परभणी जिल्हा
परभणी जिल्हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागात येतो. मराठवाड्यातील इतर भागांप्रमाणेच हा जिल्हा प्रथम निजामाच्या अधिपत्याखाली होता. परभणीला आधी प्रभावतीनगर असे म्हणत. परभणी जिल्ह्याच्या उत्तरेस हिंगोली जिल्हा, पूर्वेस नांदेड जिल्हा, दक्षिणेस लातूर जिल्हा व पश्चिमेस बीड जिल्हा व जालना जिल्हा आहे. परभणीत मराठवाडा कृषी विद्यापीठ ही संस्था आहे. शिर्डीचे साईबाबा यांचा जन्म पाथरी येथला आहे.संत नामदेव महाराज (नर्सी) व संत जनाबाई (गंगाखेड) परभणी जिल्ह्याच्या असून गणिती भास्कराचार्य हे याच जिल्ह्यातील बोरी येथील आहे.बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक औंढा नागनाथ हे पूवी परभणीत होते ञिधारा हे पवीञ ठिकाण येथे आहे.ञिधारेला ओँकारनाथ भगवान नामे सिध्दपुरुषाचे मंदिर आहे.त्यांनी यवतमाळ मधील कार्ला येथे समाधी घेतली.आता ते हिगोली जिल्हयात गेले आहे. परभणी शहराजवळ दत्तधाम हे दत्ताचे पीठ आहे.
परभणी जिल्ह्याची ओळख
परभणी हा मराठवाड्यातील मध्यवर्ती जिल्हा आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ 6511 चौ.कि.मी. असून जिल्ह्याची उत्तर-दक्षिण 104.58 कि.मी. व पूर्व-पश्चिम लांबी 128.72 कि.मी. आहे. जिल्ह्यात 848 खेडी आणि 704 ग्रामपंचायती आहेत. जिल्हयात एकूण आठ मध्यम शहरे आहेत. जिल्हयाचा समावेश खात्रीचा पाऊस पडणा-या प्रदेशात असून सरासरी पर्जन्यमान 773 मि.मी. इतके आहे. जिल्ह्याचे मुख्यालय परभणी असून परभणी व सेलू हे दोन महसूली उपविभाग आहेत. परभणी, जिंतूर, गंगाखेड, पाथरी, पालम, पूर्णा, सेलू, सोनपेठ व मानवत असे एकूण 9 तालुके आहेत.
परभणी जिल्ह्याची २०११ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या 18 लक्ष 35 हजार 982 असून त्यामध्ये 9 लक्ष 46 हजार 185 पुरुष तर 8 लक्ष 89 हजार ७९७ स्त्रियांचा समावेश आहे. शून्य ते सहा वर्ष वयाच्या मुलांची संख्या 2 लक्ष 51 हजार 851 इतकी आहे. मुलींचे दर हजार मुलांमागे प्रमाण केवळ ८६६ इतके आहे. एकूण साक्षरतेचे प्रमाण ७५.२२ टक्के असून पुरुष साक्षरता ८५.६६ टक्के तर स्त्री साक्षरता ६४.२७ टक्के इतकी आहे.
गोदावरी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. ती पाथरी, मानवत, सोनपेठ, परभणी, गंगाखेड पालम व पूर्णा तालुक्यातून पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत जाऊन पुढे नांदेड जिल्ह्यात प्रवेश करते. जिल्ह्याच्या वायव्येकडील मध्य भागातून पूर्णा नदी व तिच्या उपनद्या करपरा, दुधना वाहत जातात. सेलू व जिंतूर तालुक्याचा काही भाग दुधना नदीच्या खो-यात येतो. जिल्ह्यातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे.
परभणी हा जुन्या हैद्राबाद संस्थानच्या मराठवाडा विभागातील पाच जिल्हयांपैकी एक जिल्हा होता. या जिल्ह्याचा उल्लेख 'प्रभावती' ह्या नावानेही केल्याचे आढळून येते. मराठवाड्याच्या इतिहासात परभणीची परंपरा फार जुनी असून ती अश्म युगापर्यंत पोहोचते. प्राचीन भारताच्या इतिहासात अश्मयुगात गोदावरीच्या खो-यातील प्रदेशाची फार भरभराट झाली असावी, असा संशोधकांचा तर्क आहे. अशोकाच्या दक्षिणेतील स्वारीने परभणीच्या विकासाला साह्य केले. हा भाग काही वर्षे देवगिरी येथील यादवांच्या अधिपत्याखाली होता. चौदाव्या शतकाच्या सुरुवातीस अल्लाउद्दीन खिलजीने यादवांचा पराभव केल्यानंतर परभणीचा परिसर त्याच्या ताब्यात गेला. महंमद तघलकाच्या मृत्यूनंतर हैद्राबादचे स्वतंत्र राज्य अस्तित्वात येईपर्यंत परभणी हे मोगल साम्राज्याचे अंग होते.
इसवी सनापूर्वी सातवाहनांच्या काळात गोदातीरी महाराष्ट्र सारस्वत आणि संस्कृती यांचा जो उद्गम झाला, त्याचा वारसा परभणी जिल्हयाला लाभला होता. महर्षी अगस्तीच्या दक्षिण दिग्विजयाने या जिल्ह्यात विविध तीर्थे निर्माण केली आहेत. पौगंड, पोलस्व यासारखे तपोधन, गोरख, गैबी आणि गहिनीनाथ यासारख्या श्रेष्ठ नाथपंथियांनी जिल्हयात वास्तव्य व साधना केल्याचे उल्लेख धर्मग्रंथात आहेत. परभणी जिल्हा संत-महंताची भूमी आहे. जिल्ह्यात बरीच धार्मिक स्थळे आहेत. जिल्ह्याला प्रदीर्घ परंपरा असल्याने अनेक ऐतिहासिक स्थळेही आहेत. उरुस किंवा जत्रा म्हटलं की डोळ्यासमोर चित्रं उभं राहतं आकर्षकरोषणाई, गगनचुंबी आकाशपाळणे, मौत का कुवाँ या सारख्या मनोरंजक घटकांचं! हजरत सय्यद शाह तुराबुल हक (रहे.) यांचाअनेक वर्षांची परंपरा असणारा उरुस 31 जानेवारी ते 12 फेब्रुवारी या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा होतो.
असंख्य भाविक आत्मिक शांती आणि मनोबल प्राप्तीसाठी सय्यद शाह तुराबुल हक यांच्या दर्शनासाठी येतात. त्यांनाश्रध्देनं तुरतपीर बाबा म्हणूनही ओळखतात. तुरतपीर म्हणजे भक्तांचं दु:ख तात्काळ, तुरंत दूर करणारे पीर! सय्यद शाह तुराबुलहक (रहे.) हे सुफी पंथाचे मुस्लीम साधू समर्थ रामदास स्वामी यांचे शिष्य होते. समर्थांच्या जांब या जन्मगावी जात असतांनात्यांचं इथं देहावसान झालं. सय्यद शाह तुराबुल हक यांनी समर्थ रामदास स्वामींच्या ‘दासबोध’ या ग्रंथाचं उर्दूत भाषांतर केलंआहे. मनाच्या श्लोकांना उर्दूत ‘मनसमझावन’ असं नांव देण्यात आलं आहे. राज्यातूनच नव्हे तर इतर राज्यातूनही सय्यद शाहतुराबुल हक यांच्या दर्शनासाठी नियमितपणं येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. उरसाच्या आयोजनात सर्व जाती-धर्माच्या व्यक्तिंचासहभाग असतो. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी संदलची थाळी डोक्यावर घेऊन उरसाचं प्रतीकात्मक उद्घाटन करतात. जिल्हाप्रशासनाच्यावतीनं दरवर्षी उरसानिमित्त 2 फेब्रुवारीस स्थानिक सुट्टीही जाहीर केली जाते.
राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आणि सर्वधर्म समभाव जपणा-या या उरसात सांस्कृतिक, क्रीडा स्पर्धांचंही आयोजन मोठ्याउत्साहात होतं. उरसानिमित्त सर्कस, गगनचुंबी आकाशपाळणे, चक्रीपाळणे, टोराटोरा,
नावाट्वीस्टर, ड्रॅगन रेल्वे, जादूचे प्रयोग, भूतबंगला, मौत का कुव्वा या मनोरंजक बाबींसह विविध वस्तूंचे स्टॉल्सही लावण्यात आलेलेअसतात. महिलांसाठी उभारण्यात आलेल्या मीनाबाजारमध्ये संसारोपयोगी साहित्य, खेळणी आणि सौदर्य प्रसाधनांची रेलचेलअसते.
परभणी येथे भारतातील सर्वात मोठे श्रीमृत्युंजय पारदेश्वर महादेव शिवलिंग मंदीर आहे. हे पारदेश्वर मंदिर परमपूज्य सद्गुरु महामंडलेश्वर श्री सच्चिदानंद सरस्वती महाराज यांनी उभे केले आहे. हे शिवलिंग 250 किलो पा-याचे आहे.
जिल्ह्यातील पाथरी हे शिर्डीचे साईबाबा यांचे जन्मस्थान आहे. पाथरीचे ऐतिहासिक श्रेष्ठत्व सिध्द करणारा ताम्रपटही प्रसिध्द आहे. राक्षसभुवनच्या समरप्रसंगी गोदावरीच्या किनारी निजामाचा पराभव केल्यानंतर त्याचा समूळ नायनाट करण्यासाठी थोरले माधवराव पेशवे हे त्याच्या मागे लागले होते. त्यावेळी त्यांनी पाथरीस तळ दिला होता.
पाथरीपासून 24 कि.मी. अंतरावर गोदावरीच्या काठी मुदगल हे तीर्थक्षेत्र आहे. येथे श्री मुदगलेश्वरांचे मंदिर व स्वामी ऋषिकेशानंद महाराज यांची समाधी आहे.
संत जनाबाई ह्या संत नामदेवाच्या परमभक्त होत्या. संत जनाबाईंचे जन्मगाव गंगाखेड असून येथील राजेंद्र पेठेत त्यांचा जन्म झाला. गंगाखेड येथे संत जनाबाईंचे स्मारक बांधण्यात आले आहे. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात आंनदराज स्वामी महाराज यांनी गोदावरी नदीच्या दक्षिण किना-यास येथे बालाजी मंदिर बांधले आहे. गंगाखेड पासून 18 कि.मी. अंतरावर राणीसावरगाव येथे रेणुकादेवीचे भव्य हेमाडपंथी मंदिर आहे. हे मंदिर पुरातन असून मूळ पीठाची स्थापना भगवान परशुराम यांनी केली असावी, अशी आख्यायिका आहे. मुख्य गाभा-यात रेणुकादेवीची सुमारे 4 फूट उंचीची मूर्ती आहे. देवीच्या उजव्या बाजूस परशुरामाचे स्थान आहे. राणीसावरगाव येथे रेणुकादेवीच्या मुख्य मंदिरात नवरात्रात 10 दिवस व चैत्र पौर्णिमेनंतर 10 दिवस मोठे उत्सव साजरे केले जातात.
परभणीपासून 12 कि.मी. अंतरावर पूर्वेस श्रीक्षेत्र त्रिधारा वसलेले आहे. 3 नद्यांच्या संगमामुळे या क्षेत्रास त्रिधारा क्षेत्र असे म्हणतात. नद्यांच्या संगमावर ओंकारेश्वर, दत्तात्रेय, दुर्गाभागवती देवी आणि हनुमान यांची मंदिरे आहेत. देवीजवळ एक सुंदर गोमुख बांधण्यात आलेले आहे. जवळच नदीकाठी उंबराच्या झाडाखाली दत्तात्रेयाची मूर्ती स्थापन केली आहे. गावात मारुतीचे दक्षिणाभिमुख एक देऊळ आहे.
परभणीपासून दक्षिणेस 19 कि.मी. अंतरावर पोखर्णी येथे नृसिंहाचे मंदिर आहे. या मंदिरात डाव्या बाजूस तीन फूट ऊंचीची नृसिंहाची सुंदर मूर्ती आहे. या मूर्तीवर चांदीचे आवरण घातलेले आहे तसेच चांदीचे नक्षीकाम केलेली प्रभावळ आहे. मंदिराच्या मूळ गाभा-याचा जीर्णोद्वार करण्यात आला आहे. वैशाख शुध्द पौर्णिमेला नृसिंहाची यात्रा भरते.
जिंतूरपासून 18 किलोमीटर अंतरावर असलेले चारठाणा अथवा चारुक्षेत्र हे गाव ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे आहे. चारठाणा या संपूर्ण दगडी बांधणीच्या यादवकालीन शिल्पकलेने नटलेल्या गावास हेमाडपंथी स्थापत्यकलेच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. येथील झुलता स्तंभ पर्यटकांना आकर्षित करतो. हा स्तंभ गावाचे वैभव आहे.
जिंतूर या नावाने ओळखले जाणारे गाव हे पूर्वीचे जैनपूर होय. हे गाव एक प्रकारे जैनांच्या गत इतिहासाची साक्षच होय. येथील कोरीव गुंफा अतिशय अप्रतिम व प्रेक्षणीय आहेत. जिंतूरजवळ डोंगरावर नेमगिरी क्षेत्र आहे. येथील डोंगरावर सात गुंफा असून मध्यभागी दिगंबर जैन सांप्रदायाचे 22 वे तीर्थंकर श्री भगवान नेमिनाथ यांची अति प्राचीन व भव्य मूर्ती जैन मंदिरात पद्मासनात आहे. त्यांच्या दोन्ही बाजूस भगवान शांतीनाथ आणि भगवान पार्श्वनाथ यांच्या सहाफूट उंचीच्या प्रतिमा आहेत. बाकी इतर गुंफामधून भगवान आदिनाथ, बाहुबली व नंदीश्वरांच्या प्रतिमा विराजमान आहेत. दरवर्षी येथे यात्रा भरते व रथोत्सव साजरा केला जातो.
पालम तालुक्यात गोदावरीच्या पात्रात जांभूळ बेट आहे. तेथे महादेवाचे हेमाडपंथी मंदिर आहे. बेटावर जांभळाची मोठ्या प्रमाणावर झाडे असल्याने त्यास जांभूळबेट असे नाव पडले.
जिंतूरपासून उत्तरेस 15 कि.मी. अंतरावर पूर्णा नदीच्या काठावर येलदरी हे गाव असून तेथे मातीचे मोठे धरण बांधण्यात आले आहे. या धरणावर जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आला आहे.
तीन नद्यांचा संगम ( त्रिधारा ), ‘हजरत तुराबुल हक शाह-दर्गा’ झुलता दगडी स्तंभ व प्राचीन कुंड
परभणी तालुक्यात त्रिधारा क्षेत्र प्रसिद्ध आहे. येथे पूर्णा, दुधना व कापरा या तीन नद्यांचा संगम झालेला आहे. खुद्द परभणी शहरात ‘हजरत तुराबुल हक शाह-दर्गा’ आहे. जिंतूरच्या टेकडीवरील हे जैनांचे प्राचीन स्थान असून येथे अनेक तीर्थंकारांच्या मूर्ती आहेत. एक मूर्ती अधांतरी असल्यासारखी दिसते. एका छोट्या दगडावर ह्या वजनदार मूर्तीचा संपूर्ण भार तोललेला आहे. जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील झुलता दगडी स्तंभ व प्राचीन कुंड हे प्रसिद्ध आहेत.
जनाबाईंची समाधी, तीनशे वर्षांपूर्वीचे बालाजीचे मंदिर,
गंगाखेड हे गोदावरी नदीच्या तीरावरील प्राचीन धार्मिक क्षेत्र आहे. या ठिकाणी नदीच्या काठावर व गावात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. येथे संत जनाबाईंची समाधी आहे. येथे तीनशे वर्षांपूर्वी संत आनंदस्वामी यांनी स्थापन केलेले बालाजीचे मंदिर असून बालाजीची वाळूची मूर्ती आहे. हे मंदिर माधवराव पेशवे यांच्या कालखंडातील आहे. गौतम ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी असून गौतमी नदीचा उगम येथेच झालेला आहे.
श्री नृसिंहाचे प्राचीन मंदिर, शिर्डीच्या श्रीसाईबाबांचे जन्मस्थान
जिल्ह्यातील पाथ्री हे गाव शिर्डीच्या श्रीसाईबाबांचे जन्मस्थान असल्याचे मानले जाते. मुद्गल हे गाव पाथ्री तालुक्यात असून गोदावरी नदीच्या काठावरील हे स्थान मुद्गल ऋषींचे तपस्या स्थान असल्याचे मानले जाते. येथील महादेवाचे मंदिर प्रसिद्ध असून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जिर्णोध्दार केला होता. परभणी तालुक्यातील पोखरणी येथे श्री नृसिंहाचे प्राचीन मंदिर असून मंदिरातील शिल्पे व मंदिराचे स्थापत्य प्रेक्षणीय आहे.
Post a Comment