बांधकामाचा दगड मोठ्या प्रमाणावर उपलब्ध हेतो.
लातूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे
प्रसिद्ध स्थापत्य विशारद श्री.फैयाजुद्दीन यांच्या कल्पना आविष्कारातून साकारलेली लातूर शहरातील ‘गंजगोलाई’ ही वर्तुळाकार बाजारपेठ तिच्या रचनेमुळे आकर्षक ठरते. शहरातील अनेक रस्ते या बाजारपेठेस वेगवेगळ्या बाजूंनी येऊन मिळतात. येथील सुरतशाहवाली दर्गा, सिद्धेश्वर मंदिर, केशवराज मंदिर, लातूर-औसा रस्त्यावरील विराट हनुमानाची मूर्ती व पार्श्र्वनाथ मंदिर या सारखी धार्मिक ठिकाणे प्रसिद्ध आहेत. लातूर-आंबेजोगाई रस्त्यावर लातूरपासून आठ कि.मी. अंतरावर मांजरा नदीकाठी महापूर येथे नमानंद महाराजंचा मठ आहे.
मराठे व निजाम यांच्या लढाईचे साक्षीदार असणारे उदगीर शहर हे जिल्ह्यातील महत्त्वाचे ठिकाण असून येथील यादवकालीन भुईकोट किल्ला प्रसिद्ध असून किल्ल्याभोवती असणारा ४० फूट खोलीचा खंदक आणि जमीन पातळीपासून ६० फूट खोलीवरील श्रीउदयगीर महाराजांची समाधी हे येथील मुख्य आकर्षण आहे. उदगीरचा जनावरांचा बाजार देवणी जातीच्या वळूंसाठी प्रसिद्ध आहे.येथून जवळच असणार्या देवर्जन येथे श्रीगंगाराम महाराजांची समाधी आहे.
औसा येथील मलिक अंबरने बांधलेला भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे. याशिवाय येथील श्रीबीरनाथ महाराजांचे देऊळ, श्रीमल्लिनाथ महाराजांचा मठ व औरंगजेबाने बांधलेली मशीद प्रसिद्ध आहे. औसा तालुक्यातील खरोसा या गावातील हिंदू व बौद्ध लेण्यांमधील शैव पद्धतीची शिल्पे प्रेक्षणीय आहेत. जिल्ह्यातील चाकूर शहरापासून जवळच श्री सत्य साईबाबांचे सुंदर मंदिर उभारण्यात आले असून सदर ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून वेगाने विकसित होत आहे. चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथील दुर्मीळ औषधी वनस्पतींची टेकडी प्रसिद्ध आहे.
उपरोक्त स्थानांबरोबरच निलंगा येथील नीलकंठेश्वराचे (महादेवाचे) मंदिर व स्वयंभू शिवलिंग तसेच येथील शाह पीर पाशा कादरी ह्यांचा दर्गा उजना येथील श्रीगणेशनाथ यांची समाधी व रेणापूर येथील रेणुकादेवीचे मंदिर आणि या परिसरातील हलणारी दीपमाळ ही जिल्ह्यातील ठिकाणे जिल्ह्याच्या लौकिकात भर टाकतात.
· अष्टविनायक मंदिर, लातूर
· उदगीरचा किल्ला, उदगीर
· औसा किल्ला, औसा
· खरोसा लेणी, निलंगा
· गंज गोलाई, लातूर
· नागनाथ मंदिर, वडवल
· वनस्पती बेट, वडवल (ना.)
· विराट हनुमान, लातूर
· शिवमंदिर, निलंगा
· साई धाम, तोंडार
· साई नंदनवन, चाकूर
· सिद्धेश्वर मंदिर, लातूर
· हकानी बाबा, लातूर रोड
· हत्ती बेट.
लातूर जिल्ह्यातील दळणवळण सोयी
लातूर जिल्ह्यात सुमारे ८७६३ कि.मी.लांबीचे रस्ते असून त्यापैकी राज्य मार्गाची लांबी ८४५ कि.मी.आहे. रस्त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे ८०% गावे जिल्हा मुख्यालयाशी जोडली गेली आहेत. लातूर शहर मनमाड-सिकंदराबाद या रुंदमापी (ब्रॉडगेज) लोहमार्गाशी जोडण्यात आले असून लातूर-कुर्डूवाडी या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. औरंगाबाद येथे असणारं विमानतळं हे लातूर जिल्ह्यासाठी सोयीचं असून लातूरजवळच एक विमान-धावपट्टीही आहे.
लातूर जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय
स्वातंत्र्यपूर्व काळात होती लोकमान्य टिळक यांनी १८९१ मध्ये लातूर येथे सूत गिरणी सुरू केली होती. पुढे लातूर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर येथील औद्योगिक विकासाला चालना मिळाली. सद्य:स्थितीत लातूर, निलंगा व औसा या ठिकाणी औद्योगिक वसाहती असून हाळी-हंडरगूळी, देवणी, अहमदपूर व मुरूड या ठिकाणी छोटे-मोठे उद्योग चालतात. उदगीर येथील दुधाची भुकटी तयार करण्याचा कारखाना प्रसिद्ध आहे.
त्याचबरोबर ऑईल व डाळ मिल्स हे उद्योगसुद्धा जिल्ह्यात आहेत. वार्षिक उलाढालीचा विचार करता महाराष्ट्रातील सर्वांत मोठी आडत बाजापेठ लातूर येथे आहे. शिवाय लातूर जिल्ह्यात सहा साखर कारखाने ही आहेत. प्लॅस्टिक बूट व चप्पल निर्मितीचे लातूर हे देशातील मोठे केंद्र असून दिल्लीनंतर लातूरचा दुसरा क्रमांक असल्याचे मानले जाते.
Post a Comment