महाराष्ट्राची नदी प्रणाली
महाराष्ट्र राज्याच्या विशिष्ट प्राकृतिक रचनेमुळे पूर्ववाहिनी व पश्चिमवाहिनी अशा दोन नदीप्रणाल्या स्पष्टपणे दिसतात. कोकणातील नद्या व पठारावरील नद्या अशीही विभागणी करता येते. पश्चिमवाहिनी नद्या अरबी समुद्राला, तर पूर्ववाहिनी नद्या काहीशा पूर्वेस अगर आग्नेयीस वाहत जाऊन महाराष्ट्राच्या बाहेर बंगालच्या उपसागराला मिळतात. बहुतेक नद्या सह्याद्रीच्या रांगेत ५०० ते ७०० मी. उंचीच्या भागात उगम पावत असून सह्याद्री हा राज्यातील प्रमुख जलविभाजक आहे. याशिवाय सह्याद्रीच्या पूर्वेकडील डोंगररांगा व उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांग यांमध्येही काही नद्या उगम पावत असून त्यांना दुय्यम जलविभाजक म्हणता येईल.
पश्चिम वाहिनी नद्यांमध्ये महाराष्ट्रात तापी ही सर्वांत लांब व प्रमुख नदी आहे. पूर्णा नदी ही तापीची प्रमुख उपनदी असून तापी-पूर्णेचे खोरे प्रसिद्ध आहे. हे खोरे महाराष्ट्राच्या उत्तर भागात असून त्याने खानदेशाची भूमी सुपीक केली आहे. गिरणा व पांझरा नदी ह्या तापीच्या इतर उपनद्या आहेत. महाराष्ट्रात तापी नदीची लांबी २०८ किमी. व जलवाहनक्षेत्र सु. ३१,३६० चौ. किमी. आहे. तापी-पूर्णा खोऱ्याचा दक्षिण भाग अधिक सपाट व सुपीक, तर उत्तर भाग वालुकामय व ओबडधोबड आहे
तापी खोऱ्याच्या उत्तरेस नर्मदा नदीचे खोरे असून ती महाराष्ट्राच्या धुळे जिल्हाच्या उत्तर सीमेवरून सु. ५४ किमी. अंतर वाहते. नर्मदेचे फारच कमी जलवाहनक्षेत्र महाराष्ट्रात आहे. तापी व नर्मदा या दोन्ही नद्यांच्या मुखाचा प्रदेश गुजरात राज्यात असून उगम मध्य प्रदेश राज्यात आहे.
कोकणातील पश्चिमवाहिनी नद्या सह्याद्रीत उगम पावून १०० ते १५० किमी. पश्चिमेस प्रवास करून अरबी समुद्राला जाऊन मिळतात. कोकणची किनारपट्टी अरुं द असल्याने येथील बऱ्याच नद्यांची लांबी ८० किमी. पेक्षाही कमी आहे. दमणगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा, उल्हास, कुंडलिका,काळ, सावित्री, वाशिष्ठी, शास्त्री, तेरेखोल इ. कोकणातील नद्या आहेत. वैतरणा व उल्हास नद्या तुलनेने अधिक लांब आहेत. बोरघाटात उगम पावणारी उल्हास नदी (लांबी १३० किमी.) साष्टी बेटाच्या थोड्या उत्तरेस वसईखाडीत अरबी समुद्राला मिळते. कोकणातील नद्यांच्या मुखांशी खाड्यांची निर्मिती झालेली आढळते. काहींच्या मुखांशी वाळूचे दांडे आढळतात. वसई, धरमतर, महाड, चिपळूण, दाभोळ, जयगड, राजापूर,विजयदुर्ग, तेरेखोल या ठिकाणी अशा खाड्या आढळतात. कोकणातील नद्यांना पावसाळ्यात भरपूर पाणी असते, तर उन्हाळ्यात त्या कोरड्या असतात. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या या नद्या विशेष उपयुक्त नाहीत. या नद्यांमुळे सह्याद्रीचा पश्चिम उतार विदीर्ण झाला आहे.
पठारावरील पूर्ववाहिनी नद्यांमध्ये ⇨गोदावरी नदी, ⇨भीमा नदीव ⇨कृष्णा नदीह्या प्रमुख नद्या आहेत. यांना आर्थिक तसेच धार्मिक-सांस्कृतिक दृष्ट्याही विशेष महत्त्व आहे. यांपैकी गोदावरी ही सर्वाधिक लांबीची नदी नासिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते. गोदावरीची महाराष्ट्रातील लांबी ६६८ किमी. व जलवाहनक्षेत्र ७८,५६४ चौ. किमी. आहे. दारणा, प्रवरा, सिंदफणा, पूर्णा, प्राणहिता, ⇨मांजरा नदी, दुधना नदी व इंद्रावती ह्या गोदावरीच्या मुख्य उपनद्या आहेत. तापी व गोदावरी यांची खोरी सातमाळा−अजिंठा डोंगररांगांनी एकमेकींपासून अलग केलेली आहेत.
गोदावरीच्या दक्षिणेस भीमा नदीचे खोरे असून ही दोन खोरी हरिश्चंद्रगड−बालाघाट डोंगररांगांनी एकमेकींपासून विभागली आहेत. पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे भीमेचा उगम होतो. भीमा ही कृष्णेची उपनदी असली, तरी ती महाराष्ट्राच्या हद्दीबाहेर कृष्णेला मिळते, त्यामुळे महाराष्ट्रात या नद्यांची वेगवेगळी खोरी आहेत. कर्नाटक-आंध्र प्रदेश यांच्या सीमेवर भीमा कृष्णेला मिळते. भीमेची महाराष्ट्रातील लांबी ४५१ किमी. व जलवाहनक्षेत्र ४६,१८४ चौ. किमी. आहे. कुकडी, घोड, भामा, पवना, इंद्रायणी, मुळा-मुठा,गुंजवणी, येळवंडी, नीरा नदी, कऱ्हा, सीना, माण ह्या भीमेच्या उपनद्या आहेत.
भीमेच्या दक्षिणेस कृष्णा नदीचे खोरे असून ही दोन्ही खोरी महादेव डोंगररांगांनी एकमेकींपासून वेगळी केली आहेत. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे कृष्णा नदी उगम पावते. महाबळेश्वर येथे उगम पावणाऱ्या वेण्णा, कोयना तसेच वारणा, वेरळा, ⇨पंचगंगा ह्या कृष्णेच्या प्रमुख उपनद्या आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर ती कर्नाटक व आंध्र प्रदेश राज्यांतून पूर्वेकडे वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते. कृष्णेची राज्यातील लांबी २८२ किमी. व जलवाहनक्षेत्र २४,६८२ चौ. किमी. आहे.
महाराष्ट्राच्या पूर्व भागातील−विदर्भातील−नद्या दक्षिणवाहिनी असून त्यांची एक स्वतंत्र नदीप्रणाली असलेली दिसते. ⇨वर्धा नदी व ⇨वैनगंगा नदी ह्या विदर्भातील प्रमुख दक्षिणवाहिनी नद्या आहेत. या दोन्ही नद्यांचा उगम महाराष्ट्राच्या बाहेर उत्तरेस मध्ये प्रदेश राज्यात आहे. वर्धा-वैनगंगा यांच्या संयुक्त प्रवाहास प्राणहिता असे संबोधले जाते. ⇨वैनगंगा ही वर्धा नदीची पश्चिमेकडून येऊन मिळणारी प्रमुख उपनदी आहे. उंचसखल भूभागातून वहाणाऱ्या वर्धा नदीची महाराष्ट्रातील लांबी ४५५ किमी. व जलवाहनक्षेत्र ४६,१८२ चौ. किमी. आहे; तर वैनगंगा नदीची महाराष्ट्रातील लांबी २९५ किमी. व जलवाहनक्षेत्र ३७,९८८ चौ. किमी. आहे.
कोकण व पठारावरील नद्यांमध्ये भूरचनेच्या फरकामुळे काही वैशिष्ट्ये आढळतात. कोकणातील नद्या लांबीने कमी, शीघ्रवाही, अरूं द व खोल दऱ्यांतून वाहणाऱ्या, उथळ मुख्यप्रदेश असलेल्या; तर पठारावरील नद्या त्यांच्या तुलनेने लांबीने अधिक, कमी वेगवान, रुंद व उथळ दऱ्यांतून वाहणाऱ्या आहेत. कोकणातील नद्यांचे बरेचसे पाणी वाया जाते; तर पठारावरील नद्यांच्या पाण्याच्या बराचसा उपयोग जलसिंचन व जलविद्युत निर्मितीसाठी करून घेतला जात आहे. मात्र दोन्ही प्रदेशातील नद्यांना नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या काळात भरपूर पाणी असते.
महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यांत लहानमोठे नैसर्गिक वा कृत्रिम तलाव आढळतात. विशेषतः विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली , भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत तलावांची संख्या खूपच आहे. एकट्या गोंदिया जिल्ह्यात भरपूर तलाव आहेत. प्रमुख तलाव – ताडोबा, घोडझरी, असोलामेंढा (चंद्रपुर), नवेगांव, बोदलकसा, चोरखमारा (गोंदिया),रामसागर (नागपूर), लोणार (बुलढाणा), अंबाझरी (नागपूर), आंध्रलेक (पुणे), धामापूर (रत्नागिरी),कळवण (पुणे), लेक बिले (अहमदनगर), व्हिक्टोरीया लेक (पुणे), सेवनी (भंडारा) त्यामुळे विदर्भातील या भागाला तलावांचा प्रदेश असे म्हणतात. मुंबईस पाणीपुरवठा करणारे तलाव – भातसा, ताणसा, वैतरणा, पवई विहार (मुंबई)हे आहेत .सह्याद्रीच्या उतारावर अनेक लहानमोठे गरम पाण्याचे झरे आहेत. महाराष्ट्रात नदी खोरे उतरता क्रम पुढीलप्रमाणे आहे : १) गोदावरी २) भीमा ३) तापी ४) कृष्णा ५) तापी या सर्वांची सविस्तर माहिती पुढे दिली आहे .
गोदावरी नदी खोरे :
दक्षिण भारतातील पवित्र आणि महत्त्वाची नदी. लांबी १,४९८ किमी. जलवाहन क्षेत्र गंगेच्या खालोखाल ३,२३,८०० चौ. किमी. हिचा उगम नासिक जिल्ह्यातील त्र्यंबक गावामागे सह्याद्रीतील ब्रह्मगिरी डोंगरावर होतो. प्राचीन काळी या भागात गौतम ऋषींचा आश्रम होता. त्याने गोहत्येच्या पातकाच्या निवारणार्थ शंकराची आराधना करून गंगा आणली, अशी कथा आहे. हल्ली येथे लहानशा कुंडात थोडेसे पाणी असते. नंतर डोंगराच्या पूर्व कुशीत गंगाद्वार येथे लहानशा झऱ्यातून ते बाहेर येते. तेथपर्यंत ६९० पायऱ्या चढून जाता येते. तेथे कुंड व गंगेचे लहानसे देऊळ आहे. पायथ्याशी त्र्यंबकेश्वर क्षेत्र आहे. गोदावरी म्हणजे पाणी किंवा गाई देणारी ( गाईचे पोषण करणारी ) असा अर्थ आहे. तेथून गोदावरी पूर्वआग्नेय दिशेने नासिक व अहमदनगर जिल्ह्यांतून वाहत जाते. पुढे ती अहमदनगर व औरंगाबाद आणि बीड व औरंगाबाद जिल्ह्यांची सीमा बनते. नंतर परभणी आणि नांदेड जिल्ह्यांतून गेल्यावर ती तेलंगाना राज्याच्या आदिलाबाद व निजामाबाद जिल्ह्यांच्या, आदिलाबाद व करीमनगर जिल्ह्यांच्या, महाराष्ट्राच्या चंद्रपूर व आंध्रच्या करीमनगर जिल्ह्यांच्या सीमांवरून जाऊन आग्नेयीकडे वळते. मग तेलंगानाच्या वरंगळ व खम्मम जिल्ह्यांतून जाऊन ती अधिक दक्षिणेकडे वळते व पूर्व आणि पश्चिम गोदावरी जिल्हे विभक्त करून शेवटी बंगालच्या उपसागरास मिळते. महाराष्ट्रात ती ६५० किमी. वाहते.
सह्याद्रीपासून नासिकपर्यंत गोदावरी अरुंद, खडकाळ मार्गाने येते. त्या वाटेवर गंगापूर येथे तिला धरण व छोटासा धबधबा आहे. नासिकनंतर २४ किमी.वर तिला उजवीकडून दारणा व आणखी २७ किमी.वर डावीकडून नांदूर येथे काडवा नदी मिळते. तेथे मदमेश्वर धरण आहे. नंतर नेवासे येथे उजवीकडून प्रवरा मिळते. पैठणवरून पुढे गेल्यावर बीड जिल्ह्यातील मंजरथ येथे उजवीकडून सिंदफणा मिळते. पूर्णा स्थानकाच्या दक्षिणेकडे परभणीकडून आलेली पूर्णा नदी डावीकडून तसेच नांदेडवरून गेल्यावर कोंडलवाडीजवळ तिला मांजरा उजवीकडून मिळते. पुढे चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेजवळ सिरोंचाच्याखाली तिला डावीकडून पैनगंगा, वर्धा व वैनगंगा यांचे पाणी आणणारी प्राणहिता व चंद्रपूर सरहद्द सोडताना मध्य प्रदेशाच्या बस्तर जिल्ह्यातून आलेली इंद्रावती भद्राचलम्च्या समोर मिळते. नंतर धर्मसागर येथे उजवीकडून मानेर, खम्मम जिल्ह्याच्या उत्तर भागातून उजवीकडून किन्नरसानी व डावीकडून शबरी मिळते. विदर्भाच्या सीमेजवळ गोदावरीचे पात्र २ ते ३ किमी. रुंद आणि वालुकामय असून त्यात दोन ठिकाणी प्रत्येकी २४ किमी. लांबीचे खडक आहेत. ते फोडून वर्धा-नागपूरच्या कापूस प्रदेशाला गोदावरीचा जलमार्ग उपलब्ध करून देण्याची १८५४ मधील योजना बराच खर्च झाल्यानंतर १८७१ मध्ये अव्यवहार्य म्हणून सोडून द्यावी लागली. काही अंतर संथ वाहिल्यानंतर गोदावरी पूर्व घाटातून पापिकोंडालू या अरुंद व खोल घळईतून मार्ग काढते. तेथे तिच्या काठावर उभे कडे १,२८० मी.पर्यंत उंच गेलेले आहेत. भोवतीचा प्रदेश साग, बांबू इत्यादींच्या दाट अरण्याचा व नयनरम्य वनश्रीचा आहे. यानंतर नदी पुन्हा रुंद होते. तिच्या पात्रात गाळाने बनलेली लहानलहान बेटे दिसू लागतात. त्यांस लंका म्हणतात. त्यांवर उत्कृष्ट तंबाखू पिकतो. राजमहेंद्री येथे गोदावरीवर २·५ किमी. लांबीचा मोठा रेल्वेपूल आहे. जवळच धवलेश्वरम् येथे या नदीवर १८५७ मध्ये बंधारा घातला आहे. त्याला अॅनिकट म्हणतात. तेथूनच गोदावरीचा त्रिभुज प्रदेश सुरू होतो. त्यात पूर्वेस गौतमी गोदावरी आणि पश्चिमेस वसिष्ठ गोदावरी असे दोन मुख्य प्रवाह असून वैनतेय हा आणखी एक प्रवाह आहे. हे अनुक्रमे यनम्, राझोले आणि नरसपूर यांच्याजवळ समुद्रास मिळतात.
त्रिभुज प्रदेशाचा पूर्वेकडील भाग १,१६५ चौ. किमी., मधला १,०३६ चौ. किमी. व पश्चिमेकडील २,५८९ चौ. किमी. आहे. त्रिभुज प्रदेशाच्या किनाऱ्यावर पूर्वी डच, इंग्रज व फ्रेंच यांच्या सुरुवातीच्या छोट्या वसाहती होत्या. त्यांपैकी यनम् हा टिकून राहिलेला फ्रेंच भाग पाँडिचेरीबरोबरच भारतात आला. त्रिभुज प्रदेशात सर्वत्र कालव्यांचे जाळे पसरलेले आहे. मुख्य कालवे ७९३ किमी. लांबीचे असून त्यांतून नदीप्रमाणेच नौकांतून रहदारी चालते. वितरण शाखा ३,०८६ किमी. लांबीच्या आहेत.
गोदावरीचे कालवे एलुरूजवळ कृष्णा कालव्यास जोडले असल्यामुळे रहदारी दक्षिणेकडे वाढली आहे. पुरातन काळापासून आलेल्या गाळामुळे आणि भरपूर पाणीपुरवठ्यामुळे गोदावरीचा त्रिभुज प्रदेश अत्यंत सुपीक झाला असून त्यात तांदूळ, डाळी, कडधान्ये, तेलबिया, भुईमूग, तंबाखू, ऊस, नारळ, केळी, आंबे इत्यादींचे मोठे उत्पन्न येते. फुलबागाही पुष्कळ आहेत. अमलापूर व काकिनाडा ही सागरी मत्स्यकेंद्रे असून बलभद्रपुरम् येथे अंतर्गत मत्स्यकेंद्र आहे. महाराष्ट्रातील गोदावरी खोरेही सुपीक असून त्यात तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, कडधान्ये, कापूस, केळी, द्राक्षे, मिरची, ऊस, मोसंबी, पेरू, अंजीर, डाळिंबे इ. उत्पन्ने होतात. सुती व लोकरी कापड विणण्याचे व साखरेचे अनेक कारखाने गोदाखोऱ्यात असून हरतऱ्हेचे नवीन कारखाने निघत आहेत. आरोग्यदृष्ट्याही गोदावरीचे पाणी उपकारक आहे. गोदावरीवर व तिच्या उपनद्यांवर गंगापूर, दारणा, भंडारदरा, भोजापूर, नांदेड, मुळा, जायकवाडी, येलदरी, सिद्धेश्वर, मानार, पोचंपाड, इंचंपल्ली इ. अनेक प्रकल्प झाले आहेत व होत आहेत. गोदावरी महाराष्ट्र व तेलंगाना (आंध्रप्रदेश ) या दोन्ही राज्यांना महत्त्वाची असल्यामुळे तिच्या पाण्याच्या उपयोगाबद्दल वाद उत्पन्न झाला; तो १९६८ मध्ये लवादाकडे सोपविण्यात आला. तो ऑक्टोबर १९७५ मध्ये मिटला असून केंद्र सरकारकडे संमतीसाठी पाठविला आहे.
गोदावरी माहात्म्य श्रीरामचंद्रांनी गौतम ऋषीला सांगितले अशी कथा आहे. रामचंद्रांनी स्वतः गोदातीरी निवास केल्यामुळे तिचे पावित्र्य अधिकच वाढले. तिचे गौतमीमुख विशेष पवित्र मानतात. तिला वृद्धगंगा म्हणतात; कारण गंगेचा व गोदेचा उगम एकच असून गोदावरी भूगर्भातून दक्षिणेत आली अशी कथा आहे. गोदावरीच्या काठी त्र्यंबकेश्वर, नासिक, नेवासे, पैठण, भद्राचलम्, राजमहेंद्री व कोटिपल्ली ही प्रमुख तीर्थक्षेत्रे असून नासिक व राजमहेंद्री येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थात स्नानसोहळा असतो. अनेक प्रसिद्ध देवस्थाने, संतांची निवासस्थाने यांमुळे महाराष्ट्रातील गोदातटाकीचा, विशेषतः मराठवाड्याचा, प्रदेश संतभूमी म्हणून ओळखला जातो.
| उपनदी | उगम | गोदावरी बरोबर संगम |
| दारणा | कळसूबाई शिखराजवळ (इगतपूरी) | दारणा सांगवी |
| प्रवरा | भांदारद-याच्या ईशान्येस | नेवाशाजवळ टोके |
| मुळा | भंडारद-याच्या दक्षिणेला | नेवाशाजवळ टोके |
| सिंदफणा | बालाघाट डोंगर (बीड) माजलगाव | |
| मांजरा | पाटोडा पठार (बालाघाट) बीड | कुंडलवाडी (नांदेड) ७२४ कि.मी. |
| कादवा | तौला डोंगर (नाशिक)१२३१ | नांदूरमधमेश्वर |
| शिवना | सुरपालनाथ (सातमाळा) औरंगाबाद | गंगापूरच्या अग्नेयेस |
| दुधना | चौक्याचा डोंगर (औरंगाबाद) | संगम प्ररभणी जिल्हा |
| पूर्णा | शिरसाळा (अजिंठा डोंगर) | संगम प्ररभणी जिल्हा |
गोदावरी नदीच्या प्रमुख उपनद्या
| नदी | लांबी(किमी) | उगम | मिळते |
| वर्धा | ४५५ | बैतुल (सातपूडा / मध्यप्रदेश) | वैनगंगेस |
| पेनगंगा | ७७६ | अजिंठा टेकड्या | बल्लापूर (यवतमाळ) येथे वर्धेस येऊन मिळते. |
| वैनगंगा | ४६२ | भाकल-दरकेसा टेकड्या मैकल (मध्यप्रदेश), उपनद्या – कन्हान, पेंच, बाग | आष्टी जवळ वर्धा व वैनगंगा संगम होतो. |
| | | | |
| इंद्रावती | ५३१ | कलहंडी (मध्यप्रदेश) | छत्तीसगढ – महाराष्ट्र सीमेवरून वाहते. भद्राचंल येथे गोदावरीस मिळते. |
गोदावरी –पूर्णा खोरे : गोदावरी नदीची एक उपनदी. ही नदी आग्ने,य व दक्षिण दिशांनी औरंगाबाद , बुलढाणा व परभणी या जिल्ह्यांतून वाहते. लांबी सु. २७३.५३ किमी. असून त्यांपैकी ८८.५ किमी. औरंगाबाद जिल्ह्यातून, १४४.८१ किमी. परभणी जिल्ह्यातून, तर बाकीचा प्रवाह बुलढाणा जिल्ह्यातून वाहतो. पूर्णा नदी औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात अजिंठा टेकड्यांमध्ये मेहूण गावाजवळ उगम पावते. पुढे आग्नेययीकडे बुलढाणा जिल्ह्यातून वाहत जाऊन परभणी जिल्ह्यात प्रवेश करते. म्हणजेच उगमापासून स्थूलमानाने ती आग्ने यीकडे वाहते; परंतु शेवटी सु. ७२.४ किमी. दक्षिणवाहिनी होते व गोदावरी नदीस मिळते. तिला औरंगाबाद जिल्ह्यात चरणा, खेळणा, जुई, अनजान, गिरजा आणि परभणी जिल्ह्यात दुधना, काप्रा या नद्या मिळतात. हिच्या खोऱ्यात ज्वारी, बाजरी, गहू, कापूस इ. पिके होतात. परभणी जिल्ह्यातील जिंतूर व हिंगोली या तालुक्यांतील अनुक्रमे येलदरी व सिद्धेश्वर येथे हिच्यावर धरणे बांधली असून त्यांच्यापासून जलसिंचन व विद्युत्निर्मिती केली जाते. सिल्लोड, भोकरदन, जाफराबाद, जिंतूर, येलदरी, सिद्धेश्वर, हिंगोली, पूर्णा, परभणी ही हिच्या खोऱ्यातील महत्त्वाची शहरे होत. नदीकिनारी असलेली मंदिरे उल्लेखनीय आहेत.
मांजरा नदी : महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांतून वाहणारी गोदावरी नदीची एक प्रमुख उपनदी. वांजरा या नावानेही ती ओळखली जाते. सुमारे ६१६ किमी. लांबीची ही नदी महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यात, बालाघाट डोंगररांगेत उगम पावते. सुरुवातीच्या भागात ही पूर्ववाहिनी असून बीड-उस्मानाबाद तसेच बीड-लातूर या जिल्ह्यांची सरहद्द बनली आहे. कासारखेडजवळ ही नदी लातूर जिल्ह्यात प्रवेश करते व जिल्ह्याच्या माध्यातून आग्नेयीस वाहत जाऊन निलंगा गावाजवळ कर्नाटक राज्यात व पुढे बीदरच्या पूर्वेस आंध्र प्रदेश राज्यात जाते. आंध्र प्रदेशातील संगरेड्डीपेटजवळ मांजरा नदी एकदम वळण घेऊन वायव्य दिशेने वाहू लागते. निझामाबाद जिल्ह्यात या नदीवर धरण बांधण्यात आले असून (१९३१) प्रसिद्ध ⇨ निझामसागर तलाव तयार करण्यात आला आहे. पुढे ही नदी पुन्हा महाराष्ट्र राज्याच्या सरहद्दीपर्यंत येऊन नांदेड जिल्ह्यातील शेळगावपासून ईशान्येस, राज्याच्या सरहद्दीवरून वाहत जाते व याच जिल्ह्यातील कुंडलवाडी गावाजवळ गोदावरी नदीस उजवीकडे मिळते. तेरणा, कारंजा, तावरजा, लेंडी व मन्याड या मांजरा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. या नदीस तेरणा नदी लातूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर निलंग्याच्या पूर्वेस, तर कारंजा नदी आंध्र प्रदेश राज्यात मिळते, लेंडी व मन्याड या नद्या नांदेड जिल्ह्याच्या सरहद्दीवर या नदीला डावीकडून मिळतात.मांजरा नदीचा उपयोग प्रामुख्याने जलसिंचनासाठी केला जातो. नदीखोरे सुपीक असल्याने येथील लोकांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. या नदीच्या वरच्या खोऱ्यात मुख्यत्वे कापसाचे पीक घेतले जाते, तर खालच्या खोऱ्यात ज्वारी, कडधान्ये, तेलबिया यांचे उत्पादन होते. बहुतेक ठिकाणी नदीकाठ मंद उताराचे असल्याने या नदीचा फेरी वाहतुकीसाठीही थोड्याफार प्रमाणात उपयोग होतो.
पैनगंगा : महाराष्ट्रातील वर्धा नदीची उपनदी. लांबी ६७६ किमी. सर्व उपनद्यांसह एकूण जलवाहनक्षेत्र २३,८९८ चौ. किमी. ही बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात, पश्चिम सरहद्दीलगत अजिंठा डोंगररांगेत उगम पावते. उगमानंतर ती आग्नेयीकडे बुलढाणा व अकोला या जिल्ह्यांच्या दक्षिण भागातून वाहते. पुढे ती परभणी-यवतमाळ व यवतमाळ-नांदेड या जिल्ह्यांच्या सरहद्दींवरून वाहत जाऊन यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील जूगादजवळ वर्धा नदीस मिळते. हा संयुक्त प्रवाह वर्धा नदी म्हणून ओळखला जातो. कयाधू, अरुणावती, अडाण, वाघाडी, पूस इ. पैनगंगेच्या महत्त्वाच्या उपनद्या आहेत. जलसिंचनाच्या दृष्टीने या नदीस महत्त्व असून, अपर पैनगंगा प्रकल्पानुसार या नदीवर यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद तालुक्यात इसापूरजवळ धरण बांधले जात आहे. त्यापासून शेतीस पाणीपुरवठा केला जाईल. देऊळघाट, वणी, पुसद,पांढरकवडा, चिखली, मेहेकर ही पैनगंगा नदीखोऱ्यातील महत्त्वाची शहरे आहेत.
वर्धा नदी : महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ प्रदेशातून वाहणारी एक मुख्य नदी. लांबी ४६४ किमी. मध्य प्रदेश राज्याच्या बेतूल जिल्ह्यात सातपुडा पर्वतातील मुलताई पठारावर ही नदी उगम पावते. मध्यप्रदेश राज्यातून वाहत येऊन महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर ती नागपूर-अमरावती, अमरावती-वर्धा, यवतमाळ-वर्धा, चंद्रपूर-यवतमाळ या जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून साधारणपणे दक्षिणेस, पश्चिमेस नंतर पुन्हा दक्षिणेस व आग्नेयीस वाहत जाते. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस शहराजवळ वर्धा नदीला उजवीकडून पैनगंगा नदी मिळते. संगमानंतर वर्धा नदी चंद्रपूर जिल्ह्यातून प्रथम पूर्वेस, पुढे आग्नेयीस व नंतर महाराष्ट्र-आंध्र प्रदेश राज्यांच्या सीमेवरून पूर्वेस वाहू लागते. त्यानंतर चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून दक्षिणेकडे वाहत आलेल्या वैनगंगा नदीला सेवनीजवळ ती मिळते. वर्धा-वैनगंगा यांचा संगमानंतरचा प्रवाह प्राणहिता या नावाने महाराष्ट्र राज्य (गडचिरोली जिल्हा) व आंध्र प्रदेश राज्य यांच्या सरहद्दीवरून दक्षिणेस वाहत जाऊन गोदावरीला मिळतो. एराई, वेणा, पोथरा, वेंबळा, निर्गुडा, जाम, कार या वर्धा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. वर्धा व तिच्या उपनद्यांना पावसाळ्यात भरपूर पाणी असते, मात्र उन्हाळ्यात त्या कोरड्या पडून अनेक ठिकाणी डबकी तयार होतात.
वर्धा नदीचा प्रवाह-मार्ग खचदरीतून आहे असे मानले जाते (उगमापासून ते पैनगंगा नदीला मिळेपर्यंत वर्धा नदीचे पात्र खोल व खडकाळ आहे). वर्धा नदीचे खोरे सुपीक आहे. भूवैज्ञानिक दृष्ट्या वायव्येकडील भाग दख्खन ट्रॅपचा, तर दक्षिण, आग्नेय भाग निम्न, उच्च गोंडवन प्रदेशाचा आहे. वर्धेच्या सखल मैदानी प्रदेशात काळी, सुपीक रेगूर मृदा आहे; तसेच हा स्तरित खडकांचा भाग असल्याने येथे दगडी कोळशाचे साठे विपुल प्रमाणात सापडतात. शेती हा वर्धा खोऱ्यातील प्रमुख व्यवसाय असून भात, ज्वारी, गहू, कापूस इ. पिके होतात. वर्धा नदीच्या तीरावर अनेक ठिकाणी मंदिरे, स्मारके आणि मराठा-पेंढारी काळातील किल्ल्यांचे अवशेष पहावयास मिळतात.
वैनगंगा नदी :
वैनगंगा नदी ही महाराष्ट्रातील विदर्भातील एक महत्त्वाची नदी आहे. या नदीचा उगम मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यात समुद्र सपाटीपासून ६४० मीटर उंचीवर झाला आहे. तिथून ती बालाघाट जिल्ह्यातला सुमारे ९८ किलोमीटर प्रवास करून विदर्भातल्या चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश करते. विदर्भात ती गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, भंडारा आणि वर्धा इतक्या जिल्ह्यांमधून वाहते.अंधारी, कथणी, कन्हान, गाढवी, गायमुख, खोब्रागडी, चुलबंद, चोरखमारा, पोटफोडी, फुअर, बोदलकसा, वाघ, वाघनथरी, सुर या वैनगंगेच्या उपनद्या आहेत.मध्य प्रदेशात वैनगंगेच्या खोर्यात दाट अरण्ये व काही ठिकाणी सुपीक गाळाचे प्रदेश आहेत, अरुंद दर्या आहेत. पात्रात अनेक ठिकाणी काठावर सुमारे ६० मीटर उंचीच्या ग्रॅनाईट खडकाच्या उंच भिंती आढळतात. काही ठिकाणी नदीने पूर मैदानांचीही निर्मिती केली आहे. वैनगंगेचे खोरे तांदूळ उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.वैनगंगा नदी'ला वर्धा नदी मिळाल्यावर तिचे नाव प्राणहिता होते. ही प्राणहिता त्यानंतर, महाराष्ट्रातून आंध्र प्रदेशात गेलेल्या गोदावरी नदीला मिळते.
प्राणहिता नदी:
वर्धा-वैनगंगा या दोन नद्यांचा संयुक्त प्रवाह पुढे प्राणहिता नावाने ओळखला जातो. प्राणहिता नदी महाराष्ट्र (गडचिरोली जिल्हा) व तेलंगाना राज्यांच्या सरहद्दीवरून ११३ किमी. अंतर वाहत गेल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील सिंरोंचा गावाजवळ सस. पासून १०७ मी. उंचीवर पश्चिमेकडून वाहत येणाऱ्या गोदावरी नदीला मिळते.
इंद्रावती : मध्यभारतांतर्गत नदी. लांबी सु. ५२६ किमी. ओरिसाच्या कालाहंडी जिल्ह्यात भवानी-पटना शहरापासून सु. ४० किमी. नैर्ऋत्येस पूर्व घाटात ही उगम पावते. तेथून ती पश्चिमेकडे वाहत ओरिसाच्या कोरापुट जिल्ह्यातून मध्य प्रदेशाच्या बस्तर जिल्ह्यात जगदलपूरजवळ प्रवेश करते. सागवान, तेंदू, हिरडा इत्यादींची निबिड अरण्ये, खोल दऱ्या, आदिवासी गोंडांची वस्ती असलेल्या प्रदेश यांमधून वाहताना अनेक ठिकाणी ती निसर्गरम्य बनलेली आहे. तिच्यावरील चित्रकूटजवळ बनलेला २९ मी. उंचीचा धबधबा प्रेक्षणीय आहे. महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्याच्या आग्नेय सरहद्दीवरून वाहत जाऊन ती पुढे गोदावरीस मिळते.
भीमा नदी खोरे :
कृष्णा नदीची एक प्रमुख उपनदी. लांबी सु. ८६७ किमी., जलवाहनक्षेत्र सु. ७०,६१३ चौ. किमी. 'भीमरथा', 'भीमरथी' ही तिची इतर नावे असून सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर येथे तिचे पात्र चंद्रकोरीप्रमाणे दिसते. त्यामुळे तेथे ती चंद्रभागा म्हणून ओळखली जाते. स्थूलमानाने आग्नेयवाहिनी असलेली ही नदी पुणे, अहमदनगर, सोलापूर या महाराष्ट्र राज्याच्या जिल्ह्यांतून व विजापूर, गुलबर्गा या कर्नाटक राज्याच्या जिल्ह्यांतून वाहत जाऊन कृष्णा नदीस मिळते.
भीमा नदी सह्याद्रीच्या रांगेत सस.पासून ९७५ मी. उंचीवर भीमाशंकरजवळ (जिल्हा पुणे) उगम पावते. उगमानंतर पुणे जिल्ह्यातून, पुणे-अहमदनगर व पुणे-सोलापूर जिल्ह्यांच्या सरहद्दींवरून व पुढे सोलापूर जिल्ह्यातून वाहत कर्नाटक राज्याच्या विजापूर जिल्ह्याच्या सरहद्दीपर्यंत येते. नंतर विजापूर व गुलबर्गा जिल्ह्यांच्या सरहद्दींवरून गुलबर्गा जिल्ह्यातून ती वाहत आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यांच्या सीमेवर रायचूरच्या उत्तरेस २५ किमी.वर कुरूगड्डी येथे कृष्णा नदीस मिळते. उगमानंतर प्रारंभीचे सु. ६० किमी. अंतर नदीचा प्रवाह अरुंद व खोल अशा दरीतून वाहतो. परंतु पुढे मात्र तिचे पात्र रुंद होत गेलेले आहे. भामा, इंद्रायणी, वेळ, मुळा-मुठा, घोड, नीरा, माण, सीना इ. तिच्या प्रमुख उपनद्या होत.
जलसिंचनाच्या दृष्टीने या नदीस महत्त्व आहे. भीमा प्रकल्पान्वये या नदीस सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यात उजनी येथे २,४६७ मी. लांब व ५६.४ मी. उंचीचे धरण बांधले जात आहे. यापासून १.६४ लाख हे. जमिनीस पाणीपुरवठा उपलब्ध होईल. जलसिंचनाच्या सोयीमुळे भीमा नदीखोऱ्यात शेतीचा विकास घडून येत आहे.
धार्मिक दृष्ट्याही भीमा नदीस महत्त्व असून तिला महानदी (मोठी नदी) असेही संबोधले जाते. मत्स्य, ब्रह्म, वामन इ. पुराणांतून व महाभारतातून या नदीचे निर्देश येतात. त्रिपुरासुराचा वध करून शंकर श्रमपरिहारार्थ भीमाशंकरजवळ आले असता तेथे अयोध्येचा भीमक नावाचा राजा तप करीत होता. तो शंकरास सामोरा गेला. त्यावेळी शंकराने प्रसन्न होऊन भीमकास वर मागण्यास सांगितले. त्यावेळी त्याने 'शंकराला आलेल्या घामाच्या धारांची पुण्यपावन नदी होऊ दे', असा वर मागितला व त्याप्रमाणे भीमेचा उगम झाला व भीमक राजाच्या नावावरून या नदीस भीमा हे नाव पडले, अशी आख्यायिका आहे. या नदीच्या उगमस्थानी भीमाशंकर, पुढे नदीकाठी पंढरपूर, ब्रह्मपुरी, गाणगापूर इ. तीर्थक्षेत्रे आहेत.
भीमा नदीच्या प्रमुख उपनद्या
घोडनदी : पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागातून वाहणारी भीमेची आग्नेयवाहिनी उपनदी. आंबेगाव तालुक्यातील आहुपे गावाजवळ हिचा उगम असून दौंडच्या वायव्येस पाच किमी. सांगवीनजिक ती भीमेस मिळते. या नदीची एकूण लांबी अंदाजे १४५ किमी. असून मीना आणि कुकडी या तिच्या प्रमुख उपनद्या आहेत. आंबेगाव, घोडेगाव, वडगाव आणि शिरूर ही तिच्या काठांवरील मुख्य गावे. घोडखोऱ्याचा मध्य व पूर्व भाग कमी पावसाच्या दुष्काळी भागात मोडतो; त्यामुळे शिरूर तालुक्यात या नदीवर मातीचे धरण बांधून शेतीस पाणी नुकतेच उपलब्ध करून दिलेले आहे.
मुळा - मुठा : महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील सु. १२८ किमी. लांबीची भीमा नदीची उपनदी. जिल्ह्याच्या पश्चिम भागात उगम पावणाऱ्या मुळा आणि मुठा या नद्यांच्या संयुक्त प्रवाहाला पुणे शहरापासून मुळा-मुठा अथवा मुळा हे नाव प्रचलित आहे. ही पूर्ववाहिनी नदी दौंडच्या वायव्येस सु. २७ किमी. वर रांजणगाव सांडस येथे भीमा नदीला उजवीकडून मिळते.उत्तरेकडील मुळा नदी बोर घाटाच्या दक्षिणेस सु. १३ ते ३५ किमी. लांबीच्या प्रदेशातून सह्याद्रीच्या रांगेत उगम पावणाऱ्या सु. सात प्रवाहांपासून बनते. पौड गावाच्या पूर्वेस सु. ८ किमी. वरील लवळे गावापर्यत हे सर्व प्रवाह एकत्र येतात. पौड भागात या नदीमुळे निर्माण झालेली दरी ‘पौड खोरे’ या नावाने प्रसिद्ध आहे. लवळे गावापासून अनेक वळणे घेत ही नदी पुणे शहराच्या उत्तरेस कळस येथे दक्षिणवाहिनी बनते व पुणे शहराच्या मध्यभागी तिला दक्षिणेकडून मुठा नदी मिळाल्यांनतर ती पूर्वेस वहात जाते. पवना ही तिला डावीकडून मिळणारी प्रमुख उपनदी आहे. मुळशी तालुक्यात (उगमाकडील भागात) मुळशी गावाजवळ निळा व मुळा या नद्यांच्या संगमावर टाटा पॉवर कंपनीने धरण बांधले असून त्या धरणातील पाणी, ४·८ किमी. लांबीच्या बोगद्याद्वारे ⇨ भिरा (रायगड जिल्हा) येथील विद्युत् केंद्रात नेण्यात आले आहे. त्यामुळे मुळशी पेट्यातील धरणग्रस्तांच्या प्रश्नांसाठी सत्याग्रह करण्यात आला (१९२१–२४). त्याचे नेतृत्व ⇨ सेनापती बापट यांनी केले होते.मुठा नदी जिल्ह्याच्या नैर्ॠत्य भागात सह्याद्रीच्या रांगेत सस. पासून सु. ९१२ मी. उंचीवर उगम पावून ईशान्य दिशेने वाहत जाते. अंबी व मोसी हे तिचे उगमाकडील प्रमुख प्रवाह आहेत. या नदीच्या उगमप्रवाहावर पानशेत येथे धरण बांधले आहे. सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात या नदीने डोंगराच्या तीव्र उतारावर अरुंद दरी निर्माण केली असून हा भाग ‘मुठा खोरे’ म्हणून ओळखला जातो. नदीचा बराचसा भाग धरणांच्या जलाशयांनी व्यापलेला आहे. खडकवासला येथील धरणानंतर ही नदी पर्वती टेकडीच्या बाजूने पुढे जाऊन शहराच्या मध्यभागी मुळा नदीला मिळते. मुठा नदीवरील ⇨ खडकवासला येथील धरणातून कालव्यांद्वारे पुणे शहरास आणि जिल्ह्यातील शेतीस पाणीपुरवठा केला जातो.पुणे शहराच्या पुढे पूर्वेस वाहणारी मुळा-मुठा नदी मांजरी बु. ते थेऊर यांदरम्यान एक मोठे वळण घेते व नागमोडी वळणांनी वहात जाऊन दौंड तालुक्याच्या पूर्व सरहद्दीवर रांजणगाव सांडस येथे भीमा नदीस मिळते. नदीकाठावरील पुणे, मांजरी, थेऊर इ. गावे औद्योगिक, ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाणे म्हणून प्रसिद्ध आहेत.
इंद्रायणी : पुणे जिल्ह्याच्या मध्यभागातून वाहणारी भीमा नदीची एक उपनदी. लोणावळ्याच्या नैर्ऋत्येस सु. ५ किमी. वर सह्याद्रीतील कुरवंडे घाटाजवळ ही उगम पावते व ९३ किमी. पूर्व दिशेकडे वाहत जाऊन हवेली तालुक्यातील तुळापूर या गावानजीक भीमेस मिळते. आंध्र नदी ही तिची प्रमुख उपनदी आहे. इंद्रायणीच्या खोऱ्याचे एकूण क्षेत्रफळ अंदाजे ७१० चौ. किमी. असून घाटमाथ्याजवळ टाटा कंपनीने बांधलेल्या लोणावळे, वळवण, शिरवट व आंध्र या चार तलावांतील पाण्याच्या साहाय्याने तळकोकणात वीजनिर्मिती होते. देहू व आळंदी ही महाराष्ट्राची सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्रे या नदीच्या काठी आहेत. पुणे-मुंबई हमरस्ता व रेल्वे मार्ग खोऱ्याच्या पश्चिम भागातून गेल्यामुळे त्या भागाची चांगली वाढ झालेली आहे.
नीरा नदी : नीरा नदी महाराष्ट्रातील एक नदी आहे. ही पुणे व सोलापूर जिल्ह्यातून वाहते. नीरेला कर्हा ही एक उपनदी असून ती स्वतः भीमेचीउपनदी आहे. वीर धरण नीरेवर बांधण्यात आलेले धरण आहे. या नदीच्या काठावर नीरा नावाचे गाव आहे.
सीना नदी : भीमा नदीची एक उपनदी. लांबी सु. ३७५ किमी. पाणलोट क्षेत्र सु. १२,७४२ चौ. किमी. महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यात अहमदनगर शहराच्या उत्तरेस ही नदी उगम पावते. हिचे तीन शीर्षप्रवाह मानले जातात. त्यांपैकी एक अहमदनगर शहराच्या पश्चिमेस जामगावजवळ, तर दुसरे दोन प्रवाह शहराच्या ईशान्येस जेऊर आणि पिंपळगाव उजनीजवळ उगम पावतात. त्यांचा एकत्रित प्रवाह सीना नदी या नावाने ओळखला जातो. सुरुवातीच्या टप्प्यात अहमदनगर शहरापर्यंत ही नदी दक्षिणवाहिनी आहे. तेथून पुढे ती आग्नेयवाहिनी बनते. या टप्प्यात या नदीमुळे अहमदनगर व बीड या जिल्ह्यांची सु. ५५ किमी. लांबीची नैसर्गिक सरहद्द बनली आहे. पुढे अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी या ऐतिहासिक ठिकाणाजवळ ही नदी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते. या जिल्ह्यातील खांबेवाडी गावापासून पुढे या नदीमुळे सोलापूर-उस्मानाबाद जिल्ह्यांची सरहद्द बनली आहे. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील म्हैसगावपासून हिचा प्रवाह याच जिल्ह्यातून पुढे वाहत जातो. कर्नाटक राज्य आणि सोलापूर जिल्हा यांच्या सरहद्दीवर कुडल गावाजवळ ही नदी भीमा नदीस मिळते. सीना नदीचे पात्र उथळ असून उन्हाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ते कोरडे पडते.मेहेक्री ही सीना नदीची प्रमुख उपनदी असून ती बीड जिल्ह्यामध्ये सांगवीजवळ सीना नदीला डावीकडून मिळते. याशिवाय तलवार, इंचाना, कामुही, भेंडी, नल्की, चांदली इ. तिच्या उपनद्या आहेत. सीना-निमगाव व सीना-कोळेगाव हे या नदीवरील प्रकल्प असून, सीना-कोळेगाव योजनेमुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील सु. ९,३०० हे. क्षेत्र ओलिताखाली आले आहे. चोंडी ( अहमदनगर जिल्हा ), मोहोळ, वडवळ, कुडल (सोलापूर जिल्हा) इ. या नदीवरील महत्त्वाची ठिकाणे आहेत.
माण नदी : महाराष्ट्र राज्यातील भीमा नदीची उजव्या तीरावरील प्रमुख उपनदी. आंधळी धरणाच्या योजनेमुळे हिला महत्त्व प्राप्त झाले असून नदीची लांबी सु. १६० किमी., पैकी सोलापूर जिल्ह्यातील लांबी सु. ८० किमी. आहे. सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यात, फलटणजवळच्या डोंगरात हिचा उगम होतो. सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातून आग्नेय दिशेस वाहत जाऊन पुढे ती सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यात प्रवेश करते. सांगली जिल्हाच्या उत्तर भागातून आग्नेय दिशेने थोडे अंतर वहात गेल्यावर ती सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यात प्रवेशते. सांगोला तालुक्यातून प्रथम पूर्वेस व नंतर ईशान्येस वाहत जाते. पुढे काही अंतर पंढरपूर-मंगळवेढे तालुक्यांच्या सरहद्दीवरून वाहत जाऊन पंढरपूरच्या आग्नेयीस १७ किमी. वर असलेल्या सरकोलीजवळ भीमेला मिळते. नदीचे काठ सपाट व कृषियोग्य असून नदीपात्रात रेती आढळते. बेलवण, खुर्डू, सानगंगा व वांकडी हे प्रवाह माण नदीला मिळत असून ते कोरड्या ऋतूत पूर्ण आटतात. माण तालुक्यातील बोडके गावाजवळ या नदीवर आंधळी धरण बांधावयाची योजना आज अनेक वर्षे रेंगाळत आहे. दहिवडी, म्हसवड, दिघंची, सांगोला ही माण नदीकाठीवरील प्रमुख गावे आहेत.
कृष्णा नदी खोरे :
दक्षिण भारतातील गोदावरी आणि कावेरी यांदरम्यानची प्रमुख नदी. लांबी सु. १,२८० किमी.; जलवाहन क्षेत्र सु. २,५२,४०० चौ. किमी. कृष्णेचा उगम सह्याद्रीच्या रांगेतील धोम महाबळेश्वराच्या १,४३८ मी. उंचीच्या डोंगरात १७०५९’ उ. व ७३० ३८’पू. येथे सु. १,२२० मी. उंचीवर होतो. येथून पश्चिमेस अरबी समुद्र फक्त सु. ६५ किमी. दूर आहे. क्षेत्र महाबळेश्वर येथे कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री व सावित्री या नद्यांचे उगमझरे दाखवितात. या नद्या महाबळेश्वराहून वेगवेगळ्या दिशांनी वाहत जातात. त्यांना मूळ पाणीपुरवठा फक्त मोसमी पावसापासूनच होतो. महाबळेश्वर येथे दरवर्षी सु. ६२५ सेंमी. हून अधिक पाऊस पडतो त्याच्या पूर्वेस सु. २० किमी. पाचगणी येथे सु. २२५ सेंमी., तर ३२ किमी. वरील वाई येथे फक्त ६० ते ७५ सेंमी. पडतो. महाबळेश्वर डोंगराच्या उत्तरेकडून खाली येऊन कृष्णा आग्नेय व पूर्व दिशांनी वाहू लागते. सु. १० किमी. वरील धोम येथे धरण बांधले जात आहे. वाई खोऱ्याला समृद्ध करीत कृष्णा वाईच्या आग्नेयीस ३७ किमी. वर असलेल्या माहुलीस येते. येथे कृष्णेला वेण्णा नदी मिळते. येथून कृष्णा दक्षिणवाहिनी होते. माहुलीपासून ५० किमी. कराड येथे कृष्णा आणि कोयना यांचा प्रीतिसंगम आहे. महाबळेश्वरहून पश्चिमेस उतरून मग दक्षिणेकडे वाहणाऱ्या कोयनेवर कोयनानगर येथे प्रचंड धरण बांधून त्याचे पाणी बोगद्यातून पश्चिमेकडे नेऊन खाली डोंगरातूनच पोफळी येथील वीजघरात नेले आहे. कराडपासून वर कृष्णेवर खोडशी येथे बंधारा आहे. त्याच्या जोडीला कोयनेचेही पाणी शेतीला उपलब्ध होईल. सांगलीजवळ कृष्णेला पश्चिमेकडून वारणा व पूर्वेकडून येरळा ह्या नद्या मिळतात. कुरुंदवाड येथे कोल्हापूराकडून आलेली पंचगंगा नदी कृष्णेला मिळते; तेथेच नदीच्या दुसऱ्या काठावर श्री क्षेत्र नृसिंहवाडी हे दत्ताचे जागृत देवस्थान आहे. कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती व सरस्वती यांमिळून पंचगंगा झाली आहे. भोगावतीवर राधानगरी येथे विद्युत् प्रकल्प उभारला आहे. यानंतर कृष्णेला दूधगंगा नदी मिळते व ती कर्नाटकाच्या हद्दीत शिरते.
महाराष्ट्राच्या सातारा व सांगली जिल्ह्यांतून कृष्णा सु. ३०० किमी. वाहते. तिचे पात्र विशेषतः रहिमतपूर पर्यंत खोल व खडकाळ असले, तरी तिचे ३० -३५ किमी. रुंदीचे खोरे अत्यंत सुपीक काळ्या मातीचे आहे.त्यात ज्वारी, बाजरी, भुईमूग, करडई, कडधान्ये, बटाटा, आले, हळद, मिरची, ऊस, तंबाखू, थोडा तांदूळ ही पिके होतात. वांगी, कांदे, लसूण, धने, चिंच, आंबा, पेरू व इतर अनेक फळे, फळभाज्या व पालेभाज्या होतात. येथील सकस गवतावर व वैरणीवर पोसलेली जनावरे धष्टपुष्ट, चपळ व देखणी आहेत. खिलार ही बैलांची जात विशेष प्रसिद्ध आहे. उगमाकडील प्रदेशात उन्हाळ्यात कित्येकदा नदी जवळजवळ कोरडी होते. तिला आणि तिच्या उपनद्यांना बंधारे व धरणे बांधून व विहिरींची जोड देऊन शेतीला पाणीपुरवठा व कारखान्यांना वीजपुरवठा करण्याचे प्रयत्न चालू आहेत. तिची उत्तरेकडील प्रमुख उपनदी भीमा तिला महाराष्ट्राबाहेर मिळत असली, तरी ती महाराष्ट्राच्या सातारा, पुणे, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांतून अनेक नद्यांचे पाणी तिला आणून देते. कर्नाटक राज्याच्या बेळगाव जिल्ह्यातून कृष्णा पूर्वेकडे वाहत कर्नाटक पठारावरून विजापूर जिल्ह्यात येते. या जिल्ह्यात तिच्या काठी काळी आणि जांभ्या दगडाची तांबडी माती दिसते. तिच्या काठच्या दरडी ६ ते १६ मी. उंचीच्या आहेत व तिच्या पात्रातील बेटांवर बाभळीची झाडे दिसतात. पूर्वेकडील प्रदेश अधिक रुक्ष आहे. विजापूर जिल्ह्यात कृष्णेला घटप्रभा नदी मिळते. घटप्रभेवर गोकाकचा धबधबा आहे. तेथील खडक भूशास्त्रदृष्ट्या अभ्यसनीय आहेत. यानंतर कृष्णा ५०० ते १,००० मी. उंचीच्या पठारी प्रदेशातून २०० ते ५०० मी. उंचीच्या पठारी भागात येते. मग तिला मलप्रभा नदी मिळते व ती रायचूर आणि गुलबर्गा जिल्ह्यांची सीमा बनते. जलदुर्ग येथे अरुंद घळईतून गेल्यावर तिला ढोण नदी मिळते. आंध्र व कर्नाटक यांच्या सीमेवर आंध्र प्रदेशाचा महबूबनगर व कर्नाटकचे गुलबर्गा व रायचूर जिल्हे एकत्र येतात. तेथे रायचूरच्या उत्तरेस सु. २५ किमी. वर कुरूगड्डी येथे भीमा नदी कृष्णेला मिळते ; तेथे दत्ताचे अत्यंत रमणीय देवस्थान आहे. उगार, शूखाली, कुरूगड्डी ही क्षेत्रेही कर्नाटक राज्यात आहेत.
कर्नाटक राज्यात कृष्णेच्या खोऱ्यात पावसाचे प्रमाण बेताचेच आहे; त्यामुळे ज्वारी, गहू, कडधान्ये, तंबाखू, कापूस ही प्रमुख पिके आहेत. पाणीपुरवठा होईल त्यामानाने उसाचे उत्पन्नही वाढत आहे. कृष्णेची दक्षिणेकडील महत्त्वाची मोठी उपनदी तुंगभद्रा मध्य कर्नाटकामधून येते; ती कर्नाटकाबाहेरच कृष्णेला मिळते. परंतु कृष्णेपेक्षाही त्या राज्याला ती अधिक उपयोगी ठरते. शिमोगा, चित्रदुर्ग, बेल्लारी, रायचूर या जिल्ह्यांतील नद्या तुंगभद्रेलाच पाणीपुरवठा करतात. मल्लापुरम् येथे तुंगभद्रेवर प्रचंड धरण बांधलेले आहे.
आंध्र प्रदेशात महबूबनगर जिल्ह्याच्या नैर्ऋत्य भागातून आग्नेय दिशेने पुढे गेल्यावर महबूबनगर कुर्नूल सीमेवरून आलेली तुंगभद्रा नदी कुर्नूलच्या पुढे संगमेश्वरम् येथे कृष्णेला मिळते. येथून पुढे कृष्णा नदी महबूबनगर, कुर्नूल, नळगोंडा, गुंतूर आणि कृष्णा जिल्ह्यांची सरहद्द बनते. तेलंगण पठारावरून ग्रॅनाइटच्या पायऱ्यापायऱ्यांवरून २०० मी. पेक्षा कमी उंचीच्या सपाट प्रदेशात उतरल्यावर कृष्णेला दिंडी, मुसी, पालेरू, मुनेरू इ. नद्या मिळतात. आंध्र प्रदेशाची राजधानी हैदराबाद मुसी नदीवर असून ती वाडापल्ली (वझिराबाद) येथे कृष्णेला मिळते. या राज्यातील नल्लमलई पर्वतराजीच्या पश्चिमेकडून कृष्णा ईशान्य दिशेने जाते व जग्गय्यापेटाच्या दक्षिणेस एकदम दक्षिणेस वळते. येथे तिचा उतार दर किमी. ला ०.३ मी. इतका कमी होतो. डोंगराळ प्रदेशातून वाट काढीत ती विजयवाडा येथे येते. तेथे ती पूर्व घाटाच्या दोन टेकड्यांमधील सु. १,३७० मी. रुंदीच्या फटीतून कोरोमंडल किनारी प्रदेशात उतरते. येथूनच तिचा त्रिभुज प्रदेश सुरू होतो. येथेच कृष्णेवर १,१३२ मी. लांब व ६ मी. उंच दगडी बांध घालून तिचे पाणी कालव्यांनी सर्व त्रिभुज प्रदेशांत शेतीसाठी खेळविले आहे. त्याशिवाय नलगोंडा जिल्ह्यात नंदीकोंडा येथे नागार्जुनसागर हा प्रचंड प्रकल्प शेतीला पाणीपुरवठा व जलविद्युत् उत्पादन या प्रमुख हेतूंनी पुरा होत आहे. कृष्णेच्या त्रिभुजप्रदेशातील कालवे गोदावरीच्या त्रिभुजप्रदेशातील कालव्यांशी जोडलेले आहेत. त्यांतून व बकिंगहॅम कालव्यातून काकिनाडा ते मद्रासपर्यंत होड्यांतून वाहतूक होते. मुखापासून सु. ८० किमी. आतपर्यंत कृष्णेतून वाहतूक होते. विजयवाड्यानंतर ६४ किमी. कृष्णेचा प्रवाह वाहतो. कृष्णा जिल्ह्यात पुलिगड्डा येथे दोन प्रवाह होऊन दिवी बेट बनते. तेथून तीन प्रवाह होऊन कृष्णा समुद्रास मिळते. याच्या उत्तरेस त्रिभुजप्रदेशातील दुसऱ्या एका फाट्याच्या मुखाशी बंदर ऊर्फ मसुलीपटम् (मच्छलीपटनम्) हे शहर वसलेले आहे. पुराच्या वेळी कृष्णा नदी इतका गाळ वाहून आणते, की त्यामुळे १० चौ. किमी. प्रदेशावर दररोज २० सेंमी. जाडीचा गाळाचा थर बसेल.
आंध्र प्रदेशात कृष्णेच्या खोऱ्याला ईशान्य मोसमी वाऱ्यांपासूनही पाऊस मिळतो. अनेक लहानमोठ्या उपनद्यांनी आणलेल्या पाण्यामुळे कृष्णा जलसमृद्ध झालेली असते. या भागात विशेषत: त्रिभुजप्रदेशात मुख्य पीक भाताचे आहे. पुराचे वेळी जिकडे तिकडे पाणीच पाणी होऊन नजर न पोहोचेल एवढे जणू काही एकच एक भाताचे शेत दिसते. विजयवाडा, गुंतूर, बंदर, एलुरू या तांदळाच्या प्रसिद्ध मोठ्या बाजारपेठा आहेत. ज्वारी, रागी, मका, ऊस, भुईमूग, कापूस, एरंडी, तंबाखू, केळी, भाजीपाला ही इतर पिके होतात. गुरांची व मेंढ्यांची पैदासही चांगली होते. समुद्रकिनाऱ्यावर व नद्या सरोवरांतून मासेमारीही चालते. आंध्र प्रदेशातील कृष्णेच्या खोऱ्यात उद्योगधंद्यांचीही वाढ वेगाने होत आहे. या राज्यातून कृष्णा सु. ७२० किमी. वाहते.
कृष्णेच्या खोऱ्यात जांभूळ, हिरडा, नागचाफा, सुरंगी, फणस, तमालपत्र, अंजनी, शिसव, सावर, किंजळ, असाणी, कुंभी, कव्हा, चिंच, कवठ, बोर, बेल, बाभूळ, साग, धामण, शिवण, धावडा, ऐन, किनई, खैर इ. झाडे आढळतात. तसेच कुडा, वाकेरी, भारंग, वावडिंग, सातवी, घायटी, बेडकी, बिब्बा, बाव्हा, भुईकोहळा इ. औषधी वनस्पती सापडतात. वाघ, चित्ता, सांबर, भेकर, गवा, रानडुक्कर, अस्वल, तरस, चितळ, ससा, लांडगा इ. प्राणी; अनेक जातीचे सर्प, पक्षी व कीटक आहेत.
कृष्णा महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांतून वाहत असल्यामुळे तिच्या खोऱ्यात मुख्यत्वे मराठी, कानडी आणि तेलुगू भाषा बोलल्या जातात. प्रत्येक राज्यात कृष्णेच्या पाण्याचा वापर किती प्रमाणात व्हावा, याबद्दल तिन्ही राज्यांत वाद आहेत. १९६९ साली यासाठी न्या. बच्छबत यांच्या अध्यक्षतेखाली एक लवाद नेमण्यात आला होता. त्याचा निकाल डिसेंबर १९७३ मध्ये लागून आंध्रला सु. २३ घ. मी. पाणी, कर्नाटकाला सु. २० घ. मी. पाणी व महाराष्ट्राला सु. १६ घ. मी. पाणी वापरण्याचा हक्क मिळाला आहे. प्रत्येक राज्यात अनेक लहानमोठे प्रकल्प हाती घेऊन ते पुरे करण्याचे प्रयत्न चालू आहेत. महाराष्ट्रातील कोयना प्रकल्प, कर्नाटकमधील तुंगभद्रा प्रकल्प व आंध्र प्रदेशातील नागार्जुनसागर प्रकल्प हे विशेष मोठे प्रकल्प आहेत.तिन्ही राज्यांतील लोकांना कृष्णेविषयीच्या पवित्र व धार्मिक भावनेने मात्र एकत्र बांधलेले आहे. हे सांस्कृतिक ऐक्य तिच्या खोऱ्यातील अनेक तीर्थस्थळी होणाऱ्या भाविकांच्या गर्दीवरून दिसून येते. कृष्णेचे महत्व कृष्णामाहात्म्यपुराण, कृष्णामाहात्म्यवर्णन, कृष्णालहरी इ. ग्रंथांत वर्णिलेले आहे. कन्यागतास म्हणजे गुरू कन्याराशीत येतो, तेव्हा गंगा नदी कृष्णेला भेटावयास येते अशी भाविकांची श्रद्धा आहे. या काळात गंगातीरी करावयाची धार्मिक कृत्ये कृष्णातीरीही करतात.
कृष्णा नदीच्या प्रमुख उपनद्या
| उपनदी | उगम | कृष्णेबरोबर संगम |
| वेण्णा | महाबळेश्वर | माहुलीजवळ (सातारा) |
| कोयना | महाबळेश्वर | प्रितीसंगम कराड (सातारा) |
| पंचगंगा | सह्याद्री | कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती व सरस्वती (गुप्त) मिळून नरसोबाची वाडी येथे कृष्णेस मिळते. |
| वारणा | सह्याद्री | कोल्हापूरच्या ईशान्येस कोप-यात हरिपूर येथे कृष्णेस मिळते. |
| वेरळा | | ब्रम्हनाळ (सांगली) |
| तुंगभद्रा | गंगामुळ | कर्नाटक संगमेश्वर (कर्नुल-कर्नाटक) |
कोयना: महाबळेश्वर येथे कृष्णा नदीच्या उगमाजवळच कोयना नदीचा उगम आहे. कृष्णा नदी पूर्ववाहिनी आहे. कोयना मात्र उत्तर–दक्षिण दिशेने ६४ किमी. जाऊन व प्रतापगडला वळसा घालून हेळवाकजवळ पूर्वाभिमुख होते. तेथून ५६ किमी. वरील कराडजवळ कोयनेचा कृष्णेशी संगम (प्रीतिसंगम) झाला आहे. कोयनेच्या ८९२·० चौ. किमी. क्षेत्रफळाच्या खोऱ्यात सु. ५०८ सेंमी. पाऊस पडतो. कोयना खोरे सह्याद्रीच्या पश्चिमेकडील पायथ्यापासून ४२७ मी. उंच आहे. या ठिकाणी जलविद्युत् प्रकल्प उभारण्याच्या योजनेस १९५४ च्या जानेवारीत प्रारंभ झाला.
पंचगंगा :कोल्हापूर जिल्ह्याच्या उत्तर भागातून पूर्वेकडे वाहणारी कृष्णेची एक प्रमुख उपनदी. जलवाहन क्षेत्र सु. २,०७२ चौ. कमी. कोल्हापूरच्या वायव्येस सहा किमी. वरील प्रयाग या पवित्र ठिकाणापासून वाहणाऱ्या पाच नद्यांच्या [कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती व सरस्वती (गुप्त नदी)] संयुक्त प्रवाहास पंचगंगा म्हणतात. ती प्रयागपासून पूर्वेस सु. ६४ किमी. वाहत जाऊन नरसोबाची वाडी या तीर्थक्षेत्रजवळ कृष्णेस मिळते. हिच्या शीर्षप्रवाहांतील पाच नद्यंपैकी कासारी व भोगावती या प्रमुख नद्या आहेत. कासारी नदी शाहूवाडी तालुक्यात उत्तरेकडील विशाळगड व दक्षिणेकडील वाघजाई यांदरम्यानच्या त्रिकोणाकृति प्रदेशात उगम पावून एकूण ५६ किमी. वाहत जाऊन प्रयागजवळ पंचगंगेस मिळते. भोगावती नदी सह्याद्री पर्वतरांगेत, फोंडाघाटापासून काही अंतरावर उगम पावून सु. ४० किमी. ईशान्येस व उत्तरेस वाहत जाते व बीडजवळ तुळशी नदीला मिळाल्यानंतर यांचा संयुक्त प्रवाह कुंभी व धामणी यांच्या संयुक्त प्रवाहासह पंचगंगेला मिळतो. या सर्व नद्यांची खोरी मिळून पंचगंगा खोऱ्याचे पश्चिम खोरे (कोल्हापूरपर्यंत) व पूर्व खोरे (कोल्हापूर ते नरसोबाची वाडी) असे दोन भाग होतात.पंचगंगा खोऱ्यातील दोन प्रमुख प्रकल्पांपैकी राधानगरी येथे भोगावती नदीवर बांधलेल्या धरणाने लक्ष्मी तलाव निर्माण झाला आहे. या धरणाचा उपयोग जलसिंचन आणि विद्युत्निर्मिती यांसाठी केला जातो. राधानगरी तालुक्यातील बुंबाली गावाजवळ तुळशी नदीवर सु. ६४५.६१ लाख रु. खर्चाचे, ४८.६ मी. उंचीचे व सु. ९७.९६ द.ल.घ.मी. पाण्याचा साठा करू शकणाऱ्या धरणाचे काम तीन टप्प्यांत पूर्ण करण्यात येणार असून, त्यामुळे ३,४२१ हे. जमीन ओलिताखाली येईल.नागमोडी वाहणाऱ्या पंचगंगा नदीच्या काठी ठिकठिकाणी गाळाची मैदाने तयार झाली आहेत. या नदीवरील बऱ्याच उपसा जलसिंचन योजनांमुळे करवीर, हातकणंगले व शिरोळ या तालुक्यांतील बरीच शोती पाण्याखाली आली आहे. पंचगंगेच्या खोऱ्याचा पश्चिम भाग बव्हंशी विरळ वस्तीचा, तर पूर्व भाग दाट लोकवस्तीचा आहे. खोऱ्यातील काळ्या व कसदार जमिनीतून ऊस, कापूस, तंबाखू, विड्याची पाने, भाजीपाला, हळद, गहू, ज्वारी, कडधान्ये ही पिके घेतली जातात. कोल्हापूर, रुकडी, इचलकरंजी व कुरुंदवाड ही या नदीतीरावरील प्रमुख शहरे होत. नरसोबाची वाडी हे प्रसिद्ध दत्तस्थानही कृष्णापंचगंगेच्या संगमावर आहे.
वारणा नदी : सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणारी कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी. या नदीचा उगम सह्याद्री पर्वतातील पथरपुंज पठाराजवळ प्रचितगडावर सस. पासून ९१४ मी. उंचीच्या प्रदेशात होतो. प्रथम वारणा नदी वायव्येकडून आग्नेयीकडे व नंतर पूर्वेकडे वाहते. ती कृष्णा नदीस सांगली शहराच्या नैर्ऋत्येस सु. दीड किमी. अंतरावर सस. पासून ५८४ मी. उंचीच्या प्रदेशात हरिपूर येथे मिळते. संगमाजवळ वारणा नदीचे पात्र ७० मी. रुंद आहे.
काडवी व मोरणा या वारणेच्या प्रमुख उपनद्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील काडवी नदीचा उगम सह्याद्री पर्वतात आंबा घाटाजवळ सु. ७०० मी. उंचीच्या प्रदेशात होतो. सुमारे ३५.४ किमी. वाहून काडवी नदी सागावजवळ वारणा नदीस मिळते. काडवी नदी मिळाल्यावर तिचा प्रवाह बराच विस्तारित होतो. काडवी नदी वारणा नदीस जवळजवळ समांतर वाहते. पोटफुगी, आंबरडी, अंवीर व कांद्रा हे प्रमुख ओढे काडवी नदीस मिळतात.
सांगली जिल्ह्यातील मोरणा ही वारणेची दुसरी महत्त्वाची उपनदी. या नदीचा उगम धामवडे टेकडीजवळ होतो. ही नदी दक्षिणेस व आग्नेयीस वाहते. या नदीची लांबी सु. २७.३५ किमी. आहे. तिच्या खोऱ्यात विस्तृत पानमळे आढळतात. शिराळा तालुक्यातील मांगळे गावाजवळ मोरणा नदी वारणेस मिळते. उजव्या बाजूने कानसा नदी उदगिरीपासून २० किमी. वाहत जाऊन पन्हाळा तालुक्यात माळेवाडी-जवळ वारणेस मिळते. शाली व अंबार्डी या वारणेच्या इतर उपनद्या होत.
वारणा खोऱ्याचा विस्तार सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांत झाला असून त्याचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे १६०४७' उ. ते १७०१५' उ. आणि ७३०३०' १५" पू. ते ७४०३०' पू. यांदरम्यान आहे. या खोऱ्याची लांबी १४९ किमी., सरासरी रुंदी २१ किमी. व एकूण क्षेत्र २,०९५ चौ. किमी. आहे. वारणा खोऱ्यात शिराळा, वाळवा, मिरज (जि. सांगली), शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ (जि. कोल्हापूर), पाटण (जि.सातारा) या आठ तालुक्यांचा समावेश होतो. भूवैज्ञानिक दृष्ट्या वारणा खोरे दख्खन ढाली प्रदेशात वायव्य भागात येते. वारणा नदीच्या खोऱ्यात विविध प्रकारची भूरूपे असल्याने येथील स्थलाकृती अत्यंत गुंतागुंतीची आहे. पश्चिमेकडे कोकण व पूर्वेकडे दख्खन पठार यांदरम्यानच्या संक्रमण पट्ट्यात वारणा खोरे असल्याने दोन्ही प्राकृतिक विभागांतील गुणधर्म वारणेच्या खोऱ्यात आढळतात. खोऱ्यातील पश्चिमेकडील प्रदेश पूर्वेकडील प्रदेशापेक्षा जास्त उंचसखल आहे. वारणेचे खोरे पश्चिम घाटामुळे पर्जन्यछायेच्या प्रदेशात येते, त्यामुळे पाऊस कमी पडतो. मॉन्सून काळात पाऊस पडतो, परंतु इतर कालावधी कोरडा असल्याने वारणेच्या खोऱ्यातील नद्यांना पावसाळा वगळता इतर काळात पाणी फारच कमी असते.
वारणा नदीचे खोरे सुपीक आहे. भात, ज्वारी, ऊस, भुईमूग ही महत्त्वाची पिके या खोऱ्यात होतात. शाहूवाडी तालुक्यात आंबोळी येथे वारणा नदीवर एक मोठा प्रकल्प आणि सांगली जिल्ह्यात चांदोली व शिराळा तालुक्यात वारणा पाटबंधारे हा मोठा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मोरणा नदीवर शिराळा तालुक्यातील प्रकल्प, तर शाहूवाडी तालुक्यात पोटफुगी नदीवर काडवी प्रकल्प पूर्ण करण्याची योजना आहे. यांशिवाय वारणेच्या खोऱ्यात अनेक कोल्हापूरी बंधारे व काही लघू पाटबंधारे प्रकल्प पूर्ण झालेले आहेत, तसेच वारणानगर (कोडोली) सारखी गावे उद्योगधंद्यांमुळे विकास पावली आहेत. या खोऱ्यातील खेड्यांना जोडणारे अनेक पक्के रस्ते, जिल्हा प्रमुख रस्ते व ग्रामीण रस्ते आहेत. परंतु या खोऱ्यात लोहमार्ग व हवाई वाहतूक यांची सोय नाही. कोल्हापूर, मिरज, सांगली ही या खोऱ्यातील लोकांना जवळची रेल्वेस्थानके आहेत.
तुंगभद्रा : द. भारतातील एक प्रमुख नदी आणि कर्नाटक व आंध्र प्रदेश राज्यांतून वाहणारी कृष्णेची मुख्य उपनदी. लांबी सु. ६४० किमी. कर्नाटक राज्याच्या चिकमगळूर जिल्ह्यात शृंगेरीच्या नैऋत्येस सु. २५ किमी. सह्याद्रीतील पुराणसिद्ध वराह पर्वतावरील १,४०० मी. उंचीवरील गंगामूळ येथून तुंग आणि भद्रा या दोन नद्या उगम पावतात. त्या तेथून ईशान्येस सु. १५० किमी. कूडली येथे एकत्र होऊन त्यांची तुंगभद्रा नदी बनते. तुंगेच्या काठी शृंगेरी, तीर्थहळ्ळी, शिमोगा ही ठिकाणे असून भद्रा नदी बाबा बुढण डोंगराच्या पायथ्याजवळून जाते. तिच्याकाठी बेंकिपूर, भद्रावती ही ठिकाणे आहेत. तुंगभद्रा पुढे हरिहर, होस्पेट, हंपी यांवरून ईशान्येकडे जाऊन आंध्र प्रदेशाच्या सीमेवर येते. नंतर सु. १० किमी. जाऊन ती पूर्ववाहिनी होते आणि कर्नाटक–आंध्र सीमेवरून सु. ५० किमी. जाऊन मग आंध्र प्रदेशात शिरते. कुर्नूलच्या पुढे संगमेश्वरम् येथे ती कृष्णेला मिळते. वरद, कुमुद्वती, हरिद्रा, हगेरी, वेदवती या तुंगभद्रेच्या प्रमुख उपनद्या आहेत. त्यांसह तुंगभद्रा आणि भीमेसह कृष्णेच्या कर्नाटकातील भाग मिळून सह्याद्रीच्या पूर्वेच्या कर्नाटक राज्याच्या उत्तरेकडील निम्म्या प्रदेशाचे जलवाहन करतात. तुंगभद्रेचे पाणी मधुर असल्याने ‘गंगा स्नान आणि तुंगा पान’ अशी म्हण पडली आहे. नद्यांना बांध घालून शेतीला पाणीपुरवठा करण्याची पद्धत भारतात विशेषतः दक्षिणेकडे प्राचीन काळापासून रूढ आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस तुंग व भद्रा यांवर मिळून ३८ छोटे बांध होते. विजयानगरच्या राजांनी हंपीजवळ तुंगभद्रेवर अनेक बांध घातले होते. त्यांपैकी १० बांध या शतकाच्या सुरुवातीस चालू होते. ब्रिटिशांच्या आमदनीत कृष्णा–तुंगभद्रा संगमाच्या अलीकडे एका बांधाने तुंगभद्रेचे काही पाणी वळवून कुर्नूल–कडप्पा कालव्यात सोडले आहे. परंतु तुंगभद्रेचे पाणी खरोखर कारणी लागले ते तुंगभद्रा प्रकल्पामुळे, हा बहूद्देशी प्रकल्प आंध्र प्रदेश व कर्नाटक यांच्या सहकार्याने त्यांच्याच फायद्यासाठी उभारलेला आहे. १९०३ सालीच तयार झालेली ही योजना सध्याच्या स्वरूपात उभी रहाण्यास १९५६ साल उजाडले. कर्नाटक राज्याच्या बेल्लारी जिल्ह्यात होस्पेट पासून सु. ८ किमी. वरील मल्लापुरम् येथे तुंगभद्रेला २,४४१ मी. लांब व ४९·३३ मी. उंच धरण बांधले असून त्याच्या दोन्ही बाजूंच्या कालव्यांचा लाभ एकूण ३·३२ लाख हे. जमिनीला १९७३–७४ अखेर व्हावयाचा होता. दोन्ही बाजूंकडील व पायथ्याच्या विद्युत् गृहांतून एकूण सु. १ लाख किवॉ. वीज उपलब्ध होत आहे. तसेच धरणाच्या ‘पंपा सरोवर’ या जलाशयातील पाणी बोगद्यातून पलीकडे पेन्नार नदीत सोडणे हे या प्रकल्पाचे एक वैशिष्ट्य आहे. या प्रकल्पामुळे रायलसीमा विभागाचे पाण्याअभावीचे दैन्य दूर होऊन तेथे भात, कापूस, भुईमूग, ऊस इ. पिके भरपूर निघू लागतील.
तुंगभद्रेच्या परिसरात शृंगेरी येथे आद्य श्रीशंकराचार्यांचा मठ आहे. हंपीजवळ विजयानगरच्या साम्राज्याचे अवशेष आहेत. हरिहर हे औद्योगिक केंद्र व होस्पेट, कुर्नूल इ. महत्त्वाची शहरे आहेत. इकडील वेदपाठी लोकांचे उच्चार प्रमाण मानले जातात.
तापी नदी खोरे :
तापी नदी सातपुडा पर्वताच्या दक्षिणेची मोठी पश्चिमवाहिनी नदी. लांबी ७०२ किमी., जलवाहनक्षेत्र सु. ६५,३०० चौ. किमी. पैकी महाराष्ट्रात हिचा मार्ग २०८ किमी. व जलवाहन क्षेत्र ३१,३६० चौ. किमी. आहे. भारताच्या दख्खन पठारावरून वाहणाऱ्या इतर सर्व मोठ्या नद्या पूर्ववाहिनी आहेत; फक्त तापी आणि नर्मदा या मात्र खचदऱ्यांतून पश्चिमेकडे वाहतात. तापी मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या राज्यांतून वाहते. मध्य प्रदेशातील बेतूल जिल्ह्याच्या पठारी भागात मुलताई (मूळ तापी) येथील तलावातून तापी उगम पावते, असे मानतात. खरा उगम तेथून सुमारे ३ किमी. वर आहे. प्रथम सपाट प्रदेशातून काही अंतर गेल्यावर ती उत्तरेस कालीभीतचे डोंगर व दक्षिणेस गाविलगड–मेळघाट रांगेची शाखा यांमधील जंगलव्याप्त तीव्र उताराच्या खडकाळ निदरीत वेगाने उतरते. पश्चिमेकडे थोडे अंतर जाऊन ती नैर्ऋत्येस वळते व महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून ४८ किमी. वाहत जाते. ती तशीच पुढे मध्य प्रदेशाच्या खांडवा जिल्ह्यातून निमाड भागातून बऱ्हाणपूरला येते. येथे तिने ३२ किमी. रुंदीचे पूरमैदान बनविले आहे. मग महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यात शिरून ती भुसावळजवळ पुन्हा पश्चिमेकडे वाहू लागते. येथे रेल्वेपुलाच्या दोन्ही बाजूंस तिच्यावर दोन छोटे धबधबे आहेत. जळगाव व धुळे जिल्ह्यांच्या सुपीक प्रदेशातून जाऊन तापी नंदुरबार व तळोदे यांदरम्यानच्या गुजरातच्या चिंचोळ्या पट्ट्यात जाते व अरुंद, खडकाळ मार्गाने पठार उतरून सुरत जिल्ह्याच्या सपाट भागात येते. मांडवीवरून पुढे गेल्यावर वाघेच्या जवळ राजपीपला टेकड्याही दूर राहून ती वळणे घेत घेत सुरतेस येते. येथून सु. ८ किमी. वर ती खंबायतच्या आखातास मिळते. मुखापासून सु. ५० किमी. पर्यंत भरतीचे पाणी येते. तेथे लहान नौकांनी वाहतूक चालते; परंतु बऱ्याच भागात गाळ साठल्यामुळे मोठी तारवे चालत नाहीत. अखेरच्या भागात तिच्या पात्रात काही बेटे बनलेली आहेत.
तापीच्या खोऱ्याचा उत्तरेकडील भाग अरुंद आणि सातपुड्याकडे एकदम चढत गेलेला असल्यामुळे तिला उत्तरेकडून मिळणाऱ्या नद्या लहान आहेत. तिच्या महत्त्वाच्या उपनद्या दक्षिणेकडून येणाऱ्या पूर्णा, वाघूर, गिरणा, बोरी, पांझरा या आहेत. पूर्णा ही सर्वांत महत्त्वाची उपनदी पूर्वेकडून गाविलगडच्या डोंगरातून निघून अमरावती, अकोला, बुलढाणा जिल्ह्यांतून जाऊन जळगाव जिल्ह्यात चांगदेव येथे तापीला मिळते. पुष्कळदा तापी–पूर्णा खोरे असा उल्लेख करतात. गिरणा, बोरी, पांझरा, बोराई या उपनद्या पश्चिमेकडून सह्याद्रीच्या उत्तर भागातून येतात. गुजरातेत राजपीपला टेकड्यांतून आलेली वारेली ही एकच महत्त्वाची उपनदी तापीला उजवीकडून मिळते.
तापीच्या खोऱ्यात जलोढाचा जाड थर आहे; त्याचे तापीने व तिच्या उपनद्यांनी क्षरण केल्यामुळे प्रदेशाला उत्खातभूमीचे स्वरूप आलेले बऱ्याच ठिकाणी दिसते. नाळी, घळ्या, काठावरील उंचउंच दरडी सर्वत्र विशेषतः पूर्व भागात दिसतात. पश्चिमेकडे गाळाचा थर जास्त विस्तृत आहे. तथापी जलरेषा बरीच खोल व अनिश्चित असल्यामुळे ज्वारी, कापूस, तेलबिया, कडधान्ये इ. कोरडवाहू पिकेच मुख्यतः होतात. दक्षिणेकडील उपनद्यांच्या खोऱ्यात काळ्या मातीचा खोल थर असल्यामुळे खानदेश–वऱ्हाडचा प्रसिद्ध कापूस उत्पादक प्रदेश निर्माण झाला आहे. अधिक पश्चिमेकडे सह्याद्रीचे फाटे व पावसाचे अधिक प्रमाण यांमुळे भाताचे पीक येते. गुजरातेत पूर्वेकडील ६६ टक्के भाग कमी लागवडीचा, तर पश्चिमेकडील उरलेला प्रदेश सधन लागवडीचा आहे. या भागात तापीचे पात्र ५०० ते १,००० मी. रुंद होते व तिच्या तीरांवर २५ ते ५५ मी. उंचीच्या दरडी आहेत. त्यांत घट्ट, पिवळसर गाळमाती, चुनखडक व सु. एक मी. जाडीचा काळ्या मातीचा थर दिसतो.
तापी खोऱ्यातील जंगलात इमारती लाकूड, जळण, बांबू, डिंक, तेंडू इ. जंगली उत्पन्ने मिळतात. वाघ, हरिण, रानडुक्कर, तरस, कोल्हा इ. वन्यपशू व अनेक जातीचे पक्षी, सर्प वगैरे आढळतात. नद्यांत व समुद्रात मासे पुरेसे मिळतात. सुरतेचे बंदर गाळाने भरून आल्यामुळे आणि मुंबईचे महत्त्व वाढल्यामुळे सुरतेला पूर्वीचे महत्त्व राहिले नाही. तापीच्या खोऱ्यातून जाणारा सुरत–भुसावळ हा लोहमार्गही तितकासा महत्त्वाचा राहिलेला नाही. त्यापेक्षा मुंबई–नासिक–मनमाड–भुसावळ हा मार्ग अधिक रहदारीचा व उपयुक्त झाला आहे. त्याचा जळगावच्या पूर्वेचा काही भाग काही अंशी तापी–पूर्णा खोऱ्यातून जातो. तसेच तापी खोऱ्यातील धुळे, जळगाव, भुसावळ, अकोला, अमरावती इ. शहरांवरून राष्ट्रीय महामार्ग जातात.
तापी खोऱ्यात जलसिंचनाची आवश्यकता असल्यामुळे तापीच्या उपनद्यांवर अनेक सिंचन प्रकल्प झाले आहेत. गुजरातेत सुरतपासून ८० किमी. वर उकाई येथे तापीवर धरण बांधून जलसिंचन व जलविद्युत् उत्पादन केले आहे. उकाईच्या पश्चिमेस काक्रापारा येथे तापीला बांध घातला आहे.
तापीला धार्मिक महत्त्वही आहे. हिंदू पुराणांत तिचा उल्लेख ताप्ती, तापिका, तापिनी इ. नावांनी आढळतो. सूर्याने आपला दाह कमी करण्यासाठी ही नदी निर्माण केली आहे. अशी कथा आहे. तापीच्या काठी सु. १८० तीर्थक्षेत्रे आहेत. त्यांपैकी पूर्णा संगमाजवळचे चांगदेव व गुजरातेतील बोधान ही विशेष प्रसिद्ध आहेत. सुरत शहर, तेथील किल्ला, थाळनेरचा किल्ला यांस ऐतिहासिक महत्त्व आहे.
तापी नदीच्या प्रमुख उपनद्या
पूर्णा नदी : तापी नदीची महत्वाची उपनदी. ‘पयोष्णी’ असेही तिचे जुने नाव आहे. नैऋत्य व पश्चिम दिशांनी वाहणाऱ्या या नदीचा प्रवाह अमरावती, अकोला व बुलढाणा या जिल्ह्यांतून जातो. लांबी सु. ३३८ किमी., जलवाहनक्षेत्र १८,३११ चौ. किमी. ही महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात गाविलगड टेकड्यांच्या दक्षिणेकडील उतारावर उगम पावते. प्रथम दक्षिण व नंतर नैऋत्य दिशेने या जिल्ह्याच्या मध्यभागातून वाहते. पुढे अमरावती व अकोला जिल्हा यांच्या सरहद्दीवर आल्यावर ती पश्चिमाभिमुख होऊन अकोला व बुलढाणा या जिल्ह्यांतून वाहत जाऊन जळगाव जिल्ह्यात चांगदेव येथे तापीस मिळते. या नदीला अमरावती जिल्ह्यात पेंढी, शहानूर, चंद्रभागा, बोर्डी; अकोला जिल्ह्यात उमा, काटेपूर्णा, लोणार, मोर्णा, मान आणि बुलढाणा जिल्ह्यात नळगंगा, विश्वगंगा व बाणगंगा या नद्या मिळतात. मध्य भागातील अजिंठा डोंगर व उत्तर भागातील गाविलगड डोंगर यांमधील हिच्या प्रवाहक्षेत्रास पूर्णा खोरे म्हणतात. तापी-पूर्णा खोरे या नावानेही ते ओळखले जाते. पूर्णेचे खोरे सुपीक असून कापसाच्या पिकासाठी विशेष प्रसिद्ध आहे. दर्यापूर, अचलपूर, अमरावती, मुर्तिजापूर, अकोला, बाळापूर, खामगाव, मलकापूर, एदलाबाद, चांगदेव ही पूर्णा खोऱ्यातील महत्त्वाची गावे होत.
नर्मदा नदी खोरे :
नर्मदा नदी भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे. या नदीचा उगम अमरकंटक (शाडोल जिल्हा, मध्य प्रदेश ) येथील नर्मदाकुंडातून होतो . ही नदी भारताच्या मध्य प्रदेश (१०७८ कि.मी) , महाराष्ट्र (५४ कि.मी), गुजरात(१६० कि.मी.) या राज्यांतून वाहते. नर्मदा भारतीय उपखंडातील पाचव्या क्रमांकाची मोठी नदी असून सर्वांत मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. नर्मदेला रेवा असेही एक नाव आहे.
नर्मदेचे खोरे विंध्य व सातपुडा पर्वतरांगांमध्ये (७२°३२' ते ८१°३५' पूर्व रेखांश व २१°२०' ते २३°४५' उत्तर अक्षांश) पसरले असून एकूण पाणलोट क्षेत्रफळ ९८७९६ चौरस कि.मी. आहे. यातील ८६% भूभाग मध्य प्रदेशात असून १२% गुजरात व अगदी थोडा (२%) महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात आहे. नर्मदेला तब्बल ४१ उपनद्या येऊन मिळतात. त्यातल्या २२ उपनद्या सातपुड्यातून तर उर्वरित विंध्य पर्वतातून वाहणाऱ्या आहेत.
कोकणातील नद्या किवा कोकण खोरे :
सह्याद्री प्रर्वतावर उगम पावना-या नद्यांची रुंदी – ४९ ते १५५ कि.मी.दरम्यान असते .कोकणातील नद्यांची वैशिष्टये म्हणजे त्या वेगवान व हंगामी असतात.त्यांना त्रिभूज प्रदेश नसतो.कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी उल्हास (१३० कि.मी.) आहे . कोकणातील दुस-या क्रमांकाची नदी वैतरणा (१२४ कि.मी.)आहे .उत्तर कोकणातील महत्वाच्या नद्या दमनगंगा, तणासा, सुर्या, भातसई, जगबुडी, मुरवाडी, वैतरणा, उल्हास ह्या आहेत .मध्य कोकणातील महत्वाच्या नद्यापाताळगगां, कुंडलिका, काळ, काळू, सावित्री, वशिष्ठी, शास्त्री ह्या आहेत .दक्षिण कोकणातील महत्वाच्या नद्याकजवी, मुचकुंदी, शुक, गड, कर्लि, व तेरेखोल आहेत .
टिप : महाराष्ट्रातून दोनदा वाहणा-या नद्या – मांजरा, तापी, गोदावरी
महराष्ट्रातील प्रमुख नदी काठावरील शहरे:
| नदी | काठावरील शहरे | नदी | काठावरील शहरे |
| गोदावरी | नाशिक, पैठण, नांदेड, गंगाखेड, कोपरगांव, राजमहेंद्री | पंचगंगा | कोल्हापूर |
| कृष्णा | वाई, सागली, मिरज, औदुंबर, कराड, नरसोबाची वाडी | इंद्रायणी | देहू व आळंदी (पुणे) |
| पांझरा | धुळे | मौसम | मालेगांव |
| क-हा | जेजुरी | भीमा | पंढरपूर |
| सिना | अहमदनगर | प्रवरा | नेवासे (संगमनेर) |
महराष्ट्रातील प्रमुख नद्या आणि त्यांच्या उपनद्या :
| नदी | उपनद्या | नदी | उपनद्या |
| तापी | पुर्णा, गिरणा | द.पुर्णा | दुधना, गिरजा |
| पुर्णा | मोर्णा, काटेपुर्णा,नळगंगा | कृष्णा | कोयना, वेरळा, वारणा, पंचगंगा, वेण्णा |
| गोदावरी | दारणा, कादवा, प्रवरा, मांजरा, सिंदफना, दक्षिण-पुर्णा, प्राणहिता (वर्धा+वैनगंगा) | भिमा | दुधनी, सिना, माण, निरा, धोंड, इंद्रायणी, मुळा, मुठा, कुकडी, पवना, क-हा |
| वैनगंगा | कन्हान, पेंच, वर्धा व पेनगंगा, सिंधफना | | |
महाराष्ट्रातील जिल्ह्यानुसार नद्यांची यादी :
* औरंगाबाद जिल्हा
कौम नदी, खेलना नदी, गोदावरी नदी, चंदन नाला, तापी नदी, नागद नदी, पूर्णा नदी, बुधना नदी, भोल्डी नदी, वाघूर नदी, शिवना नदी
* जालना जिल्हा
कल्याण नदी, कुंडलिका नदी, खेळणी नदी, गल्हाटी नदी, गिरजा नदी, गोदावरी, जीवरेखा नदी, जुई नदी, दुधना नदी, धामना नदी, पूर्णा नदी, मेह नदी
* बीड जिल्हा
कांबळी नदी, मांजरा नदी
* उस्मानाबाद जिल्हा
मांजरा नदी, तेरणा नदी
* लातूर जिल्हा
मांजरा नदी
* नांदेड जिल्हा
उमरगा(नाला), उलूपी नदी, गांजोटी(नाला), कयाधू नदी, खेरी नदी, गोदावरी नदी, घरणी नदी, चांदणी नदी, तवरजा नदी, तिरू नदी, तेरणा नदी, दुधना नदी, देवण नदी, नल्ली नदी, पैनगंगा नदी, बाणगंगा नदी, बोरी नदी, भीमा नदी, मन्याड(मनार) नदी, मण्यार नदी, मांजरा नदी, रेणा नदी, लेंडी नदी, वेणीथोरा नदी, सरस्वती नदी, सीना नदी, सीता नदी, हरणी नदी
* हिंगोली जिल्हा
असना नदी, कयाधू नदी, पूर्णा नदी, पैनगंगा नदी
* परभणी जिल्हा
कर्परा नदी(कापरा नदी), गोदावरी नदी, दुधना नदी, पूर्णा नदी, मासळी नदी
* अकोला जिल्हा
अडोळ नदी, आस नदी, उत्तवली नदी, उमा नदी, काटेपूर्णा नदी, कास नदी, कुप्ती नदी, गांधारी नदी, गौतमी नदी, चंद्रभागा नदी, तापी नदी, नागझरी नदी, निर्गुणा नदी, पठार नदी, पूर्णा नदी, पेढी नदी,पैनगंगा नदी, बोर्डी नदी, भुईकंद नदी, मन नदी, मून नदी, मोर्णा नदी, म्हैस नदी, वान नदी, विद्रूपा नदी, विश्वामित्री नदी, शहानूर नदी
* अमरावती जिल्हा
आरणा नदी, उमा नदी, काटेपूर्णा नदी, कापरा नदी (खापरा नदी), गाडगा नदी, खंडू नदी, खोलाट नदी, चंद्रभागा नदी, चुडामण नदी, तापी नदी, तिगरी नदी, निरगुडा नदी, पूर्णा नदी, पेंढी नदी, बुरशी नदी, भावखुरी नदी, भुलेश्वरी नदी, वर्धा नदी, वान नदी, शहानूर नदी, सिपना नदी, सुरखी नदी,
* गडचिरोली जिल्हा
गाढवी नदी, इंद्रावती नदी, कठाणी नदी, खोब्रागडी नदी, गोदावरी नदी, दार्शनी नदी, दीना नदी, पोटफोडी नदी, पोर नदी, प्राणहिता नदी, वर्धा नदी, वैनगंगा नदी, सिवनी नदी
* गोंदिया जिल्हा
गाढवी नदी, चुलबंद नदी, पांगोली नदी, बावनथडी नदी, वाघ नदी, वैनगंगा नदी, शशीकरण नदी
* चंद्रपूर जिल्हा
इरई नदी, पैनगंगा नदी, मूल नदी, वर्धा नदी, वैनगंगा नदी
* नागपूर जिल्हा
आंब नदी, कन्हान नदी, कोलार नदी, चंद्रभागा नदी, जांब नदी, नांद नदी, नाग नदी, पिवळी नदी, पेंच नदी, बावनथडी नदी, सांड नदी, वर्धा नदी, वेणा नदी (Wunna), वैनगंगा नदी
* यवतमाळ जिल्हा
अडाण नदी(अडाणा नदी), अरुणावती नदी, खुनी नदी, चक्रावती नदी, निर्गुणा नदी (निरगुडा नदी), पूस नदी, पैनगंगा नदी, बेंबळा नदी, रामगंगा नदी, वर्धा नदी, वाघाडी नदी, विदर्भा नदी, वैनगंगा नदी
* बुलढाणा जिल्हा
खडकपूर्णा नदी, नळगंगा नदी, निपाणी नदी, पूर्णा नदी, पैनगंगा नदी, बाणगंगा नदी, बोर्डी नदी, मन नदी, वाण नदी, विश्वगंगा नदी, ज्ञानगंगा नदी, पूर्णा नदी, मास नदी, उतवळी नदी
* वर्धा जिल्हा
कार नदी, धाम नदी, पंचधारा नदी, पोथरा नदी, बाकळी नदी, बोर नदी, यशोदा नदी, वर्धा नदी, वेणा नदी (Wunna), वैनगंगा नदी,
* वाशीम जिल्हा
अडाण नदी(Aran River), अरुणावती नदी, काटेपूर्णा नदी, कास नदी, चंद्रभागा नदी, पूस नदी, पैनगंगा नदी, बेंबळा नदी
* भंडारा जिल्हा
अंबागड नदी, गाढवी नदी, चूलबंद नदी, बावनथडी नदी, बहुळा नदी, बोदलकसा नदी, मरू नदी, वैनगंगा नदी, सूर नदी
* अहमदनगर जिल्हा
आढळा नदी, कडा, कडी, कांबळी, केरी, केळी, कुकडी नदी, कौतिकी, गोदावरी नदी, घोडनदी नदी, ढोरा नदी, प्रवरा नदी, बोकडी, भीमा नदी, मुळा नदी, मेहेकरी, सीना नदी, हंगा नदी
* पुणे जिल्हा
आंद्रा नदी, आंबी नदी, आर नदी, इंद्रायणी नदी, उरवडे नदी, कर्हा नदी, कानंदी नदी, कुकडी नदी, कुंडली नदी, कोळवण नदी, गुंजवणी नदी, घोड नदी, देव नदी, नाग नदी, नीरा नदी, पवना नदी, पुष्पावती नदी, बुधा नदी, बेलावडे नदी, भामा नदी, भीमा नदी, मांडवी नदी, मीना नदी, मुठा नदी, मुळा नदी, मोसे नदी, राम नदी, रिहे नदी, येलवंती नदी, वेळवंडी नदी, शिवगंगा नदी, सुधा नदी
* नाशिक जिल्हा
अडुळा नदी, अळवंड नदी, आरम नदी, आळंदी नदी, उंडओहोळ नदी, उनंदा नदी, कडवा नदी, कवेरा नदी, काश्यपी(कास) नदी, कोलथी नदी, खार्फ नदी, गिरणा नदी, गुई नदी, गोदावरी नदी, गोरडी नदी, चोंदी नदी, तान(सासू) नदी, तांबडी नदी, दमणगंगा (दावण) नदी, धामण नदी, नंदिनी नदी (नासर्डी नदी), नार नदी, पर्सुल नदी, पांझरा नदी, पार नदी, पिंपरी नदी, पिंपलाद नदी, पुणंद नदी, बाणगंगा नदी,बामटी(मान) नदी, बारीक नदी, बोरी नदी, भीमा नदी (एक छोटी नदी), भोखण नदी, मान नदी (बामटी) नदी], मासा नदी, मुळी नदी, मोसम नदी, म्हाळुंगी नदी, वडाळी नदी, वाकी नदी, वाग नदी, वाल नदी, वालदेवी नदी,वैतरणा नदी, वैनत नदी, वोटकी नदी, शाकांबरी नदी, सासू(तान) नदीइतर नाले, ओहोळ, प्रवाह वगैरे : अळवली, कंजारी, कनेर, खाटकी, खेर, गुलाडी, तुंगाडी, देव, नेत्रावती, भामेर, भेवरी, वाटोळी, शाखी(शाकंबरी), सालवर, सुकी
* कोल्हापूर जिल्हा
कसारी नदी, कुंभी नदी, कृष्णा नदी, गडवली नदी, घटप्रभा नदी, चिकोत्रा नदी, जांभळी नदी, ताम्रपर्णी नदी, तिल्लारी नदी, तुलशी नदी, दूधगंगा नदी, पंचगंगा नदी, भोगावती नदी (कोल्हापूर), मलप्रभा नदी, मांगरी नदी, वारणा नदी, वेदगंगा नदी, सरस्वती(गुप्त) नदी, हिरण्यकेशी नदी
* सांगली जिल्हा
अग्रणी नदी, कटोरा ओढा, कासेगाव नदी, खरा ओढा, पंचगंगा नदी, पेठ नदी, बोर नदी, येरळा नदी, वारणा नदी, वाळू ओढा
* सातारा जिल्हा
उरमोडी नदी, कानदानी नदी, कुंडली(कुडाळी) नदी, कुरवली नदी, कृष्णा नदी, केरा नदी, कोयना नदी, तारळी नदी, नीरा नदी, बाणगंगा नदी (फलटण),भीमा नदी, माण(मांड) नदी, मनगंगा (माणगंगा) नदी, मोरना नदी, येरळा नदी, वसना नदी, वांग(वांगना) नदी, वाघेरी(नाला), वाझर्डे नाला, सोळशी नदी
* सोलापूर जिल्हा
अडिला नदी, कुमठा नाला, गोरडा नदी, चंद्रभागा(भीमा) नदी, नागझरी नदी, नीरा नदी, बोटी नदी, बोडकी नदी, भीमा नदी, भेंड नदी, भोगावती नदी, माण नदी, वराई नदी, शेलगी नाला, सीना नदी, सीरा नदी, हत्तूर नाला, हरणी नदी
* जळगाव जिल्हा
अंजनी नदी, अनेर नदी, कान नदी, कानोळी नदी, खोनाली नदी, गिरणा नदी, गुळी नदी, तापी नदी, तितूर नदी, पूर्णा नदी, बहुळा नदी, बोरी नदी, भूनक नदी, भोकर नदी, भोगावती नदी, मंकी नदी, मोर नदी, रानवती नदी, वाघूर नदी, सुकी नदी, सूर नदी, हडकी नदी
* धुळे जिल्हा
अनेर नदी, अमरावती नदी, अरुणावती नदी, आरू नदी, कान नदी, तापी नदी, निरगुडी नाला, पांझरा नदी, बुराई नदी, भोगावती नदी, मदारी नाला, सूर नदी
* नंदुरबार जिल्हा
गोमती नदी, नर्मदा नदी, तापी नदी, पूर्णा नदी, शिवा नदी, गोमाई नदी, वाकी नदी
* ठाणे / पालघर जिल्हा
उल्हास नदी, कामवारी नदी, काळू नदी, खडवली नदी, चोरणा नदी, तानसा नदी, दहेरजा नदी, पिंजळ नदी, पेल्हार नदी, बारबी नदी, भातसई नदी (भातसा नदी), भारंगी नदी, भुमरी नदी, मुरबाडी नदी,वांदरी नदी, वारोळी नदी, वालधुनी नदी, वैतरणा नदी, सूर्या नदी
* मुंबई शहर आणि उपनगर जिल्हे
उल्हास नदी, ओशिवारा नदी, दहिसर नदी, पोयसर नदी, माहीम नदी, मिठी नदी
* रत्नागिरी जिल्हा
अंबा नदी, काजळी नदी, केव नदी, गड नदी, चोरद नदी, जगबुडी नदी, जोग नदी, नळकडी नदी, नारिंगी नदी, बोर नदी, मुचकुंदी नदी, वाशिष्ठी नदी, शास्त्री नदी, शुक(वाघोटन) नदी, सावित्री नदी
* सिंधुदुर्ग जिल्हा
अरुणा नदी, आचरा नदी, कर्ली, केसरी, खांडरा नदी, गड नदी, जगबुडी, जानवली, जोग नदी, तिल्लारी(तिलारी) नदी, तेरेखोल नदी, देवगड नदी, पियाळी नदी, पीठढवळ नदी, बांदा नदी, बेल नदी,भंगसाळ नदी, वाघोटण नदी, शिवगंगा नदी, शुक नदी, सरंबळ नदी, सुखशांती नदी
Post a Comment