सातारा जिल्हा
सातारा जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील पुणे विभागातील एक जिल्हा आहे. सातारा जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे. सातारा जिल्ह्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे. आधुनिक भारतातसुद्धा सातारा जिल्ह्याने आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागातील या जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,४८० चौ. किमी तर लोकसंख्या ३०,०३,९२२ (२०११) आहे. राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे ३.४% क्षेत्र व लोकसंख्येच्या सुमारे २.८९% लोकसंख्या सातारा जिल्ह्यात आहे. विस्तार अनुकमे १७०५‘ उत्तर, ते १८०११´ उत्तर अक्षांश व ७३०३३´ पूर्व ते ७४० ५४´ पूर्व रेखांश आहे. जिल्ह्यात सातारा, वाई, खंडाळा, कोरेगाव, फलटण, माण (तालुका मुख्यालय दहिवडी), खटाव (वडूज), कराड, पाटण, जावळी (जावली), मेढा, महाबळेश्वर असे एकूण ११ तालुके आहेत. जिल्ह्याच्या उत्तरेस पुणे, पूर्वेस सोलापूर, दक्षिणेस सांगली, पश्चिमेस रत्नागिरी आणि वायव्येस रायगड हे जिल्हे आहेत. जिल्ह्याची उत्तर सरहद्द नीरा नदीने, तर पश्चिम सरहद्द सह्याद्रीने सीमित केली आहे. जिल्ह्याचे दक्षिणोत्तर कमाल अंतर १२० किमी. असून पूर्व-पश्चिम कमाल अंतर १२८ किमी. आहे. जिल्ह्याचा बराच भाग कृष्णा नदीच्या खोर्यात, तर काही भाग भीमा नदीच्या खोर्यात मोडतो. सातारा (लोकसंख्या १,५७,०००–२००१) हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असून ते पुणे-बंगलोर या राष्ट्रीय महामार्गावर (क्र. ४) वसले आहे.
| तहसील (११) | : १. सातारा २. कराड ३.वाई ४. महाबळेश्वर |
| ५. फलटण ६.माण ७. खटाव ८. कोरेगांव |
| ९. पाटण १०. जावली ११. खंडाळा | |
| पंचायत समिती (११) | : १. सातारा २. कराड ३.वाई ४. महाबळेश्वर |
| ५. फलटण ६.माण ७. खटाव ८. कोरेगांव |
| ९. पाटण १०. जावली ११. खंडाळा |
| तहसील ऑफिसेस (११) | : १.सातारा २. कराड ३. वाई ४. महाबळेश्वर |
| ५. फलटण ६.माण ७. खटाव ८. कोरेगांव |
| ९. पाटण १०. जावली ११. खंडाळा |
| नगर पालिका (८) | : १.सातारा २. कराड ३. वाई ४. महाबळेश्वर |
| ५. पांचगणी ६. रहिमतपूर ७. फलटण | |
| ८. म्हसवड | |
| नगर पंचायत | : १ (मलकापूर ) |
| टंचाई ग्रस्त तहसील | : ४ (कोरेगांव ,खटाव,माण ,फलटण ) |
भूवर्णन
पर्वत व डोंगररांगा आणि त्यांच्या कुशीतील उंच पठारी प्रदेश व टेकड्या, उंच सखल भूमी, सपाट मैदानी प्रदेश अशी सातारा जिल्ह्याची प्राकृतिक विविधता आढळते. पश्चिमेकडील सह्याद्री पर्वतरांगांचा प्रदेश, कृष्णा नदीखोर्याचा प्रदेश, नीरा नदीखोर्याचा प्रदेश आणि पूर्वेकडील टेकड्यांचा व माळरानाचा प्रदेश असे जिल्ह्याचे चार स्वाभाविक विभाग पडतात. जिल्ह्याच्या पश्चिम सरहद्दीवर उत्तरेस पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीपासून दक्षिणेस सांगली जिल्ह्याच्या सरहद्दीपर्यंत सह्याद्रीचा विस्तार आहे. कृष्णा नदी खोर्याचा दुसरा स्वाभाविक विभाग सुमारे ३२ किमी. रुंदीचा व साधारण सपाट असून याच्या साधारण मध्यातून कृष्णा नदी वाहते. वाई, सातारा व कराड हे तालुके कृष्णा नदीखोर्याच्या प्रदेशात येतात. येथील जमीन काळी, कसदार व पिकाऊ आहे. नीरा नदी खोर्याच्या प्रदेशात खंडाळा व फलटण तालुक्यांचा बहुतांश भाग अंतर्भूत होतो. कृष्णा नदी खोर्याच्या पूर्वेकडील चौथा स्वाभाविक प्रदेश कमी पावसाचा आणि बहुतांश माळरानाचा आहे. येथील जमीन हलकी, वैराण आणि कमी प्रतीची आहे. कमी पावसामुळे या भागात वारंवार अवर्षणाची परिस्थिती निर्माण होते. खटाव व माण तालुक्यांचा बहुतांश भाग या स्वाभाविक विभागात येतो.
नद्या : सह्याद्रीच्या मूळरांगेपासून लहानलहान फाटे पूर्वेस किंवा आग्नेय दिशेस पसरलेले आहेत. त्यांना अनुसरून नद्यांची वेगवेगळी खोरी निर्माण झाली आहेत. सातारा जिल्हा हे प्रामुख्याने कृष्णा नदीचे जलवाहन क्षेत्र असून येथे कृष्णा, येरळा, माणगंगा, नीरा ही प्रमुख चार नदीखोरी आहेत. क्षेत्र महाबळेश्वर येथे कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री व सावित्री या नद्यांचे उगम-झरे दाखविले आहेत. या नद्या महाबळेश्वरपासून वेगवेगळ्या दिशांना वाहत जातात. कृष्णाही जिल्ह्यातील मुख्य नदी आहे. महाबळेश्वर येथील उगमानंतर वाई, सातारा, कोरेगाव व कराड या तालुक्यांतून, जिल्ह्याच्या साधारण मध्य भागातून सु. १६० किमी. अंतर वाहत जाऊन ती सांगली जिल्ह्यात प्रवेश करते. वाई व कराड ही नगरे या नदीच्या काठावर आहेत. कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्राव्यतिरिक्त कुडाळी, वेण्णा, उरमोडी, तारळी व कोयना ह्या उजवीकडील आणि वसना व येरळा ह्या डावीकडील उपनद्यांच्या पाणलोट क्षेत्रांचा कृष्णानदीच्या बृहत् पाणलोट क्षेत्रात समावेश होतो. कुडाळी ही कृष्णेची एक लहानशी उपनदी जावळी व वाई तालुक्यांतून वाहते. महाबळेश्वर येथेच उगम पावणारी वेण्णा नदी साताऱ्याजवळील माहुली येथे कृष्णा नदीला मिळते. जावळी व सातारा तालुक्यांतून वाहणारी उरमोडी नदी वेणेगाव येथे कृष्णेला मिळते. पाटण व कराड तालुक्यांतून वाहणारी तारळी नदी उंब्रजजवळ कृष्णेला मिळते. कृष्णा नदीवर वाई तालुक्यात धोम गावाजवळ धोम धरण बांधण्यात आलेले आहे.
कोयना ही कृष्णेची जिल्ह्यातील सर्वांत मोठी उपनदी आहे. महाबळेश्वर येथील उगमानंतर जावळी व पाटण तालुक्यांतून दक्षिणेस हेळवाकपर्यंत ती वाहत जाते. त्यानंतर ती पूर्ववाहिनी होते व कराड शहराजवळ कृष्णेला मिळते. हे संगमस्थान प्रीतिसंगम म्हणून प्रसिद्घ आहे. कोयना नदीवरील कोयना धरण वीजनिर्मितीसाठी विशेष प्रसिद्घ आहे. सातारा जिल्ह्याच्या उत्तर सरहद्दीवरून वाहणारी नीरा नदी पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात सह्याद्रीच्या डोंगररांगांत उगम पावते. खंडाळा व फलटण तालुक्यांतून वाहत जाऊन पुढे ती सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते. माणगंगा ही भीमा नदीची उपनदी माण तालुक्याच्या वायव्य भागात उगम पावून आग्नेय दिशेस वाहत जाते व पुढे सांगली जिल्ह्यात प्रवेश करते. म्हस्कोबाच्या डोंगराळ भागात उगम पावणारी येरळा नदी कोरेगाव व खटाव या तालुक्यांतून वाहत जाऊन पुढे सांगली जिल्ह्यात प्रवेश करते.
हवामान : जिल्ह्याचे हवामान उष्ण व कोरडे आहे. जिल्ह्याचा पश्चिम भाग डोंगराळ व वनाच्छादित असल्याने तेथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. याच भागात महाबळेश्वर, पाचगणी ही थंड हवेची ठिकाणे आहेत. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान १३५ सेंमी. असून जून ते सप्टेंबर या कालावधीत नैऋर्त्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. पावसाचे वितरण बरेच असमान आहे. महाबळेश्वर येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान सु. ६२५ सेंमी. असून खटाव, माण यांसारख्या पूर्वेकडील तालुक्यांत ते सु. ६० सेंमी.पेक्षाही कमी आहे. पश्चिमेकडील महाबळेश्वर, जावळी व पाटण हे तालुके अधिक पावसाचे आहेत.
वनस्पती व प्राणी : सातारा जिल्ह्यातील १,५२४ चौ. किमी. क्षेत्र वनांखाली असून त्यांपैकी १,३६९ चौ. किमी. राखीव, ४८ चौ. किमी. संरक्षित व १०७ चौ. किमी. क्षेत्र अवर्गीकृत वनांखाली आहे. महाबळेश्वर, जावळी व पाटण तालुक्यांत तसेच वाई तालुक्याच्या पश्चिम भागात ही वने एकवटलेली आहेत. सह्याद्रीच्या उतारावर सदाहरित वने, तर सह्याद्रीच्या पायथ्याशी मिश्रवने आहेत. कोयना खोऱ्यात व जावळी तालुक्यात सु. ४२४ चौ. किमी. क्षेत्रावर कोयना अभयारण्य आहे. या अभयारण्यात व एकूणच जिल्ह्यातील दाट वनांमध्ये बिबळ्या, गवा, रानडुकरे, अस्वल, सांबर इ. प्राणी आहेत. मायणी तलावाच्या परिसरात पक्ष्यांसाठी राखीव असलेले अभयारण्य विकसित करण्यात आले आहे.
कोयना नदीचे खोरे व कोयना धरणाचा परिसर, महाबळेश्वर, पाचगणी व पाटण परिसरात असलेली वनसंपदा, त्याच्या माध्यमातून होऊ घातलेला व्याघ प्रकल्प, कास, बामणोली, तापोळा परिसर आणि त्या भागात आढळणाऱ्या औषधी वनस्पती या सर्व सातारा जिल्ह्याच्या वैभवाच्या बाबी आहेत. जगभरातील जैव विविधता असलेल्या स्थळांना मानवाकडून धोका आहे. त्यात पश्चिम घाटातील विविध स्थळांबरोबरच सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीचाही समावेश होतो. येथील धोक्यात येत असलेली पर्यावरणीय परिसंस्था जपणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील जैव विविधतेने नटलेला हा भाग पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील परिसर (इको सेन्सेटिव्ह झोन) होणे ही काळाची गरज आहे.
पश्चिम घाटातील विविध स्थळांचा ‘जागतिक वारसा स्थळांत’ (वर्ल्ड हेरिटेज साइट) समावेश होण्यासाठी भारताच्या केंद्रीयवन आणि पर्यावरण मंत्रालयाने याबाबतचा प्रस्ताव ‘दि युनायटेड नेशन्स एज्युकेशनल ॲन्ड कल्चरल ऑर्गनायझेशन’ला (युनेस्को) पाठविला होता. त्या पार्श्वभूमीवर युनेस्कोच्या द्विसदस्यीय तज्ज्ञ पथकाने पश्चिम घाटातील जवळपास ३५ स्थळांना भेट दिली. याचाच एक भाग म्हणून सातारा जिल्ह्यातील पुष्प पठार म्हणून नावलौकिक मिळालेले कास पठार, कोयना वन्य जीव अभयारण्य, चांदोली राष्ट्रीय उद्यान या स्थळांची डॉ.स्ट्राहम व डॉ. फर्ज या युनेस्कोच्या सदस्यांनी ऑक्टोबर २०१० मध्ये पाहणी केली. युनेस्कोच्या मंजुरीमुळे (२०१२) सातारा जिल्ह्यातील कोयना अभयारण्य, कासपठार, चांदोली राष्ट्रीय उद्यान या परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण औषधी व दुर्मी ळ वनस्पती, जंगली व सरपटणारे प्राणी, कीटक आदींचे अधिक शास्त्रीय पद्घतीने संरक्षण-संवर्धन करणे शक्य होणार आहे. नैसर्गिक वारसा जपण्याबरोबरच जागतिक पर्यटकांचे लक्ष वेधल्याने निसर्गपूरक पर्यटनास चालना मिळू शकेल.
महत्त्वाची स्थळे : सातारा जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक, धार्मिक व पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची स्थळे आहेत. ⇨सातारा शहर हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाच्या या शहरालगत शिलाहार वंशातील राजा दुसरा भोज याने इ. स. ११९० मध्ये बांधलेला ‘अजिंक्यतारा’ हा किल्ला आहे. १६७३ मध्ये शिवरायांनी या किल्ल्यावर कबजा मिळविला. शिवपुत्र छत्रपती राजाराम यांच्या कारकीर्दीत साताऱ्यास मराठेशाहीच्या राजधानीचे स्थान लाभले. येथील छत्रपती वस्तुसंग्र हालय, चार भिंती, हुतात्मा स्मारक, नटराज मंदिर इ. उल्लेखनीय आहेत. सातारा शहरापासून एक किमी. अंतरावर जुन्या सातारा–कोल्हापूर रस्त्यावर कुरणेश्वर (खिंडीतील गणपती) हे स्थान आहे. येथील ऐतिहासिक गणेश व शिवमंदिर प्रसिद्घ आहे. शहरापासून पाच किमी. कोरेगाव रस्त्यावर कृष्णा-वेण्णा यांचे संगमस्थान असलेले संगम माहुली हे ठिकाण पेशवाईतील प्रसिद्घ न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांचे जन्म स्थळ म्हणून प्रसिद्घ आहे. सातारा शहरापासून ११ किमी. सातारा–सोलापूर रस्त्यावरील त्रिपुटी येथील संतगोपालनाथ महाराजांचे समाधी मंदिर, सातारा–मेढा रस्त्यावर वेण्णा नदीवरील कण्हेर धरण, धावडशी येथील बह्मेंद्रस्वामींची समाधी व भार्गव राममंदिर, सज्जनगड येथील समर्थ रामदास स्वामींची समाधी इ. प्रसिद्घ ठिकाणे आहेत. याशिवाय अलीकडच्या काळात पर्यटकांचे आकर्षण बनलेले कास पठारावरील कास तलाव हे स्थळ सस.पासून १,०६६ मी. उंचीवर आहे. १८४४ मध्ये येथील तलाव बांधण्यात आला असून सातारा शहराच्या पिण्याच्या पाण्याचा हा प्रमुख स्रोत आहे. सातारा शहरापासून पाच किमी. अंतरावर, कास मार्गावर असलेले यवतेश्वर येथील प्राचीन शिवमंदिर प्रसिद्घ आहे. शहरापासून ३६ किमी.वर असलेला ठोसेघर येथील धबधबा व परिसरातील सृष्टिसौंदर्य पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. येथेच १०० चौ.किमी. विस्ताराचे तसेच सस.पासून ९१४ मी. पेक्षा अधिक उंचीवरील चाळकेवाडी पठार आहे. पवन ऊर्जानिर्मितीच्या दृष्टीने हे आदर्श पठार असल्याने अनेक पवनचक्क्या येथे उभारल्या आहेत.
सातारा–पंढरपूर रस्त्यावर गोंदवले, पुसेगाव, म्हसवड, शिंगणापूर ही धार्मिक ठिकाणे आहेत. माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथे प्रसिद्घ श्रीराम मंदिर आणि बह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची समाधी आहे. पुसेगाव हे सेवागिरी महाराजांचे समाधिस्थळ म्हणून प्रसिद्घ आहे. पुसेगावपासून जवळच येरळा नदीच्या काठावर खातगुण हे ठिकाण आहे. खातगुण येथे दरवर्षी पीर राजेवलीचा मोठा उरूस भरतो. म्हसवड येथे बाराव्या शतकातील प्रसिद्घ सिद्घनाथ मंदिर आहे. याशिवाय येथील घोंगड्यांचा व्यापार व गुरांचा बाजार प्रसिद्घ आहे. माण तालुक्यातील शिखर-शिंगणापूर येथे प्राचीन शिवमंदिर असून हे एक जागृत देवस्थान मानले जाते. खटाव तालुक्यात औंध हे ऐतिहासिक ठिकाण आहे. पूर्वीच्या औंध संस्थानची ही राजधानी होती. येथील यमाई देवीचे मंदिर आणि वस्तुसंग्र हालय विशेष प्रसिद्घ आहे. वडूज जवळील प्रसिद्घ मायणी पक्षी अभयारण्य हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. पाटण तालुक्यातील चाफळ येथील संगमरवरात बांधलेले श्रीराम मंदिर म्हणजे वास्तुशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आहे. याच तालुक्यातील कोयना धरण परिसर हे पर्यटकांचे आकर्षण आहे. कराड हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून येथील कृष्णामाईचे मंदिर, जुन्याकाळचे दोन उंच मनोरे, मशीद तसेच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा समाधी परिसर ही महत्त्वाची स्थळे आहेत. कराडपासून जवळच असलेल्या आगाशिव डोंगरात बौद्घकालीन लेणी आहेत. पुणे– बंगलोर महामार्गावरील काशीळपासून पश्चिमेस ५.६ किमी.अंतरावर पाल हे खंडोबाचे जागृत देवस्थान आहे. खंडोबा हे महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. फलटण येथील श्रीराम मंदिर तसेच यादवकालीन मंदिरांचे अवशेष व महानुभाव पंथीयांची मंदिरे प्रसिद्घ आहेत. सातारा शहराच्या ईशान्येस २१ किमी. सातारा-फलटण मार्गावरील देऊर येथील अकराव्या शतकातील विठ्ठल-रुक्मिणीचे हेमाडपंती मंदिर उल्लेखनीय आहे.
वाई हे तालुक्याचे मुख्य ठिकाण व कृष्णा नदीच्या काठावर वसलेले शहर दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. नदीच्या दोन्ही काठांवर अनेक मंदिरे व सुंदर घाट आहेत. येथील गणेश (महागणपती) मंदिर विशेष प्रसिद्घ आहे. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे संपादकीय कार्यालय व केवलानंदांचे स्मारक येथे आहे. वाईच्या जवळच असलेल्या मेणवली येथील नाना फडणीसांचा वाडा, भोगाव येथील वामनपंडितांची समाधी, तर धोम येथील नृसिंह आणि शिवमंदिर तसेच कृष्णा नदीवरील धोम धरण इ. ठिकाणे प्रसिद्घ आहेत. वाईपासून उत्तरेस २२ किमी., सस. पासून १,३७५ मी. उंचीवरील मांढरदेव येथील काळूबाईचे मंदिर प्रसिद्घ आहे. येथे दरवर्षी भरणाऱ्या या जत्रेला भाविकांची प्रचंड गर्दी होते. महाबळेश्वर हे प्रसिद्घ थंड हवेचे ठिकाण आहे. येथे अनेक प्रेक्षणीय स्थळे (पॉइंट्स) आहेत. येथे क्षेत्र महाबळेश्वर हे धार्मिक ठिकाण आहे. महाबळेश्वर वरून घाटमार्गे कोकणात पोलादपूरला जाताना कुंभरोशीजवळ प्रतापगड किल्ला आहे. याच गडावर शिवरायांनी अफझलखानाचा वध केला. गडावर भवानीमातेचे मंदिर तसेच अफझलखानाची कबर आहे. वाईपासून १३ किमी.वर पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण असून इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमुळे हे एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र बनले आहे. पाचगणी परिसरातील नैसर्गिक ठिकाणे ही पर्यटकांची विशेष आकर्षणे आहेत.
ठोसेघर धबधबा
सातारा शहरापासून ३६ कि.मी.अंतरावर हा धबधबा आहे.पावसाळ्यामध्ये या धबधब्याला भेट म्हणजे एक सुखद रोमांचकारक अनुभव आहे. विविध भागातून पर्यटक इथे भेट देतात व धबधब्याचा आनंद मनमुराद लुटतात.
चाळकेवाडी-पवन उर्जा प्रकल्प
हे ठिकाण समुद्र सपाटीपासून सुमारे ३००० फुट उंचीवर आणि १०० स्क्वेअर कि.मी. परिसरात विस्तृत असलेले पठार आहे.पवन उर्जा निर्मिती करण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे.जवळपास ५०० हून अधिक उर्जा निर्मिती करणारे टॉवर्स इथे उभारलेले आहेत. अत्यंत प्रेक्षणीय असे हे ठिकाण आहे.
कास तलाव (लेक)
समुद्र सपाटीपासून सुमारे ३५०० फुट उंच असलेल्या कास पठाराची निर्मिती सन १८४४ मध्ये झाली. कास तलाव हा सातारा शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा मुख्य स्त्रोत आहे. कासचे सातारा शहरापासून अंतर २२ कि.मी.आहे. हे तरुण पिढीला आकर्षित करणारे स्थळ असल्याने सहलीसाठी तरुणाईची येथे गर्दी असते.
कराड - प्रीती संगम
कराड शहर हे कृष्णा आणि कोयना नदीच्या संगमावर वसलेले आहे. कृष्णा आणि कोयना नदीच्या संगमावर कृष्णा नदीच्याकाठावर कै. यशवंतराव चव्हाण (भारताचे माजी उप पंतप्रधान) यांची समाधी आहे. येथे कृष्णामाई मंदिर, उंच मिनार इ. प्रसिद्ध ठिकाणे आहेत. कराड शहरालगतच प्राचीन बुद्धकालीन लेण्या असलेला आगाशिवचा डोंगर आहे.
Post a Comment